‘सागर’ भी तरसते रहते है..., नागपुरातील प्रथितयश गायक वैदर्भीयांचा तो आवडता किशोर कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:21 AM2017-10-24T00:21:03+5:302017-10-24T00:21:14+5:30

संगीत हेच त्याचे भावविश्व. संगीताचा तीळमात्र, अर्थाअर्थी संबंध नसलेल्या सफाई कामगाराच्या घरातील हा प्रज्ञावंत.

The 'Sagar' is also craving ..., the favorite singer of Nagpur, Vaishrawhia's favorite Kishore Kumar | ‘सागर’ भी तरसते रहते है..., नागपुरातील प्रथितयश गायक वैदर्भीयांचा तो आवडता किशोर कुमार

‘सागर’ भी तरसते रहते है..., नागपुरातील प्रथितयश गायक वैदर्भीयांचा तो आवडता किशोर कुमार

Next

- गजानन जानभोर

संगीत हेच त्याचे भावविश्व. संगीताचा तीळमात्र, अर्थाअर्थी संबंध नसलेल्या सफाई कामगाराच्या घरातील हा प्रज्ञावंत. त्याच्या गाण्यासाठी श्रोते आतूर असतात. सभागृहात तो नेमका कुठून येईल, याचा नेम नसतो. पण, एकदा आला की श्रोते त्याच्या स्वरांशी एकरूप होतात. सागर मधुमटके, नागपुरातील प्रथितयश गायक वैदर्भीयांचा तो आवडता किशोर कुमार. संगीताचे नाते प्रतिभेशी. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. ना जातीची, ना धर्माची. लोकांच्या घरी धुणी-भांडी करणारी खार तळेगावची वैशाली माडे महाराष्ट्राची महागायिका होते. सागरही असाच अभावग्रस्त. वडील भजन गायचे. सागर त्यांच्या मांडीवर बसून ऐकत राहायचा, रात्रभर जागर सुरू राहायचा. सागर गाणे तिथेच शिकला. घराच्या पायरीवर मित्रांना गोळा करून तो असा गुरुविना ‘रियाझ’ करायचा. पाचवीत त्याने एकदा शाळेत ‘परवर दिगारे आलम...’ म्हटले. शाळेला त्याच्यातील चुणूक दिसली. मामा त्याला भजन, आॅर्केस्ट्रात घेऊन जायचे.
सिरसपेठेतील एका शाळेत आॅर्केस्ट्राची तालीम राहायची. सागर कोपºयात अंग चोरून ऐकत राहायचा. आॅर्केस्ट्राचे कलावंत त्याला चहा आणायला पाठवायचे. तो धावत जायचा, तळमळ एकच की, एकदा तरी गायला मिळावे. चहाच्या निमित्ताने त्याला रिहर्सल रूममध्ये प्रवेश मिळाला. कलावंत मंडळी येण्यापूर्वी तो रूम स्वच्छ करून ठेवायचा. पण, तरीही गाणे मिळत नव्हते. एकदा ‘बाजीगर’च्या गाण्यांची तालीम सुरू होती. मुख्य गायक आला नाही. भिडस्त सागर म्हणाला, मी ऐकवू का? त्याचे ‘छुपाना भी नही आता...’ साºयांनाच आवडले. पण, आॅर्केस्ट्राच्या दिवशी हातात माईकऐवजी पुन्हा चहाचा कप आला. गाण्यासाठी ही अशी धडपड सुरूच होती. एके दिवशी सागरला ती संधी मिळाली. गाणे होते, ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा...’ मध्य प्रदेशातील तिरोडी माईन्स या गावातील हा प्रसंग. गावकºयांनी गाणे आणि सागर, दोघांनाही डोेक्यावर घेतले. त्याची गावातून मिरवणूक काढली. खिशातल्या नोटांवर सागरच्या सह्या घेतल्या. कोळशाच्या खाणीत त्या दिवशी संगीतातला हिरा सापडला होता. मग दरवर्षीच तिरोडी माईन्सच्या लोकांचा सागरसाठी आग्रह आणि गाणे संपल्यानंतर वर्षभर जपून ठेवलेल्या नोटेवर त्याचा आॅटोग्राफ. एकदा आयोजकांनी भलत्याच गायकाला स्टेजवर बोलावले. गावकरी चिडले, स्टेजवर चढले, मागे असलेल्या सागरला पकडून आणले आणि गायला लावले. चाहत्यांची ही अशी प्रेमळ दांडगाई...
सागरच्या आयुष्यातील संघर्ष कायम आहे, पण या वाटेतही तो आयुष्याचे सूर हरवू देत नाही. संगीतकार प्यारेलाल, आनंदजी त्याचे तोंडभरून कौतुक करतात. ‘मेरे मेहबुब कयामत होगी...’ गाऊ लागला तेव्हा ग्रीन रूममध्ये निवांत बसलेला अमित कुमार धावत विंगेत आला. त्याच्या स्वरांची जादू ही अशी... तो विनम्र आहे. कलावंत मोठा झाला की त्याला विक्षिप्त वागण्याचा रोग जडतो. सागर मात्र तसा नाही. मेडिकल कॉलेजमध्ये तो सफाई कामगार आहे. तिथे तो आपली ओळख लपवून राहतो. मध्यंतरी मेडिकलमध्ये एक चाहता भेटला ‘अरे, यार तू इथे हे काम करतो?’ खचलेला सागर काही दिवस कामावर गेलाच नाही. शेवटी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी त्याला समजावले आणि धीर दिला. एखादा रुग्ण निराश असेल तर सागर त्याला जवळ घेतो आणि ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ ऐकवून त्याच्या वेदनांवर फुंकर घालतो. त्याच्या गाण्यासाठी सारेच आतूर का असतात? कदाचित त्यामागे हेच गुपित असावे...

Web Title: The 'Sagar' is also craving ..., the favorite singer of Nagpur, Vaishrawhia's favorite Kishore Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.