हवामानातील बदलांसह थ्रीप्समुळे आंबा उत्पादनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:59 AM2019-05-02T04:59:32+5:302019-05-02T05:02:18+5:30

कोकणसह देशभर आंब्याला भरपूर मोहर आल्यामुळे या वर्षी फळांच्या राजाचे उत्पादन विक्रमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता; परंतु थ्रीप्ससह तुडतुड्यांचा प्रादुर्भाव व लांबलेला थंडीचा कालावधी यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.

Results on mango production due to climate change with thrips | हवामानातील बदलांसह थ्रीप्समुळे आंबा उत्पादनावर परिणाम

हवामानातील बदलांसह थ्रीप्समुळे आंबा उत्पादनावर परिणाम

googlenewsNext

नामदेव मोरे 

कोकणसह देशभर आंब्याला भरपूर मोहर आल्यामुळे या वर्षी फळांच्या राजाचे उत्पादन विक्रमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता; परंतु थ्रीप्ससह तुडतुड्यांचा प्रादुर्भाव व लांबलेला थंडीचा कालावधी यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला असून एप्रिल संपल्यानंतरही बाजारपेठेमध्ये अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. यामुळे या वर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उन्हाळा सुरू झाला की फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे साम्राज्य सुरू होते. मार्च ते जूनपर्यंत मुंबईसह राज्य व देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वाधिक विक्री आंब्याचीच होत असते. फक्त मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल या व्यवसायामधून होत आहे. ३०० ते ४५० कोटी रुपयांचे आंबे जगातील विविध देशांमध्ये निर्यात होतात. ६०० कोटींपेक्षा जास्त आमरसाची निर्यात होत आहे. मुंबई बाजार समितीमध्येही रोज ५० हजार ते १ लाख पेटी आंब्याची विक्री होत असते. या वर्षीही आंबा हंगाम चांगला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कोकणासह देशभरात आंब्याला भरपूर मोहर आला होता. प्रत्येक वर्षी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीमध्ये कोकणातून हापूसची पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येत असते. या वर्षी ५ नोव्हेंबरलाच आंबा विक्रीसाठी आला. यामुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते; पण आंब्याला थ्रीप्स रोगाची लागण झाली. यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. याशिवाय तुडतुड्यांमुळे आंब्यावर काळे डाग पडण्यास सुरुवात झाली. रोगामुळे पीक धोक्यात आले असताना त्या संकटात थंडीने वाढ केली. हिवाळ्यात थंडी खूप पडू लागली व थंडीचा कालावधीही वाढला. यामुळे अपेक्षित पीक आलेच नाही. प्रत्येक वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. या वर्षी तो लवकर जानेवारी अखेरीसच विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली; पण त्याचे प्रमाण खूपच कमी होते. मार्चच्या सुरुवातीपासून मुंबई बाजार समितीमध्ये ५० हजार ते एक लाख पेट्यांची आवक होत असते. एप्रिलमध्ये सरासरी ६० ते एक लाख पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी येत असतो; पण या वर्षी सरासरी ४० ते ६० हजार पेट्यांपेक्षा जास्त आवक होताना दिसत नाही.

कोकणातील आंब्याला जगभर मागणी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांतील शेती अर्थव्यवस्थेत हापूस आंब्याचा सिंहाचा वाटा आहे; परंतु या वर्षी ५० टक्केही उत्पादन होणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. काही ठिकाणी ३० ते ४० टक्केच उत्पादन झाले आहे. वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया शेतकरीही व्यक्त करू लागले आहेत. थ्रीप्सवर नक्की कोणते औषध वापरायचे व त्याचा प्रादुर्भाव कमी कसा करायचा याविषयी शेतकºयांना नीट मार्गदर्शन कृषी विद्यापीठ व शासकीय स्तरावरूनही झाले नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधूनही आंबा विक्रीसाठी येत असतो. दक्षिणेकडील राज्यांमध्येही या वर्षी अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. कोकण व देशातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. किमान सद्यस्थितीमध्ये असलेल्या मालाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून आंबा व आमरसाच्या निर्यातीचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. २०१६ - १७ मध्ये ४४३ कोटी रुपयांची आंबा निर्यात झाली होती. २०१७ - १८ मध्ये ही उलाढाल कमी होत ३८२ कोटींवर आली. या दोन वर्षांत आमरसाची निर्यात ८४६ कोटींवरून ६७३ कोटींवर आली आहे. निर्यात होणाºया फळांमध्ये द्राक्षानंतर आंबा दुसºया क्रमांकावर आहे; पण या वर्षीच्या हंगामामध्येही निर्यातही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यात वाढविण्यासाठी उत्पादन वाढणे व पिकाला थ्रीप्स व इतर रोगांपासून वाचविणे महत्त्वाचे आहे. मुंबईसह सर्वत्र आंबा पिकविण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेतले जात आहेत. या सर्वांचा परिणाम व्यापारावर होत आहे. तीव्र उकाड्यामुळे मार्केटमध्ये आलेल्या मालाची वेळेत विक्री होणे आवश्यक आहे. विक्री होण्यास विलंब झाल्यास आंबा खराब होण्याची व त्याचा दर घसरण्याचीही शक्यता आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा टिकविण्यासाठी सरकार व कृषी विद्यापीठांनीही आंबा उत्पादन वाढविण्याकडे आणि रोगराईपासून पीक वाचविण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा या शेतकऱ्यांना भविष्यातही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Results on mango production due to climate change with thrips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा