मानवतेचा पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:45 AM2018-07-13T05:45:54+5:302018-07-13T05:46:10+5:30

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच.

 Priest of humanity | मानवतेचा पुजारी

मानवतेचा पुजारी

googlenewsNext

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच. अखिल मानवजातीच्या कल्याणाची त्यांना आस होती. जगभरात पसरलेल्या आपल्या शिष्यांच्या माध्यमातून विश्वाला त्यांनी शांततेचा संदेश दिला. याचीच दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा ‘यू थन्स शांतता पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला होता. दादांचे आयुष्य म्हणजे एक चित्तरकथाच. सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील हैदराबादमधील संपन्न कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दादांनी एकाच वर्षात दोन-तीन इयत्ता उत्तीर्ण केल्या. दादांनी आयएएस व्हावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र, आपले चुलते साधू वासवानी यांच्या पावलावर पाऊल ठेवून दादांनी अध्यात्माचा, जगाला शांततेचा संदेश देण्याचा रस्ता पकडला. एम.एस्सी., एलएल.बी. झालेला हा तरुण साधू वासवानी यांचा शिष्योत्तम झाला. फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले; परंतु त्याची कोणतीही कटुता कधी त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये आली नाही. त्यांनी कधीही सर्वसंगपरित्यागाचा सल्ला दिला नाही; उलट कर्मसिद्धांताला व्यापक स्वरूप दिले. कर्मसिद्धांतानुसार आपण जे पेरू, तेच उगवते. आपण जर दुसऱ्याला आनंद वाटला, तर त्याबदल्यात आपल्या वाट्याला आनंदच येईल, अशी शिकवण त्यांनी दिली. मानवसेवा, परस्परांवर स्नेहाचा वर्षाव आणि प्राणिमात्रांवरही दया करण्यातूनच जीवन सफल बनेल, ही त्यांची शिकवण होती. जातिधर्मांतील भेद त्यांनी दूर केले. दादा नेहमी म्हणत, की आपण कोणत्या जातीचे, धर्माचे किंवा वंशाचे आहोत यापेक्षा आपण भारतमातेची लेकरे आहोत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती मी काय करू शकतो, असे म्हणत असते. मात्र, व्यक्तीतील आत्मविश्वास जागृत असेल, तर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. या आत्मविश्वासाच्या बळावरच नवीन भारताची निर्मिती होणार आहे. मांसाहाराविरुद्ध त्यांनी चालविलेल्या मोहिमेने शाकाहाराच्या चळवळीला बळ मिळाले. ती चळवळ पुढे एवढी फोफावली, की साधू वासवानी यांच्या जन्मदिनी २५ नोव्हेंबरला ‘पशू अधिकार दिन’ साजरा केला जाऊ लागला. लाखो लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शाकाहाराचा अंगीकार केला. याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रुग्णसेवा या क्षेत्रांत दादांच्या प्रेरणेने प्रचंड संस्थात्मक कार्य उभे राहिले. देशात वेगवेगळ््या ठिकाणी पसरलेल्या सिंधी समाजाला आध्यात्मिक बळ देण्याचे काम साधू वासवानी यांनी केले होते. त्याला दादांनी नवा आयाम दिला. सिंधी वयाच्या नव्याण्णवव्या वर्षापर्यंत अखंड कार्यरत राहून सेवेचे महाव्रत घेतलेला मानवतेचा पुजारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण, विविध माध्यमांतून त्यांचे कार्य हे अमर राहील.

Web Title:  Priest of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या