छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:55 AM2018-11-02T09:55:26+5:302018-11-02T09:55:39+5:30

केवळ दिखावा करून प्रशासन सुधारणार काय ?

People do not want Parrikar in photos! | छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

Next

- राजू नायक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जरी एकापाठोपाठ अशा तीन बैठका घेऊन आपण सक्रिय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यावर त्याचा बिलकुल परिणाम झालेला नाही. हा केवळ दिखावा आहे, तो करून प्रशासन सुधारणार काय, असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला आहे. त्यामुळे पर्रीकरांची छापून येणारी छायाचित्रे जनमत बदलण्यास कारण ठरणार नाहीत, असाच एकूण माहौल आहे.

पर्रीकरांनी गेल्या तीन दिवसांत सतत तीन बैठका घेतल्या. पहिली बैठक गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाबरोबर, दुसरी तीन महिने खोळंबलेली मंत्रिमंडळ बैठक व गुरुवारी भाजपाच्या गाभा समितीबरोबरची बैठक. भाजपा नेत्यांनाही ते सहा महिने भेटले नव्हते. निरीक्षक मानतात की पर्रीकरांची प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी या बैठका घेण्याचा अट्टाहास केला, यामागे पक्षश्रेष्ठींचा तगादा असू शकतो. सध्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार चालविला आहे. त्यांच्याकडे एकूण 26 खाती आहेत. ते खात्यांचा ताबा सोडत नाहीत, उपमुख्यमंत्री नेमत नाहीत व स्वत: तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यायला तयार नाहीत. या काळात त्यांच्याच मंत्र्यांनी प्रशासन कोसळल्याची व अधिकारी मुजोर बनून ते कोणाचेच ऐकत नसल्याची टीका केली आहे.

काँग्रेस पक्षाने अधिक आक्रमक होऊन 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला' अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर पर्रीकर यांचे छायाचित्र लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न झाला यात तथ्य आहे; परंतु छायाचित्रातील पर्रीकर अत्यंत मलूल, निष्प्रभ वाटतात. मंत्र्यांनी अपल्या बैठकीनंतर पर्रीकरांची वागणूक व प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा दिला असला तरी ते पर्रीकर हे नाहीत, असे लोक म्हणतात.

पर्रीकरांनी एकेकाळी कठोरपणे राज्यकारभार हाताळला. मंत्र्यांमध्ये शिस्त आणली, अर्थव्यवस्थेला दिशा दिली व राजकारणात नैतिकता निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल धाक निर्माण झाला होता.

दुर्दैवाने ते आजारी असतानाच्या गेल्या सात महिन्यांच्या काळात राज्यकारभार संपूर्णत: ढेपाळला असून हे सरकार बरखास्त करणे चांगले, या निर्णयावर जनता पोहोचली आहे. 'लोकमत'ने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यातील जनमताचा कानोसा घेतला असता लोकांनी पर्रीकरांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे व संपूर्णत: बरे होऊनच मुख्यमंत्रिपदी परत यावे, असे सुचविले आहे. भाजपालाही राज्यकारभार कोसळला आहे व या परिस्थितीत भाजपाला लोकांचा प्रचंड रोष सहन करावा लागणार आहे, याचा अंदाज आलेला आहे. तरीही गोव्यात बदल होत नाही, याबद्दल सारेच आश्चर्य व्यक्त करतात.

Web Title: People do not want Parrikar in photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.