नऊवारी साडी, गॉगल आणि गजरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:23 AM2024-01-06T11:23:06+5:302024-01-06T11:27:38+5:30

आमीर खानच्या मुलीच्या लग्नात किरण रावने नेसलेल्या (घातलेल्या) नऊवारी साडीविषयी समाजमाध्यमात उलटसुलट चर्चा झाली. त्यानिमित्त..

Nauvari saree, goggles column about kiran rao's Nauvari Saree look | नऊवारी साडी, गॉगल आणि गजरा!

नऊवारी साडी, गॉगल आणि गजरा!

वैशाली शडांगुळे, आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर -

मला आठवतंय, मी पहिल्यांदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये माझं कलेक्शन सादर केलं तेव्हा माझ्यासोबत होती पैठणी. मी आपले जुने पारंपरिक पोत, नऊवारी सोबत घेऊन फॅशनच्या जगात आले. आणि आता गेली २० वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असतानाही माझ्यासोबत आपले स्थानिक, पारंपरिक कापडाचे पोत आहेत.  त्यात अर्थात नऊवारी अग्रणी आहे. मला वाटतं नऊवारी हा एक अत्यंत सुंदर, आकर्षक आणि त्याचवेळी अत्यंत आदबशीर-एलिगंट पोषाख आहे. 

ती साडी आपोआप नेसणाऱ्याच्या अंगकाठीचं वळण घेते, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जाते.  आपल्याकडे नऊवारीचीही किती रूपं आहेत. काष्टा कसा घातला, लुगडं कसं नेसलं, ब्राह्मणी वळणाची साडी कशी नेसली, खोळ, डोईवर पदर, खांद्यावरून पदर, निऱ्या कशा घेतल्या, साडी पायघोळ की जरा आखूड ठेवली कितीतरी पद्धती, किती प्रकारची कापडं, त्यांचा पोत हे सारं भुरळ पाडणारंच आहे. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या साडीत रंग, पोत, पेहराव, दिसणं यापलीकडे महत्त्वाची आहे ती सोय. नव्या शब्दात सांगायचं तर कम्फर्ट आहे. आजही गावखेड्यात काष्टा नेसून किती भराभरा कामं करतात. घरातली कामं करतात, बाहेरची उरकतात, शेतात राबतात. मला डिझायनर म्हणून या साडीत सर्वांत आधी काय दिसतं तर तो दिसतो हा कम्फर्ट.

मात्र, आता होतं काय, नऊवारी नेसणं जमत नाही किंवा येत नाही किंवा वेळ नाही म्हणून सर्रास शिवलेल्या नऊवारी ‘घातल्या’ जातात. मुळात नऊवारी नेसतात. साडी नेसणं आणि ड्रेस घालणं यात जो फरक आहे तोच नऊवारी नेसणं आणि शिवलेली नऊवारी घालणं यात आहे. मुळात नऊवारीचं वैशिष्ट्यच हे की ती साडी नेसली की आपोआप त्या-त्या अंगकाठीचा भाग होते, तिला एक वळण असते. सरसकट शिवलेल्या कपड्यात ते कसं असेल? आपल्या स्थानिक, पारंपरिक पोषाखांचा मान ठेवायाचा तर तो पोषाख घालण्याची पद्धतही शिकून घ्यायला हवी. त्यातले पोत, त्यातला ठहराव, ते घालून वावरण्याची रीत आणि सोय हे सगळंच महत्त्वाचं असतं. कारण त्यात केवळ पारंपरिकता नाही तर एक तंत्र आहे. त्या तंत्रातही एक अस्सलपणा आहे. त्या अस्सलपणाची, प्रत्येक वेळेस नावीन्याची (नव्या लूकची) शक्यता हेच त्या पोषाखाचे वैशिष्ट्य आहे. ते गमावून शिवलेला ड्रेस जर वापरणं सुरू झालं तर त्यातला अस्सल नावीन्याचा पारंपरिक बाजच हरवतो आणि उरतो तो केवळ एक बिनबाजाचा शिवलेला ड्रेस.

पोषाखातली पारंपरिकता हवी, त्यातला ठसका आणि व्यक्तिमत्त्व हवं तर त्याचं ‘तंत्र’, नेसण्याची कलाही शिकून घेणं हे जास्त सोपं नाही का?

मात्र, ते शिकायचं तर मुळात आपल्याला आपल्या पारंपरिक वस्त्रप्रावणात रस हवा. त्या कापडांचा पोत कसा असतो, अंगाखांद्यावर ते पोत कसे दिसतात हे सारं समजून शिकून घेणंही अतिशय सुंदर आहे. आपल्या पारंपरिक वस्त्रांमध्ये सर्वसमावेशकतेची एक सोय आहे. त्यासह अतिशय सुंदर असे कापडाचे रंग, पोत आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळाच्या परिभाषेतही ‘एलिगंट आणि कम्फर्ट’ या दोन पातळ्यांवर ते समकालीनच आहेत. 

हे सारं लक्षात घेऊन पारंपरिक पोषाख करायला हवे. तसे केले नाही तर केवळ मनाचं समाधान म्हणून ‘नऊवारीचा ड्रेस’ घातला तरी त्यात नऊवारी नेसण्याची ग्रेस, त्यातला डौल, वळण आणि आदब मात्र हरवून बसलेली असेल! पारंपरिकतेतलं नावीन्य आणि स्वीकारातली सहजता दोन्ही साधली पाहिजे.

Web Title: Nauvari saree, goggles column about kiran rao's Nauvari Saree look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.