मान्सून, सह्याद्री आणि पाणीच पाणी ! रविवार विशेष जागर

By वसंत भोसले | Published: July 29, 2018 01:03 AM2018-07-29T01:03:22+5:302018-07-29T01:09:02+5:30

गेल्या तीन आठवड्यांत झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातून मिळणारे पाणी साठविण्याचा विचार शंभर वर्षांपूर्वीपासून करण्यात येऊ लागला. म्हणून धरणे झाली. पाणीसाठा उभा राहिला. हा साठा जपायचा कसा ? नद्यांचे प्रदूषण रोखायचे कसे, याचा आपण केव्हा गांभीर्याने विचार करणार आहोत.

 Monsoon, Sahyadri and water only water! Sunday Special Jagar | मान्सून, सह्याद्री आणि पाणीच पाणी ! रविवार विशेष जागर

मान्सून, सह्याद्री आणि पाणीच पाणी ! रविवार विशेष जागर

Next

- वसंत भोसले
गेल्या तीन आठवड्यांत झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातून मिळणारे पाणी साठविण्याचा विचार शंभर वर्षांपूर्वीपासून करण्यात येऊ लागला. म्हणून धरणे झाली. पाणीसाठा उभा राहिला. हा साठा जपायचा कसा ? नद्यांचे प्रदूषण रोखायचे कसे, याचा आपण केव्हा गांभीर्याने विचार करणार आहोत.



उहाळा संपला. मान्सूनची चाहूल लागली की, संपूर्ण वातावरणच बदलून जाते. याची खूप मोठी प्रक्रिया आहे. दक्षिण अमेरिकेच्या जवळपास ती सुरू होते. भारतात नैर्ऋत्येच्या बाजूने प्रवेश करते. आपल्याकडील भाषेत मृग नृक्षत्राचा पाऊस म्हणतो. भारताच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर आठवडाभराने गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन पोहोचतो. तत्पूर्वी, हवामान खात्याच्या अभ्यासानुसार, अनेक अंदाज व्यक्त करण्यात येतात. त्याला खूप महत्त्व असते. मान्सूनच्या पावसाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पावसावरच संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्राची गरज तर अधिकच आहे. कारण महाराष्ट्रातील कोकण आणि सह्याद्री पवर्तरांगा वगळता उर्वरित महाराष्ट्रात सरासरी कमीच पाऊस पडतो. तो दोन भागात आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबर एकदा आणि त्याच्या प्रस्थानाबरोबर (परतीचा) असतो. त्याप्रमाणे खरीप आणि रब्बीच्या हंगामाची पेरणी होते. महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लागवडीखाली जमीन या दोन हंगामातील पावसावर अवलंबून असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दरवर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार का? झालेच तर पुरेसे असणार का? त्यात सातत्य राहणार का? आदी प्रश्नांनी सर्वजणच चिंतेत असतात. पावसाने ओढ दिली तर पेरण्या खोळंबतात. लवकर आला तर पेरण्या लवकर होतात, पण नंतर दांडी मारली तर पेरण्या वाया जाण्याची भीती असते. परिणामी, नंतर झालेल्या पावसाच्या आधारे दुबार पेरणीचे संकट उभे राहते. हा सर्व निसर्गाचा चमत्कार आहे. त्याने भरभरून देण्याचे ठरविले तर काही कमी पडत नाही. त्याच्यावर सर्वच व्यवहार सुलभ होतात. पेरण्या होतात, पिके फुलतात, बाजारपेठ बहरते आणि मळण्या होऊन धान्याची कोठारे भरून जातात. ज्यावर्षी उत्तम पाऊस होतो, त्याच्या पुढील दोन वर्षे चिंता करावी लागत नाही. १९८०च्या दशकापूर्वी ही परिस्थिती नव्हती. पहिल्या हरितक्रांतीनंतर सारे चित्रच बदलले. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन राजकीय नेतृत्वाने खूप विचार केला. नियोजन केले. शास्त्रज्ञांची मदत घेतली. अनेक भारतीय संशोधन संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जगाच्या पाठीवर पोट भरण्यासाठी हातात कटोरा घेऊन फिरणारा देश ही प्रतिमाच बदलून टाकली. १९७२ चा दुष्काळ पडला तेव्हा त्याच्यातून विस्थापित झालेल्या लोकांना आधार देण्यासाठी प्रचंड कार्य केंद्र आणि राज्य सरकारने केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुण्यातील शनिवार वाड्यासमोर झालेल्या जाहीर सभेत ‘महाराष्ट्राला येत्या काही वर्षांत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण केले नाही तर मला फासावर लटकवा,’ असे जाहीर केले होते. ही त्यावेळच्या नेतृत्वाची लोकांशी आणि कल्याणकारी राज्य व्यवस्था चालविण्याशी बांधीलकी होती. स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळक यांची घोषणा होती की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते की, ‘‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा.’’
स्वराज्याच्या काळातील वसंतराव नाईक यांची प्रतिज्ञाही त्याच तोडीची होती. मात्र, त्याला मान्सूनची साथही तेवढीच गरजेची होती. मान्सून पुरेसा झाला नाही तर आज सर्वच गणित बिघडून जाते. चालू वर्षी सर्वत्र नसला तरी कोकण, सह्याद्री पर्वतरांगा आणि दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात तो सातत्याने बरसतो आहे. जुलैच्या प्रारंभी पावसाला सुरुवात झाली आणि तीन आठवड्यांत सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले आहे. आॅगस्ट महिना उजाडण्यापूर्वी सर्व धरणे जवळपास भरत आली. चाळीस टक्केच पावसाळा संपला आहे. अजून खूप बाकी आहे. त्यामुळे आताच धरणांनी उच्चतम पातळी गाठली असल्याने सह्याद्री पर्वतरांगांतील धरणांचे दरवाजे उघडावे लागले. पावसाबरोबरच धरणातील पाण्याने नद्यांना पूर आला. जो नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. कर्नाटकाच्या सीमेपासून महाबळेश्वरच्या पायथ्यापर्यंतच्या कृष्णा खोºयातील जवळपास दोन डझन नद्यांना पूर आला. हे सर्व पाणी वाहत कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले. ते धरण १२४ टीएमसीचे आहे. ते केवळ तीन आठवड्यांत भरत आले. त्यातून १ लाख ७५ हजार क्युसेक्सने पाणी पुढे सोडण्यात आले. ते नारायणपूर धरणात जाऊ लागले. तेथून पुढे ते आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर धरणात साठेल.
मान्सूनच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. केवळ तीन आठवड्यांत सर्व चित्रच बदलून गेले. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमीच पाऊस झाला होता. मात्र, मानवाने निर्माण केलेल्या धरणातील पाणीसाठ्याच्या आधारे टंचाई किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. ही सर्व धरणे होण्यापूर्वी म्हणजे जवळपास १९५० पूर्वीदेखील हा मान्सूनचा पाऊस येत होता. सरासरी सध्या पडतो तेवढाच पडत होता. मात्र, या पावसाचे पाणी नद्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळत होते.
माणसाने प्रगती साधण्यासाठी निसर्गातील उपलब्धीवर अनेक प्रयोग केले. सह्याद्री पर्वतरांगांत पडणारे पाणी अडविण्याचे प्रयोग हे त्यापैकीच आहेत. याची सुरुवात शंभर वर्षांपूर्वी झाली. पुन्हा त्याचा पहिला मान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनाच जातो. १९०९ म्हणजे विसाव्या शतकाच्या प्रारंभीच त्यांनी दाजीपूरच्या जंगलातील भोगावती नदी वाटे वाहणारे पाणी फेजिवडे येथे अडविणारे धरण बांधण्याचे धोरण आखले. पुढील वर्षी टाटा उद्योग समूहाने कोयना नदीच्या खोºयात धरण बांधण्यासाठी सर्व्हे केला. तसेच पुण्याजवळ मुळशी आणि इंद्रायणी नदीवर धरणे बांधण्याचे नियोजन केले. इंग्रजांनी नगर जिल्ह्याचे पश्चिम टोक असलेल्या भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९१६ मध्ये धरण बांधण्याचा आरंभ केला. ते धरण दहा वर्षांनी डिसेंबर १९२६ मध्ये पूर्ण झाले. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक धरणे उभी राहिली. कृष्णा खोºयातील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी अडविण्याचे काम वेगाने करण्यात आले. कोयना, वारणा, दूधगंगा, उरमोडी, भोगावती आदी नद्यांवरील मोठ्या धरणांबरोबर अनके छोटी-छोटी धरणे झाली. त्यामुळे मान्सूनच्या पावसाने मिळणारे पाणी अडवून वर्षभर वापरण्याचे धोरण ठरले. ते राबविले गेले. परिणामी पाण्यातून निर्माण होणारी ऊर्जा शेती, उद्योग आणि शहरीकरणातून परिवर्तीत झाली. त्यातून प्रगतीचा मार्ग तयार झाला.
तो मार्ग चोखाळताना जी प्रगतीची दिशा दिसली, त्यात अनेक अडथळे आपण गैरवर्तनाने निर्माण केले आहेत. केवळ तीन आठवड्यांत एकोणपन्नास आठवड्यांची तजबीज झाली. त्याचे संवर्धन करण्यात आपण किती चुका करतो आहोत? मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आपण पर्यावरणाने दिलेल्या या देणगीचे आपणास मूल्य कळत नाही, असे आता वाटत आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिलेल्या मार्गाला आता शंभर वर्षे होऊन गेली. त्यांच्या विचारानेच महाराष्ट्रानेही पुढे प्रगती साधली. आता दुसरा टप्पा आला आहे. या शंभर वर्षांत मानवी वस्ती वाढली. नागरीकरण झाले. प्रत्येकाला नळाच्या पाण्याने घरोघरी पाणी देण्याचेही प्रयत्न झाले. त्यालाही बºयापैकी यश आले. आपण राजर्षी शाहू महाराजांच्या या मार्गाने गेल्याने सुखी-समाधानी झालो आहोत.
काही कामानिमित्त मराठवाड्याच्या बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांत गेल्याच आठवड्यात जाण्याचा प्रसंग आला. या तिन्ही जिल्ह्यांसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा मुख्य आधार गोदावरी नदी आहे. या नदीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जायकवाडी धरण आहे. यामध्ये १०२ टीएमसी पाणीसाठा होतो. या धरणाच्या बळावरच औरंगाबाद शहराची आणि तेथील औद्योगिक प्रगतीची दिशा स्पष्ट झाली. मोठी झेप या शहराने घेतली. सुमारे ५० किलोमीटरच्या असलेल्या या धरणातून पाणी औरंगाबादला आणले आहे. तसेच ते जालना शहरासाठी आणण्यात आले आहे. सुमारे ६५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहराला एक पाईपलाईन टाकण्यात आली आहे. जालना शहरात असताना एक कटू कहाणी ऐकण्यास मिळाली. या शहराला पाणी देण्यासाठी गोदावरी नदीतून पूर्वी एक नळयोजना करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील गेवराई आणि जालना जिल्ह्यातील शहागड येथून ही नदी वाहते. तेथून पाणी उचलण्यात आले, पण पाणीसाठा करण्याची काही व्यवस्था नव्हती. २० वर्षांतच ही योजना कालबाह्य झाली. म्हणून दुसरी योजना २५० कोटी रुपये खर्चून जायकवाडी धरणातून करण्यात आली. पैठणहून ते पाणी जालना शहरात आले, पण शहरातील नळयोजना करण्यात आली नाही. परिणामी, आठवड्यातून एकदा जालना या जिल्हा केंद्राच्या शहरात पाणी घरोघरी येते.
पावसाने पाणी आले. ते मानवाने अडविले, पण वितरण करण्याचे योग्य


नियोजन नसेल तर काय होते? याचे हे उदाहरण आहे. दक्षिण महाराष्ट्रात यापेक्षा वेगळी स्थिती आहे. धरणांद्वारे पाणीसाठा झाला. त्याद्वारे वर्षभर पाणी देण्याच्या असंख्य योजना करण्यात आल्या. केवळ पिण्याच्या पाण्याच्या नळयोजना नव्हेत, तर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या उपसा जलसिंचन झाल्या. औद्योगिक वसाहतींसाठी पाणी देण्यासाठी योजना करण्यात आल्या. या सर्व पाण्याचा वापर करून सोडलेल्या सांडपाण्याचे आता संकट उभे राहिले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कोसळलेल्या धारांमधून आलेले पाणी सर्व नद्यांही स्वच्छ करून गेले. मे आणि जून महिना आठवून पहा. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल अनेक गावांतून असंतोष व्यक्त होत होता. तो आता आलेल्या पुराबरोबर शांत झाला आहे. निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याचे संवर्धन करण्याची आता पुढची पायरी आहे. जालना शहराला जायकवाडी धरणातून साठवून आणून दिलेले पाणी घरोघरी देता येत नाही, हे दुर्दैव आहे. तसेच सर्वच नद्यांवर पाणी साठवण यंत्रणा उभारून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याची नासाडी थांबवायला नको का आपण सारे? आता नद्यांतील वाहते पाणी थांबले. धरणातील साठलेले पाणी घरोघरी आले. ते वापरून सोडून दिले. ते नद्यांमध्ये मिसळले. नद्या खराब झाल्या की मग ओरड करणार की, प्रदूषण थांबले पाहिजे!
आपला सर्व प्रवास तपासून पाहण्याची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यावेळची गरज ओळखून पाणी अडविले. ती किती सुंदर कल्पना आहे. भोगावती नदीचा उगम जेमतेम पंचवीस किलोमीटरवर धरणापासून आहे. तेवढ्याशा पाणलोट क्षेत्रात आठ-दहा दिवस तुफान पाऊस झाला आणि राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडून पाणी नदीत वाहू लागले. पाण्याची पातळी वाढली. नदी पात्राबाहेर पडली. आपण आनंदित झालो. भोगावती नदीच्या पात्रात यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही. केवळ हा चमत्कारच आहे. निसर्गाच्या दानत्वावर राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले मंदिर आहे. अशा प्रकारे आपण उभ्या केलेल्या मंदिरातून वाहणारे पाणी पवित्र राखणार कसे? शंभर वर्षांनंतरचा समाज बदलला. तंत्रज्ञान बदलले. जीवन पद्धती बदलली. नदीला किंवा विहिरीला अंघोळ करणारे आपण सारे शॉवरखाली उभे राहू लागलो.
दरमाणशी पाण्याचा वापर वाढला. तो कमी होता. त्याला मागासपणाचे एक लक्षण मानले जात असे. नव्या अर्थशास्त्रीय भाषेत दरमाणसी पाणी किती उपलब्ध आहे आणि ते सर्वांना मिळते का? भाजीपाला, दूध, फळे, उत्तम अन्नधान्य किती उपलब्ध होते आणि मिळते त्यावर व्याख्या बनू लागल्या, अशा वळणावर आपण आलो आहोत. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या आणि मानवाने प्रगतीसाठी केलेल्या नव्या रचनेचा आदरपूर्वक वापर करायला हवा आहे, अन्यथा पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या प्रदूषणासाठी नोव्हेंबरपासून चर्चा करीत बसणार आहोत. धरणे, नळयोजना पाणी साठवण, शुद्धीकरण आदी टप्पे झाले आहेत. आता पुढे जाऊया. घरा-घरांत पाणी आणण्याचा प्रयोग शंभर वर्षांत पूर्ण झाला आहे. ते पाणी निसर्गाकडे परत जाताना त्यात आपण जे मिसळतो, त्याचा विचार व्हायला हवा आहे, अन्यथा आपण निसर्गाने दिलेले पाणी, अनेक नियोजनकर्त्यांनी ते धरणाद्वारे साठवून दिलेले पाणी पुढे वापरता येणार नाही. पूर्वी निसर्गाचे पाणी निसर्गात अशुद्ध न होताच मिळत असे. ते आता बारमाही उपलब्ध होण्यासाठीचे प्रयत्न झाले. त्याला यशही मिळाले.
अपयश कोठे आहे? ते शोधण्याची गरज आहे. आपल्याला शहरातील, गावातील, कारखान्यातील, घरातील पाणी, कचरा आणि इतर वस्तू एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्याचे नवे धोरण स्वीकारावे लागेल. यासाठीच राजर्षी शाहू महाराज यांचा मार्ग आणि जालना शहराची अवस्था याची तुलनात्मक नोंद येथे केली. निसर्गाने दिलेले सर्वच जपता आले नाही तर आपण विनाशाकडे जाऊ. हा विनाश न परवडणारा आहे. कारण त्यात शुद्धता कमी असणार आहे. यासाठी मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातून मिळणारे पाणीच पाणी याचा केव्हा गांभीर्याने विचार करणार आहोत. हा विचार शंभर वर्षांपूर्वीपासून करण्यात येऊ लागला. म्हणून धरणे झाली. पाणीसाठा उभा राहिला. हा तीन आठवड्यांचा चमत्कार आपण जपण्याचे नवे नियोजन आखूया!

Web Title:  Monsoon, Sahyadri and water only water! Sunday Special Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.