ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:54 AM2019-03-27T02:54:02+5:302019-03-27T02:54:16+5:30

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही.

This is the monarch; Transit is the debatable issue of Indian democracy | ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष

ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष

Next

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही. अमेरिकेच्या लोकशाहीलाही ३०० वर्षे होत आली, पण त्याही देशात कोणत्या मोठ्या नेत्याने पक्षांतर केले, असे कधी दिसले नाही. त्या दोन देशांतील पक्ष विचारसरणीवर आधारले आहेत आणि विचारात होणारे भेद वादविवाद, चर्चा व संवाद या मार्गाने मिटविणारी व्यासपीठेही त्या देशात आहेत, शिवाय तेथे पक्षांतर्गत लोकशाही आहे. प्रत्येकच निवडणुकीत, मग ती अध्यक्षांची असो, सिनेटरांची वा मेयरच्या पदाची, तेथील उमेदवारांना त्यांची लोकप्रियता प्रतिस्पर्धी उमेदवारांशी जाहीर वादविवाद करून जनतेत सिद्ध करावी लागते. नेत्याने तिकिटे द्यायची आणि लोकांनी मते द्यायची, हा हिंदुस्थानी प्रकार तेथे नाही. भारतातले पक्ष जात व धर्मासारख्या जन्मदत्त श्रद्धांवर उभे आहेत. येथे एकेक जातीचे पक्ष आहेत, तर काही जातींच्या बेरजा करून तयार झाले आहेत. त्यामुळे भारतात पक्षांतर म्हणजे जात्यंतर किंवा धर्मांतर होते व ईश्वरी अपराध होतो. म्हणून पक्षाचे पुढारी सांगतील तिकडे पाहणे व ते नेतील तिकडे जाणे, यातच पक्षनिष्ठा आहे असा समज आहे. या समजाला धक्का तेव्हा बसतो, जेव्हा त्यातल्या एखाद्याचे व्यक्तिगत हितसंबंध दुखावले जातात. हा धक्का वैचारिक मतभेदातून येत नाही, तो खासगी स्वार्थातून येतो. शरद पवारांपासून विजयसिंह मोहिते पाटलांनी पुत्रासह दूर जाणे किंवा काँग्रेसचे विधानसभेतील नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवाने भाजपाच्या तिकिटावर उभे राहणे यात वैचारिक परिवर्तन वा हृदयपरिवर्तन नाही. जुना नेता तिकीट देत नाही, हा राग आहे किंवा ‘त्यांनी आम्हाला नेहमीच मागे ठेवले’ हा रोष आहे. दोन-दोन आणि तीन-तीन पिढ्या सत्ता भोगलेल्या घराण्यांतली माणसे असे वागताना पाहिली की, मग या प्रकारात जात्यंधतेहून घराणेशाहीचा स्वार्थच बळकट झाला असल्याचे दिसते. साऱ्या देशाचे चित्र असे आहे. लालूप्रसाद, रामविलास पासवान, करुणानिधी, विजयाराजे शिंदे किंवा मुलायम सिंग यांच्या घरातली किती माणसे त्यांच्या पक्षात सर्वोच्च जागी व सत्तेत आहेत? हा प्रकार आता संघप्रणीत भाजपानेही अनुसरायला सुरुवात केली आहे. फडणवीस, खडसे, मेघे, अडवाणी, जोशी किंवा त्यांच्या पक्षांच्या किती खासदार व आमदारांची पिले त्या पक्षाने विधिमंडळ व संसदेते पाठविली आहेत? एकट्या नेहरू-गांधी कुटुंबावर टीका करणारी माणसे या पक्षांच्या घराणेशाहीविषयी बोलत नाहीत, तेव्हा ती कुणाची फसवणूक करीत असतात? त्या मौनामागे ही घराणेशाही मान्य असल्याचे कारण आहे. पवारांच्या घरातली व नात्यातली किती माणसे सत्तेवर आहेत आणि प्रत्यक्ष सत्तापद घेत नसतील, तरी ठाकरे कुटुंबाच्या नियंत्रणात किती सत्तापदे आहेत? साधे तिकीट मिळाले की, घरातल्या इतरांची सोय करायला धडपणारी ही माणसे पक्षांतर्गत लोकशाही कशी आणतील? आणि पक्षांतर्गत लोकशाहीवाचून देशातील लोकशाही कशी उभी होईल? अमेरिकेत जॉन केनेडींच्या तिसºया भावाने सिनेटची निवडणूक लढविली, तेव्हा ‘देशात केनेडींची साथ सुरू झाली’ अशी टीका तेथे झाली. जोवर राजकीय पक्ष, विचार, कार्यक्रम आणि तत्त्वज्ञान यावर उभे होत नाहीत, तोवर आपल्या राजकारणातील घराणेशाही, जातीयता व धर्मांधता अशीच राहणार आहेत. त्यातूनच विचारांहून मोदी मोठे होतात आणि त्यांचे भक्त म्हणवून घेणाऱ्यांनाही आपला अभिमान वाटू लागतो. हीच गोष्ट राहुल गांधींची, ममता बॅनर्जींची, लालूंची, पवारांची आणि ठाकरेंचीही. कदाचित, जुनी राजेशाही व बादशाही वृत्ती आपण अजून टाकली नसावी आणि परंपरागत चालत आलेली सरंजामी वृत्ती श्रीमंतांसह गरिबांनी अजून तशीच जपली असावी, असे वाटायला लावणारे हे चित्र आहे. हे नेमके कशाचे द्योतक आहे? जुनी मानसिकता आपण अद्याप का झटकू शकत नाही? कदाचित, साध्या, सामान्य व बुद्धिमान नेतृत्वाहून आम्हाला राजांचे किंवा राजांसारखे असणा-यांचे नेतृत्वच अधिक भावत असावे!

 

Web Title: This is the monarch; Transit is the debatable issue of Indian democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.