मोदी जाकीट.... खादी पाकीट... !

By सचिन जवळकोटे | Published: January 6, 2019 12:10 AM2019-01-06T00:10:01+5:302019-01-06T00:10:49+5:30

लगाव बत्ती

Modi jacket ... khadi wallet ...! | मोदी जाकीट.... खादी पाकीट... !

मोदी जाकीट.... खादी पाकीट... !

Next

- सचिन जवळकोटे

एकीकडं ‘हॅण्ड फ्री इंडिया’चा नारा देत पुन्हा एका नव्या वादळाची तयारी सोलापुरातून सुरू करण्यासाठी ‘मोदी टीम’ आसुसलीय. मात्र दुसरीकडं याच टीमचे सुसंस्कृत अन् सभ्य मेंबर सोलापूरच्या महापालिकेत ‘राहुलबाबां’चं एकमतानं अभिनंदन करण्यात मश्गुल झालेत...अन् हे कौतुकही कशासाठी? ...तर ‘मोदी-शहा’ जोडीच्या युद्धनीतीची पुरती धूळधाण उडवून त्यांनी चार राज्यात ‘हात’भर यश मिळविलं म्हणून.. आहे की नाही गंमत? मग वाट कशाची बघताय..
.. लगाव बत्ती !

दिल्लीतली हुकूमशाही.... गल्लीतली लोकशाही !

‘दिल्लीतील हुकूमशाही’बद्दल गेल्या पावणेपाच वर्षात देशभर चर्चा झाली. सोलापूरमध्ये मात्र याच ‘कमळ’वाल्यांच्या पार्टीत खºया अर्थानं ‘गल्लीतील लोकशाही’ नांदत असल्याचा प्रत्यय पदोपदी येतोय. इथं कुणाचाच कुणावर अंकुश नाही. ‘सुभाषबापू’ काळे की गोरे, हे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘विजूमालकां’ना माहीत नाही. ‘मालकां’च्या केसाला कलर कोणता, हे ‘बापूं’ना ठाऊक नाही.. कारण दोघांनीही एकमेकांचं तोंड म्हणे तोंडदेखलंही कधी बघितलं नाही. याचाच कित्ता त्यांच्या चेल्यांनीही ‘इंद्रभुवन’मध्ये गिरविलेला. ‘महापौरतार्इं’नी ‘विजू मालकां’वर केलेल्या टीकेमुळे ‘पक्षाची शोभा’ किती वाढली, हे माहीत नाही... मात्र ‘सुरेश अण्णां’च्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘संजू’नी साधलेल्या निशाण्यात ‘बापूं’चे अनेक बंदे घायाळ झाले. कुणीही उठावं अन् काहीही करावं, एवढं ‘भरभरून स्वातंत्र्य’ या मंडळींना पार्टीनं दिल्यामुळंच की काय.. इंद्रभुवनमध्ये परवा सोलापुरी इतिहासातला सर्वात मोठा जोक घडला. चार राज्यात कमळाच्या पाकळ्या कुस्करण्यात ‘राहुलबाबां’ना प्रचंड यश मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. महापौर त्यांच्या. सत्ता त्यांची. बहुमतही त्याचं.. तरीही त्यांचाच पराभव करणाºया विरोधकांचं अभिनंदनही त्यांनीच केलं. कुणी याला ‘दिलदारी’ म्हणालं.. कुणी ‘बालबुद्धी लयऽऽ भारी’ म्हणत सत्ताधाºयांच्या अकलेची खिल्लीही उडविली. 

‘पार्टी इमेज’चं डीलिंग करायलाही नेते माहीर..

भर सभागृहात आपल्याच पराभवाचं कौतुक करणाºया या ‘कमळ’छाप मंडळींच्या ‘अकलेचा कांदा’ शहरभर वास मारत सुटला असला तरी खरी मेख वेगळीच होती. आतली गोम दुुसरीच होती. आपल्याच जखमेवर मीठ चोळणारी ही मंडळी ‘खुळी’ नव्हे तर भलतीच ‘चाणाक्ष’ होती. ‘हात’वाल्यांचा ‘राहुलबाबां’च्या अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर करण्याच्या बदल्यात आपल्याला हवे असणारे इतर अनेक फायद्याचे ठराव पदरात पाडून घेण्याचं हे ‘डील’ होतं. ‘पार्टीची इमेज गेली खड्ड्यातऽऽ’ म्हणत लाखोंची कामे पटाऽऽपटा खिशात टाकण्याची ही चतुर खेळी होती. आता ही अफलातून नीती नेमकी कोणाच्या सुपीक डोक्यातून जन्माला आलेली, हे केवळ ‘शोभाताई’ किंवा ‘संजू’ यांनाच माहीत. मात्र या प्रकारामुळं ‘चेतनभौ’ एकदम खुश झाले.. कारण आपापसात भांडणाºया दोन बोक्यांना झुलवत लोण्याचा गोळा स्वत:च लाटणाºया चतुर वानराची कहाणी सोलापूरकरांंना आठवून गेली नां...लगाव बत्ती !

सध्या दोन्ही देशमुखांचे गट सभागृहात एकमेकांना मदत करत नसल्यानं ‘महेशअण्णा’ अन् ‘चेतनभाऊ’ यांना पुन्हा एकदा चांगले दिवस आलेत. अशातच ‘स्टॅण्डिंग कमिटी चेअरमन’ नसल्यानं दोन पेट्यांच्या पुढील कामांच्या ‘ठरावांची किंमत’ वाढलीय.. अन् याच मंजुरीसाठी दोन्ही गटांच्या हतबलतेचा पुरेपूर फायदा ‘अण्णा अन् भाऊ’ उचलत असल्यानंच ही नामुष्की ‘कमळ’वाल्यांवर आलेली. येत्या बुधवारच्या सभेत ‘पार्क’वर पुन्हा एकदा ‘मोदींचं जाकीट’ भलंही चमकेल; मात्र समोरच्याच ‘इंद्रभुवन’मध्ये ‘खादीचं पाकीट’ काळवंडलं.. त्याचं काय? 
खरंतर, ‘अण्णा अन् भाऊ’ यांची एकेकाळी जिगरी दोस्ती. ‘तात्यां’च्या दर्शनाशिवाय ‘भाऊ’चा एकही दिवस उजाडला नसावा, एवढा त्यांचा मुरारजी पेठेतल्या बंगल्यावर राबता. मात्र राजकारणातली निष्ठा बेगडी असते, हे तमाम सोलापूरकरांनी पाहिलेलं. ‘महेशअण्णा’ खांद्यावर ‘धनुष्यबाण’ लटकवून वनवासाला निघाले, तेव्हा ‘भाऊं’नी बदलत्या वाºयाची दिशा ओळखून पटकन् ‘जनवात्सल्य’चा दरबार पकडला. दर्शन घेण्याची स्टाईल तीच राहिली; फक्त समोरचे पाय बदलले. बंगल्याची जागा बदलली. आताही ‘सोलापूरच्या सुपुत्रां’शी जवळीक साधण्याची त्यांची केविलवाणी धडपड झेडपीसमोरच्या पार्टी भवनात चेष्टेचा विषय बनलेली. मात्र ‘जाई-जुई’नं आजपावेतो अशा कैक मंडळींच्या निष्ठा अनुभवलेल्या, पारखलेल्या. त्यामुळं वर्षानुवर्षांची ‘तात्यां’ची साथ सोडून झटक्यात आपल्याकडं येणाºयांची निष्ठा ओळखण्याइतपत सुपुत्र नसावेत नक्कीच भोळे..लगाव बत्ती !

..माढ्याचा उमेदवार कोण ? ..सोलापूरचे खासदार दिसणार?

सोलापुरातल्या दोन देशमुखांबद्दल लिहावं तेवढं कमी. बोलावं तेवढं कमी.. तेव्हा आता आपण जरा माढा मतदारसंघातल्या देशमुखांकडं वळू. ‘माण’चे ‘प्रभाकर’ सध्या सातारा कमी अन् सोलापूर जिल्ह्यातच जास्त दिसताहेत. आम्हा पामराच्या अंदाजानुसार माढा मतदारसंघातली त्यांची अंतर्गत प्रचाराची एक फेरीही म्हणे पूर्ण झालीय. ‘आयुक्त’ असताना त्यांना जेवढे ‘मंडलं’ माहीत होते, त्याहीपेक्षा जास्त ‘गावं’ त्यांना ‘भावी उमेदवार’ म्हणून पाठ झालीयंत.
अशातच ‘थोरले काका बारामतीकरां’नी सहा मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं फायनल केली. आजपावेतो कोल्हापुरात घड्याळाला सर्वाधिक त्रासदायक दिलेल्या ‘मुन्नां’नाही हिरवा कंदील दाखविला. मात्र बिच्चाºया ‘अकलूजच्या दादां’ना प्रतीक्षेतच ठेवलं. त्यांना अजून किती वाट पाहावी लागणारंय कुणास ठाऊक? 
जाता-जाता.. सोलापूरकरांना ‘मोदी’ नाव तसं नवीन नाही. सात रस्त्याजवळचा ‘मोदी परिसर’ तसा खूप जुना. पोलीस चौकीही ‘मोदी’ नावानंच ओळखली जाणारी.. मात्र, बरीच वाट पाहून-पाहून थकलेल्या सोलापूरकरांना आता मोदी दौºयामुळं आशा निर्माण झालीय. ती म्हणजे बुधवारी ‘पार्क’वरच्या सभेत तरी सोलापूरच्या लाडक्या खासदार वकिलांचं दर्शन होईल...लगाव बत्ती !

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत. )

 

Web Title: Modi jacket ... khadi wallet ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.