विवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:35 AM2019-01-24T04:35:58+5:302019-01-24T04:36:05+5:30

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९२६ साली ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा अतिशय महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ लिहून ठेवला आहे.

Marriage means no fellowship; Symbiosis! | विवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन!

विवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन!

googlenewsNext

- वर्षा विद्या विलास

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९२६ साली ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा अतिशय महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ लिहून ठेवला आहे. या ग्रंथाला तत्कालीन धर्ममार्तंडांनी तीव्र विरोध केला. मात्र, तरी आजही हा ग्रंथ शाबूत आहे. या ग्रंथात वि. का. राजवाडे यांनी एकूणच भारतीय विवाह संस्थेविषयी प्रचंड अभ्यासपूर्ण असे संशोधन मांडले आहे. आज या ग्रंथाची आठवण येण्याचे कारण एवढेच की, भारतीय समाजाची विवाह संस्थाच आज धोक्यात आली आहे. एकट्या मुंबई शहरात हजारो जोडपी घटस्फोट घेऊन विभक्त झाली आहेत, तर तितक्याच जोडप्यांचा निकाल अजून कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळेच भारतीय विवाह संस्था इतकी खिळखिळी होण्याची नेमकी कारणे शोधणे आज क्र मप्राप्त आहे.
खरे तर भारतीय विवाह संस्था अशी अधू होण्यामागे भारतीय विवाह संस्थाच कारणीभूत आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, भारतीय विवाह संस्थेकडे स्त्री-पुरुष यांच्यातील नातेसंबंधांना सामाजिक प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवून देणारी संस्था या एकाच दृष्टिकोनातून पाहिले गेले. आजही पाहिले जात आहे. दोन भिन्न लिंगी व्यक्तिंना एकत्रित राहण्यासाठी जे सामाजिक संकेत पाळण्याची आवश्यकता सांगितली जाते, त्याची सुरुवात ‘विवाह’ या शब्दापासून होते. जोवर स्त्री आणि पुरुष विवाहबद्ध होत नाहीत, तोवर त्यांना एकत्र राहण्याचा सामाजिक अधिकार नाही, असे आपल्याकडील सामाजिक संकेत आहेत. आज जरी भारतात लिव्ह-इन-रिलेशनशिपला महत्त्व प्राप्त झाले असले, तरीही अशा जोडप्यांना अद्याप समाजात पती-पत्नी म्हणून मान्यता दिली जात नाही, हे वास्तव आहे आणि म्हणूनच वाढत्या घटस्फोटांचे कारण शोधायचे असेल, तर या समस्येच्या मुळाशी जावे लागेल.
आपल्याकडे अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज अशा दोन पद्धतीने विवाह करण्याचा प्रघात आहे. यातही लव्ह मॅरेजला अद्याप पूर्णत: सामाजिक मान्यता मिळालेली नाही. आॅनर किलिंगच्या घटनांची आकडेवारी पाहिल्यास ही गोष्ट सहज लक्षात येऊ शकते. मात्र, काही प्रकरणांत लव्ह कम अरेंज असा सोईचा मार्ग काढून उभयतांचे लग्न लावून दिले जाते. मात्र, हे लग्न लागताना किंवा लावून दिले जात असताना, जे वैचारिक संस्कार त्या जोडप्यावर व्हायला पाहिजे, तसे संस्कार करण्याचे/होण्याचे कोणतेच मार्ग आपल्या आजच्या विवाह संस्थेच्या कार्यपद्धतीत नाहीेत.
परंपरेने चालत आलेले विधी करणे म्हणजेच विवाह अशीच धारणा आजही आपल्या समाजात रूढ आहे. अशा प्रकारांमुळे वराला आपण नवरा झालो, म्हणजे नेमके कोण झालो, हेच माहीत नसते. त्याचप्रमाणे, वधुलाही आपण बायको झालो, म्हणजे नेमके कोण झालो, हे माहीत नसते. पाठवणीच्या वेळेस मात्र, मुलीचे आई-वडील, नातेवाईक तिला सांगतात की, दिल्या घरी सुखी राहा! इथेच खरी गोम आहे. २०-२२ वर्षे जी मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहिलेली असते, तिला एके दिवशी अचानकच दिल्या घरी सुखी राहा, असे सांगून दुसऱ्या घरी पाठविले जाते. यात केवळ त्या मुलीचे घर बदलत नाही, तर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मानसिक संक्रमण होण्याची वेळ बहुधा भारतीय स्त्रीवरच येत असावी. तिचा रोजचा चहाचा कप, टॉवेल, हातरुमाल सारे काही एका दिवसात बदलून जाते. हा बदल पचविताना त्या मुलीच्या मानसिक स्थितीचा विचार करणे खरोखरच खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत जर ते नवे घर आणि त्या घरातील नवºयासकट सारी माणसे त्या मुलीला समजून घेणारी निघाली नाहीत, तर मात्र सारेच कठीण होऊन बसते आणि इथेच घटस्फोटाची पहिली ठिणगी पडते.
मुळात विवाह किंवा लग्न करणे म्हणजे एक मालकीची व्यक्ती घरात आणणे ही मानसिकता अलीकडच्या काळात चांगलीच बळावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचे कारण केवळ शिक्षणाचा अभाव एवढेच नाही, तर आपल्या समाज व्यवस्थेत स्त्रीचे जे स्थान आजही आहे, त्या स्थानाविषयीच्या आकलनात याचे कारण दडले आहे.
बाबा आमटे आणि साधनाताई आमटे हे जोडपे सर्वात वरच्या स्थानावर आहे. बाबा आणि साधनाताई केवळ एकत्र राहिले नाहीत, तर ते एकत्र जगले. या दोघांनी एकत्र काम केले आणि समाजा पुढे आदर्श पती-पत्नीचा किंबहुना आदर्श जोडीदाराचा एक पायंडा घातला. डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, ज्यांनी सहजीवनाचे महत्त्व या समाजाला पटवून दिले आहे. मात्र, या सगळ्याकडे पाहायला कुणालाच वेळ नाही. एकमेकांतील संवाद संपणे हेही या समस्येमागील एक कारण आहे. जोडीदारांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, आपल्या अडचणी, तक्र ारी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. ही नि अशी अनेक कारणे आहेत, जी आज विवाहितांना कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडत आहेत. म्हणूनच जर हा फारकतीचा मुद्दा कायमचा निकालात काढायचा असेल, तर सहवासापेक्षा सहजीवनाला महत्त्व द्यावे लागेल. याशिवाय दुसरा पर्यायच नाही! अजूनही वेळ सरलेली नाही. विभक्त होण्यापेक्षा एकसंध व्हा आणि सहजीवनाचा आनंद लुटा!
(सामाजिक कार्यकर्त्या)

Web Title: Marriage means no fellowship; Symbiosis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.