मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:20 AM2017-09-15T00:20:52+5:302017-09-15T00:21:03+5:30

माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात.

Manechee Ganthi - Rangan ki Mane ... | मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

Next

- प्रल्हाद जाधव
माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात. मात्र माणसांचे रंग किती, याची अधिकृत यादी कोणी तयार केलेली दिसत नाही. ती करता येईल असेही वाटत नाही. शेक्सपिअरने आपल्या ३६ नाट्यकृतींमधून मनुष्य स्वभावाचे सारे नमुने टिपले आहेत, असे म्हणतात. पण या मताशी कदाचित शेक्सपिअरही सहमत झाला नसता. त्याच्या लेखनात आध्यात्मिक विचारांचा अभाव आहे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलेच आहे. तात्पर्य काय, तर माणसाच्या रंगांची मोजदाद करता येणे अवघड आहे.
एखाद्या माणसाला आपण सरड्यासारखे रंग बदलणारा, अशी उपमा देतो. प्रत्यक्षात हा सरड्याचा अपमान आहे. कारण मातकट, लाल, पिवळा, हिरवा अशा चार-पाच छटा सोडल्या तर त्या पलीकडे सरड्याला रंग बदलता येत नाहीत. माणूस मात्र असंख्य रंग धारण करू शकतो. इतके की त्या रंगांचे माणसाला नामकरणही करता येऊ शकत नाही. सरडा संकटाच्या वेळी आणि तेही स्वसंरक्षणार्थ रंग बदलतो. माणूस मात्र त्याच्या मनात येईल तेव्हा आणि सोईनुसार रंग बदलताना दिसतो. प्रसंगी, तो मी नव्हेच असे म्हणत आणखी एखादा रंग दाखवतो. कधी आपल्या रंग बदलण्याच्या करामतीचा अभिमान बाळगत, रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा असे म्हणायलाही मोकळा असतो.
एखाद्या माणसाकडून अपेक्षाभंग झाला की, त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असे आपण म्हणतो. केसाने गळा कापणारी, पाठीत खंजीर खुपसणारी, आश्वासने देऊन फसवणारी, विविध आमिषे दाखवून भुलवणारी सारीच माणसे कोणता ना कोणता रंग धारण करीत असतात. काही रंग गडद तर काही हलके, काही साधे तर काही विषारी असतात. काही रंग पुसट होत जातात तर काहींचे डाग आयुष्यभर जात नाहीत. रंगांपासून कुणाचीच सुटका नाही. कोळशाच्या खाणीत काम करणाºया माणसाला जसे काळ्या रंगाशी जुळवून घ्यावे लागते तसेच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रंगाचा सामना करावाच लागतो. प्रेम, वात्सल्य, भक्तीचेही सरळ साधे रंग असतात. यातील आपला रंग कोणता हे जाणून घ्यायचे झाले तर त्यासाठी मनाचा आरसा स्वच्छ, लखलखीत ठेवणे आवश्यक असते, पण त्यावरही बºयाचदा धूळ बसलेली असते !
 

Web Title: Manechee Ganthi - Rangan ki Mane ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.