अग्रलेख: पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’? पुण्यातील टोळीयुद्धाची चर्चा ऐरणीवर; कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:19 AM2024-01-08T07:19:01+5:302024-01-08T07:20:28+5:30

कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी दुपारी भर दिवसा पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली

Main Editorial on Pune Gang war and murder of Gangster Sharad Mohol | अग्रलेख: पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’? पुण्यातील टोळीयुद्धाची चर्चा ऐरणीवर; कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा

अग्रलेख: पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’? पुण्यातील टोळीयुद्धाची चर्चा ऐरणीवर; कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा

कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी दुपारी भर दिवसा पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली. पुण्यातील टोळीयुद्धाची चर्चा त्यामुळे पुन्हा ऐरणीवर आली. कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पोलिसांनी नंतर तातडीने कारवाई करून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यात दोन वकीलही असल्याचे समजते. मोहोळ याच्या साथीदारानेच त्याला मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिस तपासात आणखी अनेक बाबी समोर येतील; पण यानिमित्ताने टोळीयुद्ध, कायदा-सुव्यवस्था आणि सामान्य नागरिकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याला असलेली राजकारणाची  किनार अधोरेखित करावी लागेल. पुण्यात मारणे, मोहोळ टोळीची दहशत आहे. गुंड गजानन मारणे, हत्या करण्यात आलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल होते. दोघेही मुळशी गावचे. नंतर पुण्यातील कोथरूड भागात राहायला आले. मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची २००६ मध्ये बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळ याने हत्या केली होती. या हत्येनंतर पुण्यात खऱ्या अर्थाने टोळीयुद्धाला सुरुवात झाली. या हत्येचे प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळ याची हत्या केली.

मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट गुंड संदीप मोहोळ याच्यावरच बेतलेला होता. या संदीप मोहोळच्याच गाडीवर ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता. संदीपची हत्या शरद मोहोळच्या गुन्हेगारी विश्वातील प्रवेशाचा भाग ठरली. शरदने संदीप मोहोळ हत्येतील सूत्रधार किशोर मारणेची हत्या केली. या प्रकरणात शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर तो जामिनावर बाहेर आला. २०१२ मध्ये शरद मोहोळ तुरुंगात असताना दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा जेलमध्ये खून झाला. या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. गुंड गजानन मारणे याचीही कहाणी वेगळी नाही. पुण्यात त्याची दहशत आहे. तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर निघालेली त्याची मिरवणूक चर्चेचा विषय ठरली होती. खंडणी मागितल्याप्रकरणी गजा मारणेला जामीन मिळाला आणि तो पुन्हा बाहेर आला. या टोळीयुद्धाला राजकारणाचीही किनार आहे. गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ या नेत्यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

याखेरीज अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या गुंडांचे समर्थक. तळोजा जेलमधून गजा मारणेची निघालेली भव्य मिरवणूक पाहता या गुंडांचे वर्चस्व लक्षात यावे. गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर ससून रुग्णालयाबाहेर पाचशे ते सहाशे जण होते. तणावाची परिस्थिती होती. शरद मोहोळच्या हत्येनंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांचा बंदोबस्त करण्यास पोलिस सक्षम असल्याचे विधान केले. मात्र, याच गुंडांच्या नातेवाइकांना पक्षप्रवेश देण्यामागचा उद्देश काय? हीच बाब इतर पक्षांचीदेखील. यापूर्वी एकमेकांविरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप आता राज्यात सत्तेत आहेत. स्थानिक पातळीवर गुंडांच्या पत्नींना आपापल्या पक्षात प्रवेश देणाऱ्यांनी पुढील निवडणुकांत त्यांनाच निवडणूक लढविण्याची तिकिटे दिली, तर नवल वाटावयास नको!  ‘मनी, मसल, माफिया’ ही निवडणूक जिंकायची त्रिसूत्री मानली जाते. त्यातून होणारे राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही मोठी समस्या आहे. त्यासाठी व्यवस्थेतच आमूलाग्र बदलाची गरज आहे. जनताकेंद्री व्यवस्था त्यासाठी उभी राहायला हवी; पण विद्यमान राजकीय स्थितीत अशा सुधारणा राबविण्याचा अभाव दिसतो. यामुळे ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या नावाखाली स्थानिक गुंडांना नको इतके महत्त्व दिले जाते. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेत राजकीय हस्तक्षेपही नसणे गरजेचे आहे.

मोठ्या गुंडांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुरावा नाही, म्हणून त्यांना जामीन मिळणे, त्यांची सुटका होणे हे कायद्याच्या राज्यात अजिबात समर्थनीय नाही. पुणेकरांनी याचा जाब विचारायला हवा. जनतेचे  दबावगट तयार व्हायला हवेत. जनतेचा वचक सरकारवर राहिला, तरच काही घडू शकते. रोजगारनिर्मिती, त्यासाठी असलेली पूरक शिक्षणव्यवस्था या दीर्घकालीन बाबींची पूर्तता झाली, तरच या गुंडांच्या मागे समर्थकांची गर्दी दिसणार नाही; पण गरज आहे ती हे बदल करण्याची इच्छाशक्ती दाखविणाऱ्या नेत्यांची, तशा व्यवस्थेची... अन्यथा पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’ अटळ आहे.

Web Title: Main Editorial on Pune Gang war and murder of Gangster Sharad Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.