Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती? 

By यदू जोशी | Published: December 11, 2018 11:39 AM2018-12-11T11:39:07+5:302018-12-11T11:43:08+5:30

एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे.

Madhya Pradesh Election Results: what will be Mayawati's stand after results | Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती? 

Madhya Pradesh Election Results: 'हाथी' किसका साथी?... मध्य प्रदेशात काय करणार मायावती? 

Next

आतापर्यंतचा इतिहास 'कभी इधर, कभी उधर'चाच

- यदु जोशी

मध्य प्रदेशमध्ये अंतिम निकालानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये कमी जागांचे अंतर राहिले तर मायावती यांच्या बसपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहू शकते. या पक्षाला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मायावती ज्या बाजूला जातील त्यांचे सरकार येईल, असे होऊ शकते. एका अर्थाने सत्तेची चावी ही बसपाच्या हातात राहू शकते. तसे झाले तर मायावती कुणाकडे जातील हे आताच निश्चित सांगणे जोखमीचे ठरू शकते. कारण, ‘कभी इधर तो कभी उधर’ असा मायावती यांचा प्रवास राहिला आहे.

छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये बसपाची निश्चित अशी व्होट बँक आहे. मायावती यांनी निवडणूकपूर्व युती काँग्रेससोबत करावी, असे प्रयत्न काँग्रेसकडून झाले पण मायावती यांनी एकला चालो रेची भूमिका घेतली. छत्तीसगडमध्ये तर त्यांनी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पक्षाशी युती केली. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मायावती यांनी भाजपाला करून दिला, अशी टीकाही त्यावेळी झाली होती. प्रत्यक्ष निकालात छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा रथ मायावतींच्या अजित जोगींसोबत जाण्याने रोखला गेला नाही हे स्पष्ट झाले आहे. बसपाचा पूर्वेतिहास पाहता ते आता मध्य प्रदेशात निकालानंतर काँग्रेससोबत जातील की भाजपासोबत हे सांगणे कठीण आहे.


एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे. ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ असा नारा या पक्षाने दिला होता. सुरुवातीच्या काळात बसपाच्या कार्यकर्त्यांचा नारा होता, ‘तिलक, तराजू और तलवार, इनको जुते मारो चार’. तिलक म्हणजे ब्राह्मण, तराजू म्हणजे बनिया आणि तलवार म्हणजे जमीनदार यांच्या विरोधातील तो नारा होता. मात्र, २००७ मध्ये बहुमताने सत्ता मिळविताना मायावतींनी दलित-ब्राह्मण युतीचा फॉर्म्युला यशस्वी केला होता.

उत्तर प्रदेशमध्ये १९९३ मध्ये बसपाने मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीसोबत युती करून निवडणूक लढविली होती. सपाने २५६ जागा लढून १०९ जिंकल्या तर बसपाने १६४ जागा लढून ६७ जागा जिंकल्या होत्या. राममंदिराचा विषय तेव्हा ऐरणीवर होता आणि त्याचा फायदा मिळत भाजपाने १७७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, सपा-बसपाने एकत्र येत सरकार स्थापन केले होते. मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. पण हा हनिमुन फार काळ टिकला नाही आणि सरकारच्या काही निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करीत मायावती यांनी २ जून १९९५ मध्ये सरकारचा पाठिंबा काढला. भाजपाने मग मायावती यांना पाठिंबा दिला व मायावती मुख्यमंत्री झाल्या. हे सरकार केवळ चार महिने टिकले होते. २००७ मध्ये मायावतींच्या बसपाने प्रचंड यश विधानसभा निवडणुकीत मिळविले आणि त्या मुख्यमंत्री झाल्या.


सपाशी बसपाचे असलेले विळ्याभोपळ्याचे नाते कायम राहिले. २०१४ च्या लोकसभा आणि त्या नंतर विधानसभा निवडणुकीत सपा-बसपाच्या फुटीचा आणि मोदी लाटेचा फायदा घेत भाजपाने अभूतपूर्व यश मिळविले.

लोकसभा निवडणुकीत बसपाच्या हाती भोपळा आला होता. या दारूण पराभवाने हादरलेल्या मायावती यांनी सपापुढे मैत्रीचा हात केला. परिणामत: गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दोघे एकत्र आले आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या गोरखपूरसह दोन्ही जागांवर सपाने जिंकल्या होत्या. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही सपा-बसपा युती कायम राहिली. असे असताना काँग्रेसने भाजपाविरुद्ध जी महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न चालविले आहेत त्यात मायावती मनापासून अजूनही सहभागी झालेल्या नाहीत. काल नवी दिल्लीत झालेल्या या महाआघाडीच्या बैठकीला सपाबरोबरच बसपानेही पाठ दाखविली होती.


या सगळ्या पार्श्वभूमीवरच मायावतींच्या राजकीय भूमिकेचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र काही शक्यता वर्तविल्या जाऊ शकतात. मायावतींचा पक्ष राष्ट्रीय राजकारणात असला तरी कथेमध्ये राजाचे प्राण जसे पोपटाच्या कंठात असतात तसा बसपाचा जीव हा उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशबाबत निर्णय घेताना मायावती तो निर्णय उत्तर प्रदेशातील राजकारणाचा विचार करून त्या अंगाने घेतील असे वाटते. आज बहुतेक पक्ष भाजपाविरुद्ध एकवटलेले असताना आणि भाजपाविरोधी वातावरण तयार होत असताना भाजपासोबत जाऊन त्यांच्या हाती एक राज्य कायम ठेवण्याची राजकीय अपरिपक्वता त्या दाखवतील असेही वाटत नाही.

Web Title: Madhya Pradesh Election Results: what will be Mayawati's stand after results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.