लखनौ कराराला १०० वर्षे झाल्यानंतर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 03:40 AM2016-12-29T03:40:08+5:302016-12-29T03:40:08+5:30

बरोबर १०० वर्षे झाली आज लखनौ कराराला. लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन महमद अली जीना यांच्याशी हा करार केला. काँगे्रसच्या लखनौ येथे झालेल्या अधिवेशनात २९ डिसेंबरला

Lucknow contract after 100 years ...! | लखनौ कराराला १०० वर्षे झाल्यानंतर...!

लखनौ कराराला १०० वर्षे झाल्यानंतर...!

Next

- प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

बरोबर १०० वर्षे झाली आज लखनौ कराराला. लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन महमद अली जीना यांच्याशी हा करार केला. काँगे्रसच्या लखनौ येथे झालेल्या अधिवेशनात २९ डिसेंबरला या करारावर शिक्कामोर्तब झालं आणि दोन दिवसांनी मुस्लीम लीगच्या अधिवेशनात ३१ डिसेंबरला या कराराला मान्यता देण्यात आली. या करारानं एकीकडं काँगे्रसमधील जहाल व मवाळ यांच्यातील दुफळी मिटली आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सरकारच्या ‘फोडा व झोडा’ या रणनीतीला चोख उत्तर दिलं गेलं.
या घटनेनेचं वर्णन करताना सरोजिनी नायडू यांनी म्हटलं होतं की, ‘जीना हे देशातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे खरे राजदूत आहेत’. हेच जीना पुढं स्वतंत्र पाकिस्तानचे प्रणेते बनले आणि देशाच्या फाळणीस जबाबदार ठरले. त्यानंतरच्या गेल्या सात दशकांत जीना यांनी उभ्या केलेल्या पाकिस्तानने भारताशी उभा दावा धरला आणि भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्य प्रस्थापित होता कामा नये, यासाठी पाक सतत प्रयत्नशील राहिला.
...कारण हिंदू व मुस्लीम गुण्यागेविंदानं एकत्र राहू शकणार नाहीत, ती दोन स्वतंत्र ‘राष्ट्रकं’ (नॅशनॅलिटिज) आहेत, हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांंडला गेला आणि १९१६ साली डिसेंबरमध्ये लखनौ करार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जीना यांनीच दोन तपांनी १९४० साली लाहोर येथे झालेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात ‘स्वतंत्र पाकिस्तान’चा ठराव संमत करवून घेतला.
लखनौ कराराच्या आधी ११ वर्षे कर्झनने बंगालाची फाळणी केली होती. बहुसंख्य मुस्लीम राहत असलेला पूर्व भाग हा हिंदूबहुल पश्चिम भागापासून वेगळा काढण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात जनअसंतोष उसळला. भारतीय राष्ट्रवादाची ठिणगी पडली आणि अखेर सहा वर्षांनी १९११ साली ब्रिटिशांना ही फाळणी मागं घ्यावी लागली. या सहा वर्षांच्या काळात १९०७ साली मुस्लीम लीगची स्थापना झाली आणि काँगे्रसमध्येही मवाळ व जहाल अशी दुफळी पडली. लखनौ करार होण्याची ही पार्श्वभूमी होती. भारतातील हिंदू व मुस्लीम एकत्र आल्यास आपल्याला राज्य करणं कठीण होईल, हा धडा ब्रिटिशांनी १८५७ च्या उठावानंतर घेतला होता. बहुसंख्य हिंदू व सर्वात मोठा अल्पसंख्य गट असलेले मुस्लीम यांच्यात धार्मिक व सांस्कृतिक अंगानी फरक होता, विविध स्तरांवर त्यांच्यात मतभेदही होते आणि त्याचे पर्यवसान अधून मधून संघर्षातही होत असे. पण हिंदू व मुस्लीम यांच्यातील सहजीवनाचेही पर्व मोठे होते. त्यातूनच १८५७ साली हे दोन्ही समाजघटक ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र उभे राहिले. ही एकी आपल्या हिताच्या विरोधात आहे, हे ब्रिटिशांनी जाणले आणि ‘फोडा व झोडा’ ही रणनीती अवलंबली. बंगालची फाळणी हा त्याचा एक भाग होता. त्या पाठोपाठ मुस्लीम लीगची स्थापना हा दुसरा प्रयत्न होता. बंगालाची फाळणी मागं घ्यावी लागली, तसंच लखनौ करारामुळं हिंदू व मुस्लीम ऐक्याचं पर्व पुन्हा नव्यानं सुरू झालं.
आज १०० वर्षांनंतर लखनौ हीच राजधानी असलेल्या स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश या राज्यात येत्या दोन महिन्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि सारा माहोल हा हिंदू व मुस्लीम यांच्यातील दुहीचा बनून गेला आहे. विद्वेषाच्या विषानं समाजमन कलुषित झालं आहे. बंगालच्या फाळणीच्या काळात बंकीमचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम’ हे गीत भारतीय राष्ट्रवाद्यांच्या ओठावर असायचं. हेच गीत आणि ‘भारतमाता की जय’ ही घोषणा स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणादायी ठरत गेली. मात्र आज ही घोषणा उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं विद्वेष खदखदत ठेवण्याचं साधन बनली आहे.
लखनौ करारानंतर सात वर्षांच्या आतच विनायक दामोदर सावरकर यांनी पहिल्यांदा ‘हिंदुत्वा’ची मांडणी केली आणि ‘पुण्यभू आणि पित्रभू’ची संकल्पना चर्चाविश्वात आणली. सांस्कृतिक व राजकीय अंगांनी ‘हिंदू अस्मिता’ आकाराला आणण्याचा हा प्रयत्न होता. पुढं जीना यांनी मांडलेल्या ‘द्विराष्ट्रवादा’च्या सिद्धाताला पूरक ठरणारी आणि लखनौ कराराच्या आशयाला छेद देणारी ही मांडणी होती. सावरकरांनी ही मांडणी १९२३ साली प्रथम केली, तरी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात त्याला फार मोठ्या प्रमाणावर कधीच पाठबळ मिळालं नाही. लखनौ करार करणारे जीना हे ‘स्वतंत्र पाकिस्तान’चे प्रणेते बनले आणि मुस्लीमांसाठी वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात जीना यशस्वी झाले. मात्र सावरकर आणि त्यांच्याशी रणनीतीविषयक मतभेद असल्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ही ‘हिंदुत्वा’ची मांडणी अगदी फाळणीच्या विध्वंसाच्या माहोलतही हिंदू समाजमनात रूजवता आली नाही. सर्वसमावेशक स्वरुप असलेल्या हिंदू धर्माला मानणारा बहुसंख्य हिंदू समाज या मांडणीपासून दूरच राहिला.
मात्र आज हिंदू व मुस्लीम ऐक्याचा पाया घालणाऱ्या लखनौ कराराला १०० वर्षे पुरी होत असताना, त्यानतंर केवळ सात वर्षांतच सावरकरांनी मांडणी केलेल्या ‘हिंदुत्वा’चा विचार मानणाऱ्या संघाच्या हाती देशाच्या सत्तेची सूत्रं आली आहेत.
...आणि ‘भारतीय राष्ट्रवादा’ची जागा टप्प्याटप्प्यानं ‘हिंदू राष्ट्रवाद’ घेऊ लागला आहे.
गेल्या १०० वर्षांत झालेल्या या ‘ट्रान्सफर सीन’ला कारणीभूत ठरला आहे, तो स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत विविध वेळी कलाकलानं फिरत गेलेला राजकीय रंगमंच. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणादायी कथा सलग तिच्या खऱ्या आशयासह सांगितली जाईल, अशा रितीनं या राजकीय रंगमंचाचं दिग्दर्शन व नेपथ्य करण्याचं भान बऱ्याच वेळा बाळगलं गेलं नाही. त्यामुळं ही कथा विस्कळीतपणं मांडली जात गेली आणि नंतर हा रंगमंचच ताब्यात घेऊन, या स्वातंत्र्याच्या कथेचा आशय बदलून, ती वेगळ्याच नेपथ्यात सादर करण्याच्या प्रयत्नांना सुरूवात झाली. या प्रयत्नांना आज यश आलं आहे आणि भारतीय स्वातंत्र्याची कथा वेगळ्या अंगानी मांडण्याचा नुसता प्रयत्नच उरलेला नाही. ही कथा वेगळ्या आशयासह मांडली जाण्याची रूपरेषा आखली जात आहे. राजकीय रंगमंचावर सादर होऊ घातेल्या या कथेची वारेमाप जाहिरात करून ‘हीच ती खरी कथा, आधी जे दाखवलं जात होतं, ती नुसती उचलेगिरी होती’, हे जनमनावर बिंबवण्यााचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
राजकीय रंगमंचावर सादर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कथेला जनमताचा कसा प्रतिसाद मिळतो, याची चुणूक नव्या वर्षाचे पहिले तीन महिने सरायच्या आधीच, ज्या लखनौत १०० वर्षांपूर्वी ही कथा लिहिण्याचा बेत आखला गेला, तिथेच बघायला मिळणार आहे.

Web Title: Lucknow contract after 100 years ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.