अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:57 AM2018-09-24T03:57:55+5:302018-09-24T03:58:22+5:30

माणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो.

Let tears come, then the creature will be cleaned | अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल

अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल

Next

 - किशोर पाठक

माणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो. गंमत पहा जन्मत: रडतो ही जिवंतपणाची खूण. तो का रडतो हे कळण्यापूर्वीची खूण आणि तो संपतो तेव्हा इतर रडतात. ते त्याला कळत नाही. हे रुदन त्याच्या दृष्टीने व्यर्थ असते. तो एकतर मुक्त झालेला जगण्यामरण्यातून नाहीतर पुनर्जन्म घेऊन कुठल्यातरी मांडीवर जोजवत असलेला. माणूस प्रत्येक गोष्टीशी दुहेरी जोडलेला असतो. मग तो शत्रू असो वा मित्र. शत्रू होण्यापूर्वी तो मित्र असतोच. बघा हिंदी-चिनी भाई भाई. मित्रत्व सरते आणि तो शत्रू होतो. मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र होतो. नव्हे विरोधाकरिता केला जातो. आपण नाते गुंतवतो, गोठवतो, संपवतो किंवा थांबवतो आपल्यापुरते. म्हणजे स्त्रीचंच पहा ना. ती जन्मते तेव्हा बाळ असते. चिंगी, पिंगी, रंगी कुणीही असते. मग तिला अवयव फुटतात ती मुलगी, कुमारिका, तरुणी, बायको, पत्नी, आई, आजी होत जाते. एक शब्द उच्चारला की तिचे नाते तयार होते. स्त्री केवळ स्त्री नसतेच तिला कुठले तरी नाते समाज गुंडाळतोच. तशी नाती पुरुषालाही असतात, पण ती नाती तो झिडकारतो. स्त्री आणि पुरुषात हा फरक. आपल्या संस्कृतीने स्त्रीला बांधून घालण्यासाठी वेगवेगळे दागिने आणि नाती अंगावर घातलीत. त्यातून तिची सुटका नाही. त्याचा मुख्य घटक असतो रडणे. बस रडतेच ती. कारण कुणासाठी तरी अश्रू ढाळणे तिचे अर्थवाही होत नाही. तिने रडायचे. एखादी महान व्यक्ती ढसाढसा रडली तरी बातमी होते अश्रू ढाळण्याची. ते त्या व्यक्तीच्या पद आणि पतीवर अवलंबून आहे. म्हणून रुदालीपासून ते भोकाडा पसरणाऱ्या मुलापर्यंत रडणे असतेच. त्या अश्रूंचे जेव्हा संप्लवन होते तेव्हा डोळेपाणीदार होतात म्हणे. पण एक नक्की ज्याला क्षणात रडू फुटते तो भाग्यवान. जो साठवून ठेवतो, मोकळं रडत नाही तो तब्येतीने बिघडतो. म्हणून रडा मनसोक्त रडा. जवळच्या व्यक्तीपासून ते परमेश्वरासाठी जरूर रडा. त्याचा एक अश्रू पुनर्निर्मिती करतो. नव्या सृजनाला जन्म घालतो. ते अश्रूंइतकेच प्रवाही, सुलभ, प्रेरणादायी, ताकदवान असते. असा एकच ताकदीचा अश्रू सगळी दु:ख सहज पुसून टाकतो. असा अश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल.

Web Title: Let tears come, then the creature will be cleaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.