राष्ट्रवादाचे धडे घ्यावेत तर इस्रायलकडूनच

By विजय दर्डा | Published: January 15, 2018 02:18 AM2018-01-15T02:18:50+5:302018-01-15T02:18:59+5:30

गेल्या आठवड्यात मी इस्रायलमध्ये होतो. व्वा! काय देश आहे! जगातील अनेक देशांमध्ये मी गेलो. त्यांची जवळून ओळख करून घेतली. पण इस्रायलएवढा मी अन्य कोणत्याही देशाने प्रभावित झालो नाही.

 The lessons of nationalism should be taken and Israelis have to take lessons | राष्ट्रवादाचे धडे घ्यावेत तर इस्रायलकडूनच

राष्ट्रवादाचे धडे घ्यावेत तर इस्रायलकडूनच

Next

गेल्या आठवड्यात मी इस्रायलमध्ये होतो. व्वा! काय देश आहे! जगातील अनेक देशांमध्ये मी गेलो. त्यांची जवळून ओळख करून घेतली. पण इस्रायलएवढा मी अन्य कोणत्याही देशाने प्रभावित झालो नाही. शेतीपासून देशाचे संरक्षण आणि शिस्तीपासून राष्ट्रवादापर्यंत अनेक बाबतीत आपण इस्रायलकडून बरंच काही शिकू शकतो. भाग्य असे की, इस्रायल भारतावर मनापासून प्रेम करतो, प्रत्येक कठीण समयी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. चला, या आठवड्याच्या या सदरात आपण इस्रायलचाच फेरफटका मारू. भारतातून तेल अवीव येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा नाही. कारण या हवाईमार्गाचा बराच मोठा भाग इस्रायलच्या शत्रूदेशांच्या हद्दीत आहे. हे देश इस्रायलला जाणाºया विमानांना आपल्या हवाईहद्दीतून जाऊ देत नाहीत. त्यामुळे आम्ही इस्तंबुलमार्गे तेल अवीव येथे जाणाºया टर्किश एअरच्या विमानाने गेलो. विमानाने उड्डाण करताच सायमन या सहप्रवाशाशी परिचय झाला. हे सायमन हिºयाचे व्यापारी आहेत. हिरे व्यवसायाची मुंबई ही राजधानी असल्याने ते येथे येत असतात. मग ते इस्रायलला कशासाठी जात आहेत, असा प्रश्न मी त्यांना स्वाभाविकपणे केला. उत्तर ऐकून मी थक्क झालो! सायमन सांगत होते, ‘माझ्या मातीचे चुंबन घ्यायला मी जातोय. माझे सर्व कुटुंब अमेरिकेत असते. इस्रायलला जाऊन त्या पवित्र भूमीचे चुंबन घेईन, नातेवाईकांना भेटेन आणि अमेरिकेला परत जाईन’. खरंच, सायमन आपल्या भूमीचे चुंबन घेण्यासाठी जात असावेत का, याचा मी प्रवासात विचार करत राहिलो. तेल अवीवला पोहोचलो आणि शंका दूर झाली. विमानातून उतरून एकटे सायमनच नाहीत तर इतरही अनेक प्रवासी अत्यंत विनम्रतेने जमिनीचे चुंबन घेत होते. नंतर कळले की, इस्रायलमधून बाहेर जाताना व परत आल्यावर असे धरतीचे चुंबन घेण्याची प्रथा तेथे रुढ आहे.
खरं तर राष्ट्रभक्तीच्या बाबतीत इस्रायलला तोड नाही. यहुदी लोक आपल्या मातृभूमीवर निरातिशय प्रेम करतात व यामुळेच इस्रायल हा देश जगातील एक प्रबळ लष्करी शक्ती म्हणून ओळखला जातो. लांबीला ४०० किमी व रुंदीला १०० किमी अशा छोट्याशा आकाराच्या या देशाला चहूबाजूंनी शत्रूंनी वेढलेले आहे. तरीही कोणीही शेजारी देश इस्रायलच्या केसालाही धक्का लावण्याची हिंंमत करत नाही. सन १९६७ मध्ये सात शेजारी देशांनी मिळून असे धाडस करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या सर्वांना इस्रायलने एकहाती मात दिली, एवढेच नाही तर जेरुसलेम शहरही ताब्यात घेतले. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना समर्थपणे परतवून लावणाºया अतिप्रगत बचावयंत्रणेने हा देश सुसज्ज आहे. एवढे कशाला त्यांच्या ‘इल-अल’ या नागरी विमान वाहतूक कंपनीच्या विमानांवरही क्षेपणास्त्ररोधी गन बसविलेल्या आहेत. इस्रायलकडे स्वत:ची उपग्रह यंत्रणा आहे व त्यातून मिळणारी माहिती ते अन्य कुणालाही देत नाही. या चोख व्यवस्थेने हा देश अंतर्गतदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित आहे.
इस्रायलमधील विविध शहरांमध्ये फिरताना मला तेथील लोकांमध्ये कमालीची शिस्त पाहायला मिळाली. याचे एक कारण म्हणजे तेथे सर्व नागरिकांना लष्करी सेवा सक्तीची आहे. तेथे हायस्कूलचे शिक्षण संपले की मुलगा असो वा मुलगी दोघांनाही दोन वर्षे लष्करी सेवा अनिवार्य आहे. मुलींनाही अशी लष्करी सेवेची सक्ती जगातील अन्य कोणत्याही देशात नाही. फक्त दोन कारणांवरून यातून सूट मिळते. हायस्कूल शिक्षण संपल्यावर लगेच मुलीचे लग्न झाले तर किंवा मुलगा अथवा मुलीस उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असेल तरच लष्करी सेवेतून सूट मिळते. परंतु मजेची गोष्ट अशी की अशी सूट देण्याची तरतूद असूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्याचा तेथे कुणी विचारही करत नाही. तेथील एक अब्जाधीश कुटुंब माझ्या परिचयाचे आहे. त्या घरातील मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण त्या मुलाने घरच्यांना स्पष्टपणे सांगितले की, आधी लष्करात दोन वर्षे सेवा करीन. याला म्हणतात इस्रायली नागरिकांची देशभक्ती!
या देशाचा जन्मच केवळ यहुदी मान-मर्यादांसाठी झालेला नाही, तेथील लोक त्यांचे कटाक्षाने पालनही करतात. यहुदी व्यक्ती कुठेही राहात असली, तिचा जन्म कुठेही झालेला असला तरी तिला इस्रायलचे नागरिकत्व मिळते. जगाच्या पाठीवरील सर्व यहुदींसाठी दरवाजे खुले ठेवूनच हा देश अस्तित्वात आला आहे. तेथील ख्रिश्चन व मुस्लीम नागरिकांनाही समान हक्क आहेत. मला असेही प्रकर्षाने जाणवले की तेथे गरीब-श्रीमंत अशी दरी नाही. दानधर्माची परंपराही वाखाणण्यासारखी आहे. यहुदी धर्मानुसार शुक्रवार संध्याकाळपासून शनिवारच्या रात्रीपर्यंत ‘शबात’ हा आध्यात्मिक काळ पाळला जातो. शबातच्या मेणबत्त्या मीही लावल्या. आणखी एक धक्कादायक गोष्ट अशी की या शबातच्या काळात देशभरात सर्व मशिन्स बंद असतात. हे एवढे कटाक्षाने पाळले जाते की, त्या वेळात आम्हाला गरम कॉफीही मिळू शकली नाही. शबातच्या काळात धंद्यात होणारा नफा दानधर्मात जातो. या निष्ठा व प्रामाणिकपणाला तंत्रज्ञानाच्या आवडीची जोड मिळाल्याने इस्रायल प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. यहुदी लोक व्यापार-व्यवसायात जणू संपूर्ण जगावर राज्य करत आहेत. शस्त्रव्यापार, बँकिंग, कृषी, हिरे, वृत्तपत्रे, टीव्ही असे उद्योग त्यांच्या हातात आहेत. यहुदींची दुसरी खासियत अशी की ते जगाच्या कानाकोपºयात पोहोचले, पण त्यांनी कधी कोणाला त्रास दिला नाही. मात्र त्यांच्या स्वाभिमानाला कोणी डिवचले तर त्याला ते चोख प्रत्युत्तर देतात. म्युनिक आॅलिम्पिक स्पर्धांच्या वेळी त्यांच्या खेळाडूंची हत्या झाली. तब्बल २२ वर्षे पद्धतशीर मोहीम राबवून त्यांनी त्या प्रत्येक मारेकºयाला टिपले होते.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
नववर्षाच्या आरंभी मी इस्रायलला गेलो. त्यामुळे इतर देशांप्रमाणे तेथेही नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे काहीही मला पाहायला मिळाले नाही. असे का, असे विचारल्यावर इस्रायली नागरिकांनी मला हसून सांगितले, हा आमचा सण थोडाच आहे. रोश हशाना हे आमचे नववर्ष आहे. हिब्रु कालगणनेनुसार ते आम्ही २१ सप्टेंबर २०१७ रोजी साजरे केले. आता आमचे पुढचे नववर्ष १० सप्टेंबर २०१८ रोजी येईल तेव्हा ते साजरे करू.
(इस्रायल भेटीचे आणखी काही चित्तवेधक अनुभव पुढील आठवड्यात.)

Web Title:  The lessons of nationalism should be taken and Israelis have to take lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.