इमरानला आपण एक संधी द्यायलाच हवी

By विजय दर्डा | Published: December 3, 2018 04:42 AM2018-12-03T04:42:02+5:302018-12-03T04:43:59+5:30

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इमरान खान यांना अवघे साडेतीन महिनेच झाले आहेत, परंतु त्यांनी या काळात जी समज दाखविली, ती निश्चितच प्रशंसनीय आहे.

Imran should have given us an opportunity | इमरानला आपण एक संधी द्यायलाच हवी

इमरानला आपण एक संधी द्यायलाच हवी

Next

- विजय दर्डा
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इमरान खान यांना अवघे साडेतीन महिनेच झाले आहेत, परंतु त्यांनी या काळात जी समज दाखविली, ती निश्चितच प्रशंसनीय आहे. प्रामुख्याने भारतासोबत असलेल्या संबंधांबाबत ते विशेष रुची घेत आहेत आणि आपली ही इच्छा त्यांनी अनेकदा जाहीर केली आहे. भारतासोबत आपल्याला चांगले संबंध हवे असल्याची भावना, त्यांनी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडोरची कोनशिला ठेवतानाही त्यांनी पुन्हा पुढाकार घेतला. चांगल्या संबंधांसाठी भारताने एक पाऊल उचलले, तर आम्ही दोन पावले उचलू, असे ते म्हणाले.
इमरान खानच्या या वक्तव्यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषत: असे म्हटले जाते की, पाकिस्तानच्या यापूर्वीच्या शासनकर्त्यांनी भारतासोबत नेहमी कपटच केले, इमरानवर विश्वास कसा ठेवायचा? भारताला त्रस्त करणारा त्यांच्या देशातील दहशतवाद पाकिस्तानने अगोदर संपविला पाहिजे. त्यानंतरच चर्चा होऊ शकते. पाकिस्तानच्या पूर्वीच्या शासनकर्त्यांशी इमरानची तुलना करणे योग्य नाही, असे माझे मत आहे. इमरानची क्रिकेटची कारकिर्द अथवा राजकीय करियरचा विचार केल्यास, त्याने कधी कुणासोबत धोका केल्याचे ऐकीवात नाही. ते आपल्या काळातील शानदार क्रिकेटपटू राहिले आहेत आणि साऱ्या जगात त्यांचा आदर केला जातो. त्यांचे करियर अगदी स्वच्छ दिसते. राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची त्यांना काही गरज नव्हती, पण आपल्या देशाची परिस्थिती सुधारण्याच्या इच्छेने त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.
राजकारणात पदार्पणानंतर त्यांनी अनेकदा काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली असली, तरी भारताविरुद्ध कधी द्वेषभावना जाहीर केली नाही. त्या देशातील इतर शासनकर्ते असे करत आले आहेत. दोन शेजाºयांमध्ये मैत्री निर्माण झाल्यास उभयतांचे भले होणार आहे, याची जाणीव इमरानला आहे. त्यांना वारशात जो पाकिस्तान मिळाला आहे, त्याची अवस्था फार वाईट आहे. खजिना रिकामा आहे आणि रुपया दररोज खाली कोसळतोय. आपण एका अत्यंत दैनावस्थेतील देशाचे पंतप्रधान आहोत, याची कल्पना त्यांना आहे. भारतासोबतची मैत्री त्यांच्यासाठी फायद्याचीच राहणार आहे.
भारतातील एका विशिष्ट विचारसरणीचे लोक इमरानचा कल कट्टरपंथीयांकडे असल्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही खरी अडचण आहे. वास्तवात इमरान खान पाकिस्तानातील कट्टरपंथीयांचा सतत विरोध पत्करत आहेत. खरे तर कट्टरपंथीयांना त्यांचा निवडणुकीतील विजय नकोच होता. दुसºया कुठल्या देशात दहशतवाद पसरविण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर आपल्या देशाच्या हिताचा नाही, हे इमरानने तीन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. ते दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना बाजूला सारू इच्छितात हे जाहीर आहे. एवढेच नाही, तर त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातही ठोस आघाडी उघडली आहे. त्याविषयी ते उघडपणे बोलत आहेत. अर्थात, पाकिस्तानी लष्कराविरुद्ध कुठलेही वक्तव्य त्यांनी अद्याप केलेले नाही, हेही खरे आहे. त्याचे कारण कळणे अवघड नाही. तेथील लष्कर इतके शक्तिशाली आहे आणि पाकिस्तानच्या जनजीवनावर त्याचा इतका प्रभाव आहे की, त्याच्याविरुद्ध उभे ठाकण्यास प्रबळ शक्ती पाहिजे. ही शक्ती प्राप्त करण्यास इमरानला अजून वेळ लागेल. तेथील ३० टक्के उद्योग जगतावर लष्कराचा कब्जा आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विशेषत: सिमेंट आणि पोलाद उद्योग तर लष्करी अधिकाºयांच्याच ताब्यात आहे. व्यवस्थेतही सेनेचा प्रभाव आहे. त्यामुळे निर्वाचित सरकारवर नेहमीच टांगती तलवार असते.
अशा परिस्थितीतही इमरानने भारतासोबत मैत्रीसाठी प्रामाणिक पुढाकार घेतला आहे. मात्र, हिंदुस्तानात या पुढाकाराकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला जातोय, ही अडचण आहे. ज्याप्रमाणे, भारतविरोध म्हणजे पाकिस्तानी निवडणुकीत विजयाची हमी मानला जातो, त्याचप्रकारचे वातावरण भारतातही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्या येथे २०१९ साली लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि पाकिस्तानविरोधी वातावरणाचा काही लोकांना लाभ होऊ शकतो. तेव्हा अशा तत्त्वांपासून देशाचा बचाव केला पाहिजे, असे मला वाटते. पाकिस्तानसोबत मैत्रीसाठी केवळ अटलबिहारी वाजपेयी यांनीच पुढाकार घेतला नव्हता किंवा ते एकटेच शांती बस घेऊन पाकिस्तानात गेले नव्हते. तर तत्कालीन पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी आमंत्रणाशिवाय भेट देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा एक चांगले पाऊल टाकले होते. दुर्दैवाने मैत्रीच्या मार्गावर आम्ही आगेकूच करू शकलो नाही, पण आता पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे. इमरान खानने आपली इच्छा व्यक्त केली आहे, तेव्हा भारतानेही सकारात्मक पुढाकार घेतला पाहिजे. यापूर्वी आलेल्या अपयशाचे भय बाळगत नवी संधी धुडकावून लावणे कुठल्याही प्रकारे बुद्धिचातुर्य मानता येणार नाही.
(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह.)

Web Title: Imran should have given us an opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.