वाचनीय लेख - ओसामाला जर अमेरिका घरात घुसून मारते तर...

By संदीप प्रधान | Published: September 27, 2023 05:53 AM2023-09-27T05:53:24+5:302023-09-27T05:53:56+5:30

महासत्तेचे एक परिमाण जर विदेशात शत्रूचा खात्मा करणे हेच असेल तर भविष्यात भारतही त्या दिशेने का पाऊल टाकू शकणार नाही?

If America invades Osama's house and kills him... | वाचनीय लेख - ओसामाला जर अमेरिका घरात घुसून मारते तर...

वाचनीय लेख - ओसामाला जर अमेरिका घरात घुसून मारते तर...

googlenewsNext

संदीप प्रधान

रिकार्डाे क्लेमंट अर्जेंटिनामध्ये वास्तव्य करीत होता. ते साल होते १९६०. इकडे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ज्यूंची कत्तल करणाऱ्या नाझी क्रूरकर्म्यांचा शोध घेत होती. त्यांना हवा होता ॲडॉल्फ आइकमेन. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीतून पलायन केलेला आइकमेन अर्जेंटिनात क्लेमंट बनून वास्तव्य करीत होता. इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान गुरियो यांना आइकमेन जिवंत हवा होता. मोसादच्या चार गुप्तचर एजटांनी आइकमेनला जिवंत इस्रायलला नेला आणि फाशी दिली. आइकमेनची बारीकसारीक माहिती मोसादने गोळा केली होती. गुप्तचर यंत्रणांच्या या ऑपरेशन्सबद्दल सर्वसामान्य माणसांनाही प्रचंड कुतूहल असते. त्यामुळेच ‘मद्रास कॅफे’, ‘बेबी’ अथवा ‘बेलबॉटम’ यासारखे गुप्तचर यंत्रणांच्या कारवायांवरील चित्रपट आपल्याकडे लोकप्रिय होतात. 

कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने हे आरोप साफ फेटाळले आहेत. निज्जरवर स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला की, भारतीय गुप्तचर संघटनांनी या टोळ्यांना हाताशी धरून निज्जरचा खात्मा केला हाच वादाचा मुद्दा आहे. गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या अशा ऑपरेशनची संपूर्ण माहिती ही अर्थातच दोन किंवा तीन लोकांच्या पलीकडे फारशी कुणाला नसते. बहुतांश लोक हे त्या व्यापक ऑपरेशनमधील एका मर्यादित घटनेचा किंवा योजनेचा भाग असतात. अशा ऑपरेशनमधील एक छोटी चूकदेखील देशाला अडचणीत आणू शकते. कॅनडा आणि भारतात निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे अशा ऑपरेशनचे टायमिंग चुकले का, हा चर्चेचा विषय असू शकतो, असे काही निवृत्त आयबी अधिकाऱ्यांचे मत आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे आयबीचे प्रमुख राहिले आहेत. पंजाबमध्ये खलिस्तानवाद बोकाळला होता व सुवर्ण मंदिराचा ताबा दहशतवाद्यांनी घेतला होता. तेव्हा १९८८ मध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’मध्ये डोभाल यांचा सहभाग होता. सुवर्ण मंदिरात प्रवेश करून तेथील शस्त्रास्त्रे व दहशतवाद्यांचे सुरक्षा कवच याचे तपशील डोभाल यांनी गोळा केले होते. पुढे सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवून केलेल्या कारवाईकरिता हे सर्व तपशील निश्चितच लाभदायक ठरले.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९६२च्या चीन युद्धात भारताला मोठा फटका बसला. १९६५ मध्ये पाकिस्तानच्या घुसखोरीने भारताला बेजार केले. चीनसोबतच्या युद्धात त्या देशाच्या शस्त्रसज्जतेबाबत गुप्तचरांकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने भारताचे नुकसान झाले हे लक्षात आल्याने १९६८ मध्ये रॉ स्थापन केली गेली. थेट पंतप्रधानांच्या हाताखाली ही गुप्तचर यंत्रणा काम करीत होती. रॉचे निवृत्त अधिकारी व लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील दक्षिण आशियाई सुरक्षाविषयक अभ्यासकांच्या मते रॉ स्थापन झाली तेव्हापासून विदेशात हत्या घडवणे हा त्या गुप्तचर संस्थेचा हेतू नव्हता. अर्थात, रॉने इस्रायली मोसादचे अनुकरण करावे, असे मानणारा एक मतप्रवाह भारतात अगदी रॉच्या स्थापनेपासून आहे. मुख्यत्वे चीन व पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांकडून होणाऱ्या उपद्रवाबाबत माहिती मिळवणे हाच हेतू राहिला. पैसे देऊन किंवा वेळप्रसंगी ब्लॅकमेलिंग करून गुप्त माहिती मिळवणे व जास्तीत जास्त फुटीरतावाद्यांमध्ये फूट पाडण्याकरिता साम, दाम यांचा वापर करणे याच परिप्रेक्षात रॉ काम करीत आली आहे.

१९८० पासून पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने काश्मीर व पंजाबमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले. हिंसाचार माजवला. याचा मुकाबला करण्याकरिता रॉने बलुचिस्तानात फुटीरतावाद्यांना शक्ती दिली. भारतीय गुप्तचर यंत्रणेलाही त्याचा मुकाबला करण्याकरिता काही पावले उचलणे अपरिहार्य झाले. अर्थात, एजंट पाठवून हिंसा घडवण्यापेक्षा स्थानिक संघटनांमधील मतभेदांना खतपाणी घालून भारताच्या शत्रूचा बंदोबस्त करणे हीच रॉची कार्यपद्धती राहिल्याचे निवृत्त अधिकारी व अभ्यासकांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अजित डोभाल यांना अधिक प्रभावी व आक्रमक रॉ अभिप्रेत असू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रॉचे वाढलेले बजेट, नव्याने झालेली भरती हे त्याचे संकेत असल्याचे मानले जाते. 
अमेरिकेतील ट्विन टॉवर पाडणाऱ्या ओसामा बिन लादेनला आबोटाबाद येथील घरात घुसून अमेरिका ठार करते आणि कुणी ब्र काढत नाही. ज्या ओबामा यांनी ओसामाचा खात्मा केला ते आणि विद्यमान अध्यक्ष जो. बायडेन डेमॉक्रॅटिक पक्षाचेच आहेत. महासत्तेचे एक परिमाण जर विदेशात शत्रूचा खात्मा करणे हेच असेल तर भविष्यात भारतही त्या दिशेने का पाऊल टाकू शकणार नाही?

(लेखक लोकमत, ठाणे आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक, आहेत)

Web Title: If America invades Osama's house and kills him...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.