अहंकाराचा परिणाम शेवटी मुलांवरच होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 06:23 AM2018-11-01T06:23:17+5:302018-11-01T06:24:18+5:30

लहान मुलांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुटुंबातील असंतोष, आईवडिलांमधील वाद हेही त्यामागील कारण आहे. 

husband and wifes ego makes bad effect on child disturbs mental health | अहंकाराचा परिणाम शेवटी मुलांवरच होतो

अहंकाराचा परिणाम शेवटी मुलांवरच होतो

- परेश देसाई

लहान मुलांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुटुंबातील असंतोष, आईवडिलांमधील वाद हेही त्यामागील कारण आहे. वाद हे अहंकारातूनच येतात़ त्यामुळे आईवडिलांनी अहंकार बाजूला ठेवला तरच अशा घटना टाळता येऊ शकतात. कारण कौटुंबिक वादात सर्वांत जास्त जर कोणी भरडला जात असेल तर ती आहेत निष्पाप मुले. त्यांना आपले आईवडील दोन्ही हवेसे वाटतात. परंतु फक्त आपल्या अहंकारासाठी मुलांना आई किंवा वडिलांपासून दूर ठेवणे योग्य वाटते. वाद कौटुंबिक न्यायालयात गेल्यावर पहिला विषय न्यायालयासमोर मुलांच्या भेटण्याचा अधिकार व मुलांच्या पोटगीचा येतो.

ज्या पक्षकाराकडे मुलांचा ताबा असतो म्हणजेच जो पक्षकार मुलांचा संरक्षक आहे़, तो गैरसंरक्षक म्हणजे ज्या पक्षकाराकडे मुलांचा ताबा नसतो त्याला मुलांना भेटण्याचा अधिकार देण्यास सुरुवातीपासून नकार देतो. त्यानंतर गैरसंरक्षक पक्षकार मुलांची मानसिक स्थिती जाणण्यासाठी न्यायालयात मानसशास्त्रज्ञांच्या तपासासाठी अडथळा आणतात. मुलांना न्यायालयाच्या बाल संकुलात भेटण्यात विरोध करतात. मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अडी करतात.

जर आपण मानसोपचार तज्ज्ञांचे मत मानले तर विभक्त आई-वडिलांचा सर्वांत जास्त मानसिक परिणाम मुलांवर होतो. मुलं हिंसक होऊ शकतात, मुलं उदास होऊ शकतात, ती अलिप्त राहू लागतात, ती सामाजिक होण्यास घाबरतात, त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. हे सर्व परिणाम मुलांच्या वाढीस मारक आहेत. याचा सर्व विभक्त आई-वडिलांनी विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
आज आंतरराष्ट्रीय मूल अपहरण प्रकरण भारतात एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्याला कारण परदेशात जर त्या देशाच्या मुलांना बेकायदेशीर / किंवा गैरसंरक्षक पालकांपासून त्याच्या संमतीविना भारतात आणले किंवा दुसऱ्या देशात नेले तर त्याला आंतरराष्ट्रीय अपहरण मानले जाते व त्यानुसार ज्या देशातून मुलांना संरक्षक पालक घेऊन येतात त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढला जातो. हे वॉरंट दूतावासामार्फत बजावले जाऊ शकते. जर दोन देशांत संधी करार असेल तर सदर वॉरंटची बजावणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे केली जाऊ शकते. कायद्यामध्ये दोन देशांत कामेटी आॅफ कोर्ट म्हणजेच एका देशाने दुसºया देशातील न्यायाचा, आदेशाचा मान ठेवणे.

(विभक्त आईवडील) हा विषय मुलांसाठी बराच घातक आहे. कारण मुलांसाठी आई-वडील दोघेही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात. परंतु कौटुंबिक न्यायालयात अशी प्रकरणे येतात ज्यात बाळंतपणासाठी माहेरी गेलेली पत्नी मुलाच्या जन्मानंतर परत सासरी येतच नाही; आणि पती - पत्नीच्या संभाषणाअभावी आणि अहंकारामुळे नवजात मुलाला त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाला मुकावे लागते. अशा प्रकरणात बºयाच वेळा असे दिसून येते की पती-पत्नीच्या भांडणात पत्नी (आई) मुलाला पतीपासून (वडिलांपासून) दूर ठेवण्याचा प्रयत्न करते व अशा प्रकारे काही काळाने प्रकरण न्यायालयात जाते. निष्कर्ष असा की आई-वडील (पती-पत्नी) दोघांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील मतभेद विसरून जास्तीतजास्त वेळ त्यांच्या मुलांना दिला पाहिजे व देशाच्या भावी पिढीच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे़ यातूनच लहान मुलांच्या आत्महत्याही टाळता येतील.

(लेखक कौटुंबिक न्यायालयात वकील आहेत)

Web Title: husband and wifes ego makes bad effect on child disturbs mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.