How to grow research status? | कसा वाढेल संशोधनाचा दर्जा?
कसा वाढेल संशोधनाचा दर्जा?

ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्या वक्तव्यावर खरोखरच मंथन करण्याची आवश्यकता आहे. जर भारताचा विचार केला तर संशोधनाच्या क्षेत्रात देश अद्यापही मागे आहे. विशेषत: विदर्भातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये अद्यापही दर्जेदार संशोधनाची टक्केवारी फारच कमी आहे. आजच्या ई-तंत्रज्ञानाच्या युगात संशोधनासाठी आवश्यक असलेले वाङ्मयीन साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय ‘ग्लोबल व्हिलेज’मुळे आपल्याकडे संशोधनासाठी पोषक वातावरण नाही, अशी स्थितीदेखील राहिलेली नाही. मात्र तरीदेखील नवीन काहीतरी शोधण्यापेक्षा अगोदरच्या संशोधकांची ‘री’ ओढणे किंवा त्यात काहीतरी छोटा बदल करून आपणदेखील संशोधक आहोत, असे मिरविण्यातच बहुतांश जण धन्यता मानतात. विशेषत: विद्यापीठांमध्ये होणाºया ‘पीएचडी’ संशोधनामध्ये तर असे चित्र प्रकर्षाने दिसून येते. दुर्दैवाची बाब म्हणजे इंटरनेटच्या महाजाळात वाङ्मयीन साहित्याचे भांडार असूनदेखील त्यासंदर्भातदेखील मेहनत करण्याची अनेकांची तयारी नसते. संशोधनपत्रिका किंवा प्रबंध लिहिताना सर्रासपणे वाङ्मयीन चौर्यकर्म करण्यात येते. साधी शब्दरचना बदलण्याची तसदीदेखील हे तथाकथित संशोधक घेत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या ‘जर्नल्स’मध्ये भारतीय संशोधकांची संख्या ही अद्यापदेखील फारच कमी आहे. संशोधन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो संयम. संशोधन म्हटले की त्यात अनेक चुका होणार हे अपेक्षितच असते. प्रयोगांमधील चुकांमधून पुढील दिशा मिळते. पाश्चिमात्य देशांमध्ये एकच प्रयोग वर्षानुवर्षे चालतो व त्यातून नवनिर्मिती होते. मनातील शंका ते निर्भिडपणे तज्ज्ञांना, सहकाºयांना विचारतात. आपल्याकडे मात्र ‘तो काय म्हणेल’ या विचारातूनच मौन साधणेच पसंत केले जाते. भारतातील संशोधकांमध्ये प्रचंड बुुद्धिमत्ता असूनदेखील केवळ मानसिकतेचा अभाव असल्यामुळे नवनिर्मिती ही एका चौकटीत मर्यादित राहते. त्यामुळेच तर ‘आयआयटी’, ‘नीरी’ यासारख्या काही संस्था सोडल्या तर इतर ठिकाणी नवीन काहीतरी शोधून काढण्यासाठीची जिद्द संशोधकांमध्ये फारशी दिसून येत नाही. आजच्या युगात दर्जेदार शोधासाठी आंतरशास्त्रीय विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र संबंधित विषय माझा नाही, तर मी का विचार करू ही मानसिकता येथील संशोधकांसाठी घातक ठरते आहे. या मानसिकतेत बदल झाला तरच संशोधनाचा दर्जा वाढेल.


Web Title:  How to grow research status?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.