भाजप आणि शिवसेना यांच्यातील ‘हेट स्टोरी’ दिवसेंदिवस होतेय गडद, दानवेंची जुळवा-जुळव आणि हातघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:04 AM2017-10-25T00:04:54+5:302017-10-25T00:05:14+5:30

लोकसभेसाठी जमवाजमव सुरू झाली आहे. विद्यमान, माजी, नवखे असे सगळेच हालचाल करायला लागले. चर्चाही झडायला लागल्या. डिसेंबर १८ की मे १९ असे वादाचे फड रंग भरायला सुरुवात झाली तशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत चालली.

The 'Hate Story' between BJP and Shiv Sena is going on day-to-day, dark, demon-friendly and hands-on | भाजप आणि शिवसेना यांच्यातील ‘हेट स्टोरी’ दिवसेंदिवस होतेय गडद, दानवेंची जुळवा-जुळव आणि हातघाई

भाजप आणि शिवसेना यांच्यातील ‘हेट स्टोरी’ दिवसेंदिवस होतेय गडद, दानवेंची जुळवा-जुळव आणि हातघाई

Next

- सुधीर महाजन
लोकसभेसाठी जमवाजमव सुरू झाली आहे. विद्यमान, माजी, नवखे असे सगळेच हालचाल करायला लागले. चर्चाही झडायला लागल्या. डिसेंबर १८ की मे १९ असे वादाचे फड रंग भरायला सुरुवात झाली तशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत चालली. विरोधकांची सालटी काढणारी भाषा आता अधिक तीक्ष्ण होणार यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर. त्यांची गावराण बोली हमखास सभा जिंकून घेणारी. त्यांच्या जालना मतदारसंघातही असेच बांधबंदिस्तीचे वातावरण आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील ‘हेट स्टोरी’ गडद होत असतानाच दानवेंनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना शिंगावर घेतले. खोतकर हे शिवसैनिक आणि त्यातही राज्यमंत्री. मतदारसंघातील सभांमध्ये हाच विषय सध्या दिसतो. दानवेंना ते लोकसभेसाठी प्रतिस्पर्धी वाटतात.
गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील राजकीय वातावरण बदलताना दिसते. दानवे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा एक गट, तर खोतकर, राजेश टोपे यांचे ध्रुवीकरण आणि त्यांच्या परिघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर आणि जालन्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल हळूहळू सरकताना दिसतात. तिकडे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार तर उघडपणे खोतकरांची तरफदारी करतात. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ लोकसभेसाठी जालना मतदारसंघाचा भाग असल्याने हे दोन तालुके महत्त्वाचे ठरतात. पूर्वी सत्तार-दानवे मधुर संबंध होते; पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते बिघडलेले दिसतात. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजपची संघटनात्मक जबाबदारी रावसाहेबांचे चिरंजीव आमदार संतोष दानवेंकडे अलीकडेच सोपविली. त्या पार्श्वभूमीवरच काही दिवसांपूर्वी सत्तार-खोतकर यांचा जंगी कार्यक्रम घडवून आणला गेला. सेनेतर्फे खोतकरांच्या नावाची चर्चा नसली तरी दानवे त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही आणि त्यांचाच राग कुचे आळवताना दिसतात. जिल्ह्यात दानवेंच्या गटात बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याशिवाय कोणी दिसत नाही. भोकरदनमध्ये त्यांचे पुत्र संतोष हेच आमदार असले तरी राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा विरोध असणारच.
सध्या अंबड-वडीगोद्री या ४७ कि.मी. रस्त्यावरून खा.दानवे आणि आ.राजेश टोपे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसतात. या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यामुळे अपघातात आतापर्यंत २५८ बळी गेले. कामाच्या मुद्यावरूनही पक्षातील व पक्षाबाहेरील मंडळी दानवेंवर नाराज आहेत. मतदारसंघात त्यांनी कोट्यवधी रुपये आणले, पण ती कामे जावई आणि पुतण्यालाच दिली, त्याची ही नाराजी.
औरंगाबाद हा परंपरागत सेनेचा मतदारसंघ. मोदी लाटेच्या कृपेने चंद्रकांत खैरे निवडून आले असे बोलले जात होते; पण आता या मुद्याची राजकीय चर्चा सुरू झाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही आणि भाजपकडे नाव घेण्यासारखी व्यक्ती नाही म्हणून आडून-आडून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांचे नाव चर्चेत येते. त्याचा भापकरांनी इन्कारही केलेला नाही. म्हणजे भाजपची येथे म्हैस पाण्यातच आहे. तसे बोहल्यावर चढण्याची अनेकांची तयारी असली तरी बाशिंग कोणाचे बांधणार, हा प्रश्न आहे. इकडे खैरेसुद्धा विरोधकांशी जुळवून घेण्याच्या मूडमध्ये दिसतात.

Web Title: The 'Hate Story' between BJP and Shiv Sena is going on day-to-day, dark, demon-friendly and hands-on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.