'God is God name' on the same canvas! | एकाच कॅनव्हासवर ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’!
एकाच कॅनव्हासवर ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’!

मथळा वाचून आश्चर्य वाटेल. कारण जातीपातीत, धर्मात तेढ निर्माण करून राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोही अशी लेबलं लावून मनाची वाटणी केली की अन्य मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला उरतो. आजकाल वाईट किंवा चांगला अशा दोनच गटात माणसं, विचार वाटून घेतले जात आहेत. जातीधर्मामध्ये लोकांना लढायला लावले की लोक त्यातच गुंग होतात. अशावेळी एकच कॅनव्हास घेऊन त्यावर ईश्वर आणि अल्लाह लिहिण्याची हिंमत करण्याचा सद्विचार अंमलात आणला तो दुर्मिळ होत चाललेल्या अक्षरलेखनात स्वत:चे नाव जागतिक पातळीवर नेणा-या अच्युत पालव यांनी.
राज्याच्या राजधानीत सतत काही ना काही घडत असते. चर्चा मात्र राजकारणाची जास्त होते. ज्या विषयामुळे राज्यात, देशात वाद होऊ शकतात असे विषय टाळण्याकडे सगळ्यांचा कल असताना अच्युत पालव यांनी तोच विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ ही संकल्पना घेऊन मोठे काम उभे केले आहे. याआधी जगभरातील उर्दू, पर्शियन, अरबी भाषेत अक्षरलेखन (कॅलिग्राफी) करणा-यांचा एक ‘कॅलिग्राफी बिनाले’ शारजा येथे भरला होता. जगातील तमाम मुस्लीम कॅलिग्राफर त्यात सहभागी होते. त्यासाठी पालव यांनी देवनागरीत केलेले कॅलिग्राफीचे काम पाठवले. तेथे त्यांना विशेष आमंत्रित म्हणून बोलावले गेले आणि त्या ठिकाणच्या निवडक कामांचे जे पुस्तक निघाले त्याच्या कव्हरवर पालव यांनी देवनागरीत केलेले काम झळकले होते. त्यात ते एकमेव हिंदू कॅलिग्राफर होते. अक्षरांनी धर्म पाहून न्याय केला नव्हता हे किती चांगले...! त्यातूनच ईश्वर अल्लाहची संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली आहे. या सगळ्या कामांचे देखणे प्रदर्शन उद्या मंगळवारपासून मुंबईत नेहरू सेंटर येथे सुरू होत आहे.
आजकाल चांगले अक्षर काढणे, शाईच्या पेनाने लिखाण करणे या तशा दुर्मिळ किंवा बिनकामाच्या गोष्टी झाल्या आहेत. मनात विचार आले की कोणत्याही भाषेत गुगल गुरुजीला सांगितले की बोटांनी टाईप करण्याचे कष्टही तो तुम्हाला देत नाही. अशा काळात शाईचा आणि कागदाचा हाताला होणारा स्पर्श, त्याचा वास, गंध या गोष्टी कधीच मागे पडल्या. वेगवेगळ्या आकाराच्या शाईच्या पेन, त्यासाठी शाईची दौत, शाई भरण्याचे ड्रॉपर, पेनाच्या पत्तीला (नीब) टोक करून देण्यासाठी वापरला जाणारा घासपेपर या सगळ्या गोष्टी आता परिकथेत जमा झालेल्या असताना अक्षरातून आपला स्वभाव व्यक्त करता येतो, अक्षरं तुमच्यावर संस्कार करत असतात हा विचार घेऊन काम करणाºया अच्युतला जेव्हा याचे महत्त्व विचारले जाते तेव्हा तो सहज सांगून जातो.
लता मंगेशकर हे नाव नाजूकपणे लिहिले पाहिजे आणि ओसामा बिन लादेन हे नाव ढब्ब्या ढब्ब्या अक्षरातच. दोघांची जातकुळीच वेगळीय... म्हणूनच अशा वेगळ्या जातकुळीचा हा माणूस ईश्वर आणि अल्लाह एकाच कॅनव्हासवर चितारण्याचे अप्रतिम काम करू शकतो. चुकून अडखळत पडलेलं मूल आम्ही आजही पटकन जाऊन उचलतो. त्यावेळी ते कोणत्या जातीधर्माचं आहे हे अजून तरी आम्ही विचारत नाही. यानिमित्ताने हे विचारण्याचं धाडस आमच्यात न येवो, हीच काय ती अपेक्षा...!


Web Title: 'God is God name' on the same canvas!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.