आधी वंदू तूज मोरया - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

By दा. कृ. सोमण | Published: September 5, 2017 07:00 AM2017-09-05T07:00:00+5:302017-09-05T07:00:00+5:30

अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. पण मग अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? याचे कारण असे आहे की कधी कधी...

Ganapati Bappa Morya, come early next year! | आधी वंदू तूज मोरया - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

आधी वंदू तूज मोरया - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

ठळक मुद्देआज मंगळवार असला तरी गणेशमूर्तींना विसर्जन करावयाचे आहेकारण मंगळवारचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाहीयावर्षी दशमी तिथीची वृद्धी (म्हणजे दशमी तिथी दोन दिवस सूर्योदयाला ) झाल्यामुळे बाराव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे

                      आज मंगळवार, दि. ५ सप्टेंबर , अनंत चतुर्दशी  !  आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे. तरीही आज संपूर्ण दिवस गणेशमूर्तींचे विसर्जन करावयास हरकत नाही. अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. पण मग अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ?
याचे कारण असे आहे की कधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी अपराण्हकाळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असेल तर त्याच दिवशी महालयारंभ व प्रतिपदा श्राद्ध असते. महालयारंभापासून पितृपक्ष सुरू होतो. याचवर्षी उद्या बुधवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महालयारंभ आलेला आहे. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून अनंत चतुर्दशी हा ठरविलेला आहे.  
त्यामुळे आज गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात आहे. यावर्षी दशमी तिथीची वृद्धी (म्हणजे दशमी तिथी दोन दिवस सूर्योदयाला )
झाल्यामुळे बाराव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. आज मंगळवार असला तरी गणेशमूर्तींना विसर्जन करावयाचे आहे. कारण मंगळवारचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. गणेशोत्सवाचे हे दिवस खूप आनंदात जात असतात. गणपतीचे आणि आपले एक जिव्हाळ्याचे नाते तयार होते. गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यावर घर काय किंवा मंडप काय ओकाओका वाटू लागतो. गणेशोत्सवाचे हे दिवस संपूच नयेत असे सर्वाना वाटत असते. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी भक्तांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडतात की- " गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !"
                   गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी घरातील सर्वांचीच लगबग सुरू असते. प्रत्येकाला बेचैनी जाणवत असते. घरच्या पुरुषांना गणेशोत्सवाची जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडल्याचे समाधान असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचीही अशीच काहिशी भावना असते. घरातील महिलेची मन:स्थिती तर खूप भावुक झालेली असते. आवडत्या बाप्पाला प्रसादाचा कोणता पदार्थ करावयाचा राहिला ते आठवून तो केला जातो. बाप्पाच्या मूर्तीचे आज विसर्जन होणार म्हणून
होणार म्हणून घरातील मुले गणेशमूर्तीकडे टक लावून पहात सारखी प्रार्थना करीत असतात, बाप्पाला सारखी नमस्कार करीत असतात. घरात-मंडपात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असते. 
                                          गणेशमूर्तीचा संदेश
                  तुम्ही शांतपणे, एकचित्ताने गणेशमूर्तीचे निरिक्षण करा . इतर देवांच्या मूर्तीप्रमाणे ही मूर्ती नसते. देह माणसाच्या देहासारखाच पण चार हातांचा ! आणि डोके हत्तीचे ! असे असूनही प्रत्येक गणेशमूर्ती खूप सुंदर दिसत असते ! विश्वातले सारे सौंदर्य गणेशमूर्तीत दर्शन देत असते. तो मुकुट, ते डोके, ते डोळे, ते कान, ती सोंड, ते चार हात, ते मोठे पोट सारेच इतके सुंदर दिसते की मूर्तीकडे सारखे टक लावून पहावेसेच वाटते. गणेशमूर्ती पाहतांना आपले हात सहजपणे जोडले जातात. श्रीगणेशमूर्तीतील प्रत्येक गोष्ट आपणास काही तरी संदेश देत असते, प्रत्येक गोष्टीत मोठा अर्थ सामावलेला असतो.
गणपतीचे मोठे डोके हे महान ज्ञानाचे सूचक आहे. गणेश हा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे. ज्ञानी माणूस हा निर्भय असतो. आपल्या ज्ञानाचा त्यास उपयोग होतोच पण इतरांनाही तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देऊ शकतो. ज्ञानप्राप्ती साठी त्या माणसाला खूप मेहनत करावी लागते. ही मेहनत करायची त्याची सवय इतर गोष्टींसाठी उपयुक्त होत असते. ज्ञानी माणूस हा विनयशील असतो. समाजात सर्वत्र त्याला मान दिला जातो. गणेशमूर्तीपासून ज्ञानप्राप्तीचा संदेश जरी आपण घेतला तरी गणेशपूजनाचा आपणास चांगला उपयोग झाला असे म्हणतां येईल. मग आपण निर्भयपणे जगू शकू. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ती स्वीकारून त्यावर विजय प्राप्त करणे आपणास जमू शकेल. हातून चुका कमी होतील. इतराना मदत मार्गदर्शन करता येईल. मग आपण आनंदात असतांना कुणाला वचन देणार नाही. क्रोधात असताना उत्तर देणार नाही. दु:खात असताना महत्वाचे निर्णय घेणार नाही. मग आपण पाप करून धन मिळविणार नाही. कर्ज होईल असा खर्च करणार नाही. अपचन होऊन आजारी पडू इतके खाणार नाही. इतराना पीडा होईल असे बोलणार नाही. असे कर्म करणार नाही. उशीर होईल अशी चालण्याची गती ठेवणार नाही आणि चिंता निर्माण होईल इतका विचार करण्याचा अतिरेक करणार नाही. मग आपणास नेहमी सकारात्मक विचार करण्याचीच सवय लागेल. गणेशमूर्तीपासून मिळणारा ज्ञानप्राप्तीचा संदेश आपल्या जीवनात क्रांती घडवू शकतो. मात्र या सर्व गोष्टी आपल्यावरच अवलंबून असतात. आपल्यात चांगला बदल घडविले आपल्याच हाती असते. 
             गणेशमूर्तीचे मोठे कान सर्व नीट ऐकून घ्या असा संदेश देत असतात. आपले कान डोळ्यांसारखे बंद करता येत नाहीत.ते सतत उघडेच असतात. आपण इतरांचे शांतपणे ऐकून घेतले तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होत असते. आज समाजात कोणकुणाचे ऐकत नसल्यामुळेच काही ठिकाणी  प्रश्न निर्माण झाले आहेत, मुले पालकांचे ऐकत नाहीत. पालक मुलांचे ऐकत नाहीत. नेते लोकांचे ऐकत नाहीत. लोक नेत्यांचे ऐकत नाहीत. ऐकून घ्यायला कुणाला वेळच नाही. आणि ऐकून घेण्याची इच्छाही नाही. 
             गणेशमूर्तीचे बारीक सुंदर डोळे प्रत्येक गोष्टीचे नीट निरीक्षण करा असे सुचवीत असतात. सूक्ष्म निरीक्षण ही तर वैज्ञानिक होण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट असते. बरेचदा नीट निरीक्षण न केल्यानेच आपल्या हातून चुका होत असतात, 
गणेशमूर्तीची लांब सोंड दूरदृष्टीने निर्णय घ्या असे सुचवीत असते. 
             गणेशमूर्तीचे चार हात वेळेचे आणि कामांचे व्यवस्थापन कसे करायचे ते दर्शवीत असतात. एकाचवेळी अनेक कामे आपण करू शकतो. प्रत्येक वेळेचा , आणि आपल्या कार्यशक्तीचा आपण पुरेपूर वापर करू शकतो. आपली कार्यक्षमता वाढविणे आपल्याच हाती असते. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. मूर्तीच्या हातातील शस्त्रे आपले रक्षण आपणच करा हे सांगत असतात. तसेच दुष्ट विचारांचा नाश करा असाही संदेश देत असते. 
            श्रीगणेशाचे मोठे पोट इतरांचे अपराध पोटात घाला. इतराना क्षमा करा असे सुचवीत असते. . आपण जीवनात या गोष्टी आचरणात आणल्या तर आपले जीवन अधिक यशस्वी होऊ शकते. तसेच हितसंबंध सुधारण्यास  मदत होते. गणपती हा सुखकर्ता आहे. दु:खहर्ता आहे. तो विघ्न विनाशक आहे. त्याची पूजा त्याच्यापासून हे गुण शिकण्यासाठीच करावयाची असते. सुखाच्या किंवा आनंदाच्या क्षणांची आपण वाट पहात राहिलो तर कायमचे वाटच पहात राहू. पण मिळालेला प्रत्येक क्षण जर आपण सुखात आनंदात घालविला तर आपण कायमचे सुखी व आनंदी राहू .
                                                बाप्पाला निरोप
            आज सर्वजण शेवटच्या आरतीच्या वेळी एकत्र येतात परंतु दररोज प्रमाणे त्यामध्ये उत्साह नसतो. कारण आज बाप्पाला निरोप द्यायचा असतो. वातावरण गंभीर असते. प्रत्येकाच्या मनात हुरहूर असंते. गणपतीबापापाच्या मूर्तीचे आज विसर्जन करावयाचे असते. प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून मूर्तीमध्ये देवत्त्व आणलेले असते, मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजेनंतर मंत्र म्हणून ते देवत्व काढून घ्यावयाचे असते. आरतीनंतर घरातील सर्व मंडळी आपापल्या मनांत श्रीगणेशाची प्रार्थना करीत असतात. मुले अध्ययनात यश मिळावे म्हणून प्रार्थना करीत असतात. घरात कुणी आजारी असेल तर तो बरा व्हावा यासाठी गणेशाला साकडे घातले जाते. घरात सुख-समाधान नांदावे यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत असतो. हातून काही अपराध घडले असतील तर क्षमायाचना करीत असतात. संपूर्ण वर्षात कधी एकमेकाला न भेटणारे आप्तेष्ट गणेशपूजेच्या निमित्ताने एकत्र आलेले असतात. त्मुळे सर्वांनाच आनंद होत असतो. . खरं म्हटलं तर जे आपण गणेशाकडे मागत असतो ते मिळविणे आपल्याच हाती असते. म्हणूनच स्वत:च्या प्रगती साठी आपणच प्रयत्न करावयास हवेत. 
           घरातील सर्वांनी प्रार्थना  करून झाल्यावर गणेशाने  लवकर पुन्हा येण्यासाठी  त्याच्या हातावर दही घातले जाते. आणि नमस्कार करून मंत्र म्हटले जातात.....
               " यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवम् ।
                 इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
                 आवाहितदेवतां विसर्जयामि ।। "
      नंतर मूर्ती विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होतो . सर्वजण आपल्या आवडत्या बाप्पाच्या नावाचा जयघोष करीत असतात.आणि बाप्पाला विनंती करीत असतात.
       " गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !"

Web Title: Ganapati Bappa Morya, come early next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.