विद्येच्या प्रांगणात अस्वस्थतेच्या पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:24 PM2019-07-11T13:24:20+5:302019-07-11T13:25:45+5:30

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. राज्य शासनाचे ‘प्रयोग’ अजूनही सुरु आहे.

Feeling uneasy in the courtyard of Wisdom | विद्येच्या प्रांगणात अस्वस्थतेच्या पाऊलखुणा

विद्येच्या प्रांगणात अस्वस्थतेच्या पाऊलखुणा

Next

मिलिंद कुलकर्णी
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. राज्य शासनाचे ‘प्रयोग’ अजूनही सुरु आहे. भाजप-शिवसेना युती सरकारच्या पाच वर्षांत शिक्षण खात्याइतके प्रयोग कोणत्याही शासकीय खात्यात झाले नसतील. शासन निर्णयांचादेखील विक्रम नोंदविला गेला. मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपध्दतीविषयी टीका आणि चेष्टा अशा दोन्ही जोरकसपणे झाल्या. शिक्षणाचा हल्ली ‘विनोद’ झाला आहे, हा विनोद त्यापैकीच एक होता. मुख्यमंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली आणि पावणे पाच वर्षांनंतर तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण खाते काढून घेण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण खाते मात्र त्यांच्याकडे कायम आहे.
अभाविपसारख्या विद्यार्थी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या विनोद तावडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. विद्यापीठ कायद्यासारख्या मोजक्या गोष्टी सोडल्या तर शिक्षण विभागात गोंधळाचे वातावरण राहिले. निर्णयात धरसोडवृत्ती दिसली. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे लांबलेले निकाल हा तर कळसाध्याय होता.
नवीन पिढी घडविण्याचे मोठे कार्य करणाऱ्या शिक्षणासारख्या क्षेत्रात नव्या युगाशी जुळवून घेणारी शिक्षण प्रणाली, रोजगाराभिमुख शिक्षण अशा गोष्टींची अपेक्षा आहे. पण त्यादृष्टीने कृती काही होताना दिसत नाही. घोषणा होतात, निर्णय जाहीर होतात. अंमलबजावणीच्यादृष्टीने निराशाजनक स्थिती आहे.
शिक्षण क्षेत्रातील वातावरण निकोप असायला हवे. विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक या घटकांचा समावेश असलेल्या शैक्षणिक परिवारामध्ये परस्पर संवाद आणि विश्वासाचे वातावरण हवे. परंतु, काही तरी बिनसले आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. ते दुरुस्त करण्याचे उपाय, इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी शासनाकडे नाही, हे स्पष्ट दिसत आहे.
तीन ठळक घटना नमूद करायला हव्यात. पहिली घटना ही जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातील प्राध्यापकाचे एकतर्फी प्रेमप्रकरणाने उजेडात आली. विद्यापीठातील जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ.सुधीर भटकर यांच्याविषयी ही तक्रार असून एका विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे तक्रारअर्ज आणि तक्रारीच्या पुष्टयर्थ संवादाच्या ध्वनीफिती सादर केल्या आहेत. एका प्राध्यापकाच्या विद्यार्थिनीविषयीच्या प्रेमभावना, एकतर्फी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी निवड केली तीही एका विद्यार्थिनीची, संभाषणाची ध्वनीफित तयार होणे, तीन विद्यार्थिनींच्या गुणात वाढ झाल्याची तक्रार, माजी विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड यांच्या या कारवाया असल्याचा भटकरांचा आरोप...हा सगळा घटनाक्रम शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घडतोय हेच मुळात धक्कादायक आहे. कुलगुरुंनी चौकशी समिती नेमली आहे. या समितीने निश्चित कालमर्यादेत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, ही अपेक्षा राहणार आहे.
दुसरी घटना, ही जळगावच्या मू.जे.महाविद्यालयात घडली. दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका विद्यार्थ्याचा निघृण खून झाला. महाविद्यालयाच्या आवारात गजबजलेल्या ठिकाणी भरदुपारी चॉपरने हल्ला होतो आणि एका विद्यार्थ्याला प्राण गमवावा लागतो, ही परिस्थिती भयावह आहे. ११ वीत प्रवेश घेणाºया १६ वर्षांच्या स्वप्नाळू विद्यार्थ्याची महाविद्यालयाविषयीच्या काही कल्पना असतात. त्याला धक्का पोहोचविणारे हे वातावरण आहे. असेच दहशत व भयाचे वातावरण शहरातील दुसरे मोठे महाविद्यालय नूतन मराठा महाविद्यालयात असल्याचा आरोप होत आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन अ‍ॅड.विजय पाटील व नीलेश भोईटे या दोन गटात वाद सुरु आहे. सध्या ही संस्था भोईटे गटाच्या ताब्यात आहे. अ‍ॅड.पाटील यांचे पुतणे पियूष हे महाविद्यालयाच्या आवारात दहशत माजवित असल्याचा आरोप प्राचार्य डॉ.एल.टी.देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. बुधवारी प्राध्यापकांनी निदर्शने केली. २९ रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली. हा आरोप खोटा असल्याचे अ‍ॅड.पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांच्या समर्थनार्थ प्रतिभा शिंदे यांच्या सह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संस्थेच्या वादात शिक्षण क्षेत्र, विद्यार्थी आणि प्राध्यापक भरडले जात आहेत, याकडे दोन्ही गटांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन आणि विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी मूकदर्शक बनू नये, एवढी माफक अपेक्षा आहे.

Web Title: Feeling uneasy in the courtyard of Wisdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव