दादरच्या रेल्वे पुलावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली. पायी जाणारे जीव मुठीत घेऊन चालायचे. ही बाब तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली ते तेथून रोज ये जा करणाºया पादचा-यांनी. आर.आर. स्वत: एकदा त्या पुलावर गेले. सगळे फेरीवाले उठवले गेले. पुन्हा येथे फेरीवाले दिसले तर तुमची नोकरी जाईल असा दम त्यांनी तिथल्या पोलीस अधिका-यांना दिला. त्यानंतर काही महिने तो पूल फेरीवाल्यांसाठी बंद राहिला. मात्र आर. आर. गेले तसे फेरीवाले पुन्हा आले. आजही दादरच नाही तर मुंबईतल्या सगळ्या रेल्वे पुलांवर फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. रेल्वेचे अधिकारी ते पोलीस सगळ्यांना हे फेरीवाले हप्ते देतात. त्यामुळे त्यांना उठवण्याची हिंमत कोणातही नाही.
खुलेआम स्टेशनवर गॅस सिलेंडर लावून बटाटेवडे तळण्यापासून खायचे पदार्थ केले जातात. त्यांना कोणी जाब विचारत नाही. रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा असणाºया झोपड्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदारांसाठी मतपेट्यांचे अड्डे आहेत. रेल्वेच्या जागेत ठिकठिकाणी नाल्याच्या पाण्यावर पालेभाजी पिकवली जाते. ती राजरोस विकली जाते. त्यावर आजपर्यंत कधी कारवाईची हिंमत अधिका-यांंनी दाखवलेली नाही. कारण हेच अधिकारी अशा लोकांकडून वरकमाई काढून घेतात. रेल्वेचे प्रश्न अधिकाºयांना माहिती नाहीत असे नाही. सगळ्यांना सगळे माहिती आहे, हिंमत मात्र कोणाकडेही नाही कारण सगळे मिंधे झालेले आहेत.
गोयल यांनी अनेक वर्षे मुंबईत लोकलने प्रवास केलाय. त्यांना सगळे विषय माहिती आहेत. त्यांनी जर या सगळ्या विषयात कारवाईची हिंमत दाखवली तर आज संतप्त झालेले मुंबईकर त्यांना डोक्यावर घेऊन फिरतील. या रेल्वे अपघाताने शुक्रवारी २२ बळी घेतले. गेल्या आठ महिन्यात मुंबई रेल्वेने दोन हजार बळी घेतले आहेत. हजारो कोटींचे उत्पन्न मुंबई लोकलमधून मिळवणारे केंद्र सरकार मुंबईच्या हाती मात्र कटोरा देत आले हे पुन्हा एकदा लख्खपणे समोर आले. मात्र या सगळ्यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पुरती लाज निघाली. ही जमात किती निर्ढावलेली आहे हे या अपघाताने अधोरेखित केले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ साली अपघातग्रस्त एलफिन्स्टन पुलाच्या दुरुस्तीचे काम मंजूर केले होते. मग त्याचे टेंडर २०१७ संपत आले तरी का निघाले नाही? कोण अधिकारी त्याला जबाबदार होता याचा जाब कोणी विचारायचा? त्या अधिकाºयांना शिक्षा कोणी करायची? सगळे एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात. ज्यांच्या अक्षम्य चुकीमुळे हे रेंगाळले त्याचे नाव आणि कारण जनतेला कळलेच पाहिजे.
मुंबईत येणा-या रेल्वेच्या अधिका-यांना या शहराविषयी, इथल्या प्रश्नांविषयी आस्था नाही, ते कधी लोकलने प्रवास करत नाहीत. रेल्वेचे अनेक कर्मचारी, अधिकारी रात्री मुंबईहून सुटणा-या एक्स्प्रेसच्या एसी डब्यात तिकीट काढलेल्या प्रवाशांच्या जागेवर बसून ठाणे, कल्याणपर्यंत फुकटात प्रवास करतात. त्यांना लोकलचे दु:ख कधी कळावे? गोयल यांनी सात दिवसात आॅडिट करण्याची घोषणा केली आहे पण आधी या मानसिकतेचे आॅडिट करा, अधिकाºयांच्या जबाबदा-या निश्चित करा. तरच रोज रेल्वे अपघातात हकनाक बळी जाणे थांबेल. नाहीतर एकदिवस या संतापाचा उद्रेक होईल तो थांबवणे अशक्य असेल...!