ज्येष्ठता महत्त्वाची की योग्यता?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 12:11 AM2018-08-07T00:11:26+5:302018-08-07T00:11:48+5:30

शाळेतून आल्यापासून मोरू गप्प-गप्प होता. कोणाशी बोलला नाही, की ग्राउंडवर खेळायला गेला नाही.

Elderhood is important that qualification? | ज्येष्ठता महत्त्वाची की योग्यता?

ज्येष्ठता महत्त्वाची की योग्यता?

Next

- नंदकिशोर पाटील
शाळेतून आल्यापासून मोरू गप्प-गप्प होता. कोणाशी बोलला नाही, की ग्राउंडवर खेळायला गेला नाही. बेडरुमचं दार बंद करून बसला होता. आईनं हाका मारल्या तरी त्यानं प्रतिसाद दिला नाही. मोरूचं आज कोणाशी तरी बिनसलं असावं, म्हणून नेहमीप्रमाणे ती कामाला लागली. दिवेलागणीची वेळ होताच शाखेत गेलेले आजोबा आणि आॅफिसात गेलेले मोरूचे बाबा घरी परतले. नेहमीप्रमाणे सर्वजण संध्या करायला एकत्र बसले. मोरू दिसत नाही, म्हणून आजोबांनी चौकशी केली. मोरुची आई म्हणाली, ‘शाळेतून आल्यापासून तो दार बंद करून बसलाय.’ आजोबांनी दाराला थापा मारून मोरुला आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सगळेच काळजीत पडले. मोरुच्या बाबानं युक्ती काढली. ‘तुला नवीन मोबाईला आणला आहे, बाहेर ये’ असा मेसेज पाठविला आहे. युक्ती फळाला आली. मोरू तात्काळ बाहेर आला. ‘कुठंय मोबाईल?’ मोरुनं विचारलं तसं सगळे हसू लागले. मोरू चिडला. ‘बेटा, आमिषाला बळी पडू नये हा धडा आज तुला मिळाला’ बाबांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. आजोबांनी त्याला जवळ घेत विचारलं, ‘बेटा तू नाराज दिसतोयंस. शाळेत काही झालंय का?’ त्यावर तो म्हणाला, ‘माझा हक्क डावलण्यात आलाय. मी वर्गात सर्वांत सिनिअर असताना क्लास टिचरनी मला मॉनिटर केलं नाही!’ मोरुच्या नाराजीचं कारण कळल्यानंतर पुन्हा सगळ्यांना हसू आवरेना. आजोबा म्हणाले, ‘अरे मोरू, वर्गात तर सगळे विद्यार्थी एकसमान असतात. मग तू एकटाच कसा सिनिअर?’ त्यावर मोरुनं खुलासा केला. ‘आजोबा, दहावीचं हे माझं तिसरं वर्ष आहे. या अर्थी मी नुसता सिनिअरच नाही तर अनुभवी देखील आहे!’. मोरुचा तर्क भन्नाटच होता. ‘मॉनिटर होण्यासाठी ही सिनिअ‍ॅरिटी काही कामाची नसते’ आईनं मध्येच वाक्य फेकलं. ‘हो, अगदी बरोबर. मॉनिटर होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. हुशार विद्यार्थ्यालाच हल्ली तो मान मिळतो. तुझ्यासारख्या रिपीटरला नाही!’ बाबांनी संधी साधली. पण मॉनिटर या विषयावर मोरुचं होमवर्क पक्कं होतं.
तो म्हणाला, ‘मग बाबा तुमच्या या नियमानं अनुभवी लोकांना कुणीच विचारणार नाही. नोकरीसाठी अनुभव प्रमाणपत्र का मागतात? ज्येष्ठांचा मान राखला पाहिजे असे का म्हटले जाते? आपल्या घरात आजोबांना आपण का मान देतो?’ मोरुची प्रश्नावली मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबतच गेली. मग आजोबांनी त्याला ‘ज्येष्ठता’ आणि ‘योग्यता’ यातील फरक समजून सांगितला. ते म्हणाले, ‘अरे बाळ, मॉनिटर होणं म्हणजे, वर्गाचं नेतृत्व करणं होय. नेतृत्वासाठी अनुभवापेक्षाही योग्यता महत्त्वाची असते.’ पण आजोबांचे हे स्पष्टीकरण मोरुच्या डोक्यावरून गेले. मोरुनं विचारलं ‘उदाहरणार्थ?’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘हे बघ. आडवाणी अंकल, सुषमा आँटी हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असताना त्यांना डावलून नरेंद्र अंकल पीएम बनले की नाही!’ आजोबांचे हे सोदाहरण स्पष्टीकरण ऐकल्यानंतर मोरुनं टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र उघडलं आणि आतील पानावर छापून आलेली ‘मी अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ असताना मला सीएम पदासाठी डावलण्यात आलं’-खडसेंची नाराजी!’ ही बातमी मोठ्यानं वाचली. त्यावर आजोबांनी पुन्हा तोच खुलासा केला. ‘नेतृत्वासाठी ज्येष्ठत्वापेक्षा कर्तृत्व महत्वाचं असतं!

Web Title: Elderhood is important that qualification?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.