मीरा गेली, नकोशींचे काय?

By किरण अग्रवाल | Published: January 3, 2019 07:51 AM2019-01-03T07:51:52+5:302019-01-03T08:05:16+5:30

समाजात रुजलेल्या पारंपरिक गैरसमजांमधून अजूनही लोक बाहेर पडलेले नाहीत, स्री-पुरुष समानतेचा कितीही जागर घडून येत असला तरी मुलगा तो मुलगाच, अशी धारणाही त्यापैकीच एक.

Editor's View on meera ekhande case and girl child | मीरा गेली, नकोशींचे काय?

मीरा गेली, नकोशींचे काय?

Next

किरण अग्रवाल

समाजात रुजलेल्या पारंपरिक गैरसमजांमधून अजूनही लोक बाहेर पडलेले नाहीत, स्री-पुरुष समानतेचा कितीही जागर घडून येत असला तरी मुलगा तो मुलगाच, अशी धारणाही त्यापैकीच एक. त्यामुळे मुलगा हवा या अट्टाहासापोटी दहाव्यांदा बाळंतपणास सामोरी गेलेल्या व त्यात जीव गमवावा लागलेल्या भगिनीबद्दल हळहळ व्यक्त होत असताना आता तिच्या पाठीशी असलेल्या मुलींचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.

माता-पित्यांना टाकून देणाऱ्या अगर वृद्धाश्रमाच्या दारी नेऊन पोहचविणाऱ्या मुलांच्या कहाण्या कमी नाहीत. त्याउलट माहेर सोडून सासरी गेलेल्या मुलींनी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा मनोभावे सांभाळ व अंतिमत: क्रियाकर्मही केल्याची अनेक उदाहरणे अवतीभोवती आहेत. असे असतानाही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही मानसिकता पूर्णत: संपुष्टात येऊ शकलेली नाही. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये घडलेल्या एका प्रकाराने तर यासंदर्भातील समाजातले मागासपणच ढळढळीतपणे समोर आणून ठेवले आहे. मीरा एखंडेनामक भगिनी वयाच्या ३८व्या वर्षी तब्बल दहाव्या बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. अर्थातच, सात मुली असलेल्या व दोनदा गर्भपाताला सामोरे जावे लागलेल्या या मातेला मुलगा हवा होता. परंतु या बाळंतपणात तिचा जीव गेला. येथे या मातेचीच तशी इच्छा होती, की कुटुंबाच्या इच्छेखातर ती अल्पावधीत पुन्हा पुन्हा बाळंतपणाला राजी झाली, हा खरा प्रश्न आहे; पण त्याकडे गांभीर्याने बघितले जाताना दिसत नाही.

कोणत्याही मातेसाठी मुलगा असो की मुलगी, तो तिच्या पोटचा गोळा असतो. त्यात आई तरी सहसा भेद करीत नसते. पण, अनेकदा घरातील बुरसटलेल्या विचारांचे कुटुंबीय वा आप्तेष्ट अशा काही टीका-टिप्पण्या करीत असतात की, ज्यातून मुलगाच हवा, असा संकेत घेता यावा. मीरा एखंडेही त्याचीच बळी ठरली नसेल कशावरून? मीरा तर ग्रामीण भागातली होती. तिच्या शिक्षणाचे माहीत नाही; पण मागे दीड-दोन महिन्यांपूर्वी मुलीस जन्म दिला म्हणून एका प्राध्यापकाने आपल्या पत्नीस घराबाहेर काढून दिल्याची तक्रार नाशिकमध्ये नोंदविली गेली होती. ही उदाहरणे कशाची लक्षणे म्हणावीत? सामाजिक, आर्थिकच नव्हे तर लिंगभेदाबाबतही समानता अजून साकारू शकली नसल्याचेच यातून स्पष्ट होणारे आहे. म्हणूनच, नारीशक्तीच्या जागराला व बेटी बचाव, बेटी पढावसारख्या उपक्रम-योजनांना अधिक गती देण्याची गरज आहे. वरवरच्या उत्सवी कार्यक्रमांना व घोषणांना न भुलता ग्रामीण भागात मुळापर्यंत पोहचून याबाबतची जाणीव जागृती करावी लागेल. अन्यथा, मीरासारख्या भगिनींचे अनिच्छेने पडणारे बळी टाळता येणार नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे, मीरा किंवा तीच्या कुटुंबीयांचा मुलासाठीचा अट्टाहास लक्षात घेता यापूर्वीची तिची अपत्ये ही ‘नकोशी’च ठरणारी आहेत. तेव्हा, मीराच्या मृत्यूनंतर तिच्या सात मुलींच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे हा खरा सुजाणांना अस्वस्थ करणारा प्रश्न ठरावा. मुलगाच हवा या मानसिकतेपायी जन्मास येऊनही दुर्लक्षिल्या जाणाऱ्या ‘नकोशी’ची समस्या किंवा त्यांची अवहेलना हा चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१७-१८च्या आर्थिक सर्वेक्षणात पहिल्यांदा याकडे लक्ष वेधले गेले. इच्छेविरुद्ध जन्मास आलेल्या ‘नकोशी’ची संख्या देशात सुमारे दोन कोटींहून अधिक असल्याचे त्यातून पुढे आले होते. या मुली वाढतात, जगतात. परंतु समन्यायी सन्मान, अधिकार त्यांच्या वाट्याला येत नाही. समानतेपासून त्या दूर-उपेक्षित राहतात. या भेदाभेदकडे लक्ष पुरवून त्यासंदर्भातली मानसिकता बदलणे आज गरजेचे आहे. समाजधुरिणांनीच त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मीराबाईच्या पश्चात असलेल्या कन्यांकडेही याचदृष्टीने बघता येणारे आहे.

Web Title: Editor's View on meera ekhande case and girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.