editorial view on Politics of Solapur | देशमुखी थाट! खुर्ची, दोस्ती अन् दुनियादारी...
देशमुखी थाट! खुर्ची, दोस्ती अन् दुनियादारी...

सोलापुरी खुर्ची तशी लईऽऽ डेंजर. भल्या-भल्यांची दोस्ती तोडणारी. मी-मी म्हणणाऱ्यांना कामाला लावणारी. आता तर निवडणुका जवळ येऊ लागल्यात. अनेक नेत्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटू लागलेत. सोलापुरात कमळाचा ‘देशमुखी थाट’ पुन्हा वधारु लागलाय... तर कुर्डूवाडीत दोन ‘संजय’ एकमेकांना ‘गाळा’त अडकविण्यात मग्न झालेत. खऱ्या अर्थानं, इथल्या राजकारणात ‘खुर्ची, दोस्ती अन् दुनियादारी’च्या कहाणीला प्रारंभ झालाय. मग आपण तर कशाला मागं सरकायचं रावऽऽ... लगाव बत्तीऽऽ

दोन चव्हाण एकत्र...मग दोन देशमुख का नाही?

‘हात’वाल्यांचा ‘संघर्ष’ आता पराकोटीला पोहोचलाय. खरं तर, आयुष्यभर एकमेकांशी ‘संघर्ष’ करण्यातच यांची जिंदगानी गेलेली; मात्र आता जनतेसाठी संघर्ष करण्याच्या मोहिमेत हे सारे नेते चक्क एकत्र आलेत. सोलापुरात ज्या दिवशी ही यात्रा मुक्कामी पोहोचली, त्या दिवशी होता लाडक्या सुपुत्राचा जन्मदिन. यानिमित्त अशोकराव नांदेडकरांनी केक कापला...अन् पृथ्वीबाबा क-हाडकरांना खाऊ घातला. किती मोठा योगायोग पाहा. सोलापूरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करतात दोन माजी मुख्यमंत्री. असा दुर्मिळ योग अवघ्या महाराष्टानं प्रथमच अनुभवला असावा. 

असो. ‘हात’वाले दोन ‘चव्हाण’ सोलापुरात एकत्र आले; परंतु इथलेच दोन ‘देशमुख’ कधी एकत्र येणार? हा प्रश्न अनुत्तरीतच. एकवेळ बापूंचा कारखाना शेतक-यांची सर्व बिलं कधी देणार, हे सांगू शकू. मालकांचा पेट्रोल पंप पुन्हा सुरू होणार का, हे बोलू शकू...परंतु या दोघांच्या मनोमिलनाचा मुहूर्त कुणीच काढू शकणार नाही, हे मात्र नक्की. 

‘संजय’ दोन...‘महाभारत’ एक !

जेव्हा ‘हात’वाल्यांचा सुवर्णकाळ होता, तेव्हा ‘जाई-जुई’समोर चार तारखेला केक कापण्यासाठी अक्षरश: रांग लागलेली असायची. काळाच्या ओघात केक कमी झाले. अनेकांच्या हाती फक्त चाकूच राहिले. पाठीत वार करण्यासाठी. मात्र, ‘खुर्ची’ गेल्यानंतर अनेकजण शहाणे झाले, भानावर आले. ‘घड्याळ’वाले मात्र अजूनही ‘हम अंग्रेज के जमाने के...’ डॉयलॉगमध्येच रमले.

माढा तालुक्यातलं आधुनिक ‘महाभारत’ही दोन ‘संजय’मध्येच रंगलेलं.. केवळ खुर्चीसाठी. एकेकाळचे मित्र आज शत्रू बनलेले.. केवळ सत्तेसाठी. कधीकाळी गळ्यात गळे घालून फिरणारे आता एकमेकांना ‘गाळा’त ढकलण्यासाठी आसुसलेले.. केवळ भावी आमदारकीसाठी. होय.. कोकाटेंच्या संजयबाबांना म्हणे माढ्यातली आमदारकी वाकुल्या दाखवू लागलीय. खिसा खुळूखुळू लागलाय. शिंदेंच्या संजयमामांनाही करमाळ्याची आमदारकी खुणावू लागलीय. त्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळात उजनी खो-यात अनेक नवे मित्र जोडलेत; परंतु त्या नादात भीमेकाठचे कैक जुने दोस्त गमावलेत, त्याचं काय? कारण राजकारणात म्हणे कधीही ‘शत्रू बनलेला मित्र’ धोकादायकच!

लोकसभेला पत्ता कट झाला तर खासदार वकील आमदारकीला.. 

लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागलीय, तसतसे साबळेंच्या अमररावांचे दौरे वाढत चाललेत. सकाळी सांगोला, दुपारी मंगळवेढा, तर संध्याकाळी मोहोळ म्हणे. आत्तापासून व्यवस्थित नियोजन आखणा-या साबळे गटाची पुढची आखणी काय असू शकते, हे सोलापूरच्या कार्यकर्त्यांनाही समजू लागलंय. म्हणूनच की काय, पानमंगरुळच्या खासदार वकिलांची जवळीक अनगरच्या मालकांसोबत वाढत चाललीय. बाळराजेंच्या तोंडीही कोडकौतुकाची भाषा उमटू लागलीय. कदाचित लोकसभेला पत्ता कट झाला तर खासदार महाशय आमदारकीला मोहोळमध्ये उभारणार की काय, हा सवाल ‘कमळ’ छाप कार्यकर्त्यांना पडू लागलाय.. कारण साबळेंसोबत अक्कलकोटकडच्या एका मठातल्या महाराजांचंही नाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चिलं जाऊ लागलंय. ‘हेळरीऽऽ इग येन माडादू?’

साता-यात खुट्ट झालं की म्हणे अकलूजकर दचकतात...

माढा लोकसभेतलं राजकारण तर भलतंच वेगळं. अकलूजकरांना सध्या एकाच वेळी तीन ठिकाणांवर लक्ष ठेवावं लागतंय. एक माढ्याचे संजयमामा. दुसरे पंढरपूरचे प्रशांतमालक.. अन् तिसरे फलटणचे राजे. खरं तर, फलटणकरांची इच्छा साता-यात उभारण्याची, मात्र साताऱ्याच्या थोरल्या राजेंनी डरकाळी फोडली की फलटणमध्ये अस्वस्थता पसरते. लगेच साता-याऐवजी माढ्यात उभारण्याची कुजबूज सुरू होते... मग काय,  त्याचा इम्पॅक्ट थेट अकलूजकरांवर होतो. कार्यकर्त्यांमध्ये चुळबूळ सुरू होते.. म्हणूनच की काय, तिकडं साता-यात थोडंतरी खुट्ट झालं की इकडं अकलूजकर दचकतात. थोरल्या अन् धाकट्या दादांकडे काव-या-बाव-या नजरेनं पाहू लागतात. भलेही दोन्ही दादांचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास असेल, पण बारामतीच्या धाकट्या दादांवर कोण भरवसा ठेवणार बुवा ऽऽ


Web Title: editorial view on Politics of Solapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.