आधी या वेताळाला आवरा! मुलींची ओळख आपण त्यांना न सांगता जगजाहीर केली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:06 AM2024-02-27T09:06:49+5:302024-02-27T09:07:16+5:30

एक समाज म्हणून आपण या तरुणाईला हात द्यायला हवा. नाहीतर मानगुटीवर बसलेला संस्कृतिरक्षणाचा वेताळ आपल्याला एक पाऊलही पुढे घालू देणार नाही!

Editorial: Stop this Vetal first! they made the identity of the girls public without telling them... vetal Tekadi Drug adict girls viral Video | आधी या वेताळाला आवरा! मुलींची ओळख आपण त्यांना न सांगता जगजाहीर केली...

आधी या वेताळाला आवरा! मुलींची ओळख आपण त्यांना न सांगता जगजाहीर केली...

पर्यावरण आणि भ्रमण यासाठी पुणेकरांना ठाऊक असलेली ऐतिहासिक वेताळ टेकडी सध्या भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ येतो काय आणि तो व्हायरल होऊन सर्वदूर पोहोचतो काय, सगळेच भयंकर! नशेत असलेल्या दोन तरुण मुलींना कशाचेही भान नसते.  वेताळ टेकडी हे पुणेकरांचे ‘मॉर्निंग वॉक’साठीचे लाडके ठिकाण. सकाळी सकाळी तिथे आलेल्यांना या ‘बेशुद्ध’ मुली दिसतात. कोणत्याही सुसंस्कृत माणसांनी त्या मुलींना दवाखान्यात नेले असते आणि फार तर त्यांच्या पालक-शिक्षकांशी बोलून पुढे समुपदेशन वगैरे प्रयत्न केले असते. यातील काही लोकांनी मात्र आधी त्याचे ‘फेसबुक लाइव्ह’ केले! हे ‘लाइव्ह’ करताना, “बघा बघा ही आजची पिढी कशी नशेमध्ये अधीन होत चालली आहे!” वगैरे प्रवचन सुरू होतेच. यामुळे त्या मुलींची ओळख आपण त्यांना न सांगता जगजाहीर केली, या अपराधाचेही त्यांना भान नव्हते. व्यसनाधीनता वाईटच. व्यसनी मुलगा असो वा मुलगी, वाईटच. पण मुलगी व्यसनाधीन आहे, हे समजले की जगबुडी झाल्याच्या थाटात लोक डांगोरा पिटतात, हे त्याहून धोकादायक.

माणसे ज्याप्रमाणे कर्करोगावर मात करत नव्याने आयुष्य जगू लागतात, त्याप्रमाणे व्यसनाधीनतेवर मात करतही नव्याने उभी राहतात. अशी असंख्य उदाहरणे आहेत. अगदी ‘ड्रग ॲडिक्ट’ असलेला खेळाडू त्यातून कसा बाहेर पडला, हे त्याने स्वतःच सांगितल्याची उदाहरणे आहेत. व्यसनाधीन मुला-मुलींना त्या त्या वेळी उपचार मिळावयास हवेत. समुपदेशन व्हायला हवे. त्यांची ओळख जगजाहीर करून संस्कृतीच्या नावाने गळे काढणे हा त्यावरचा मार्ग नव्हे. ‘रेव्ह पार्टी’वर छापा टाकून तिथल्या व्यसनाधीन मुला-मुलींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून एखादा पोलिस अधिकारी बातम्यांमध्ये उमटेलही, पण तरुणाईचे काय? मद्य अथवा ड्रग्जच्या नशेत ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, अशी मुले श्रीमंत घरातील असतील, तर मध्यमवर्गीयांच्या रसवंतीला आणखी बहर येतो! आपल्याला आयुष्यात पैसे कमावता आले नाहीत, हा त्यांचा ‘गिल्ट’च बहुधा त्यामुळे गळून पडतो. आपण जे काही ‘मध्यममार्गी’ आयुष्य जगलो, ते कसे थोर होते, हा ‘इगो’ मग त्यांना कुरवाळता येतो. त्यातही व्यसनाधीन मुलगी असेल तर मग ते ‘सॉफ्ट टार्गेट’.

मुळात मुलींनी रात्री घराबाहेर पडू नये. दिवसासुद्धा कुठे जावे, कोणते कपडे घालावेत, याचे काही निर्बंध असायला हवेत. हल्ली मुली फारच अनिर्बंध वागू लागल्या आहेत, याचा आधीच त्रास असतो! कोणत्याही वेळी, हव्या त्या कपड्यात मुक्तपणे फिरणारी आणि सामाजिक प्रथांना न जुमानता आपल्या ‘टर्म्सवर’ जगणारी मुलगी आधीच खटकत असते. पण बोलता येत नाही आणि बोलले तरी मुली ऐकत नाहीत. सगळ्या संस्कृतीचा भार जिच्या खांद्यावर आहे, ती अशी अनिर्बंध झाली तर जगाचे कसे होणार, अशी चिंता असते या चिंतातुर जंतूंना. तेवढ्यासाठी ते स्त्रीला देवीच्या मखरात बसवतात. पाळण्याची दोरी हातात आली की तिला जगाचा उद्धार करायला सांगतात. ती मंत्री असो वा अधिकारी, आधी ती आई आणि पत्नी आहे, असे तिला बजावतात. दारू कोणीच पिऊ नये आणि व्यसनाधीन कोणीच होऊ नये, हे खरे. पण, पुरुष व्यसनाधीन होण्याची शक्यता जेवढी आहे, तेवढीच शक्यता स्त्रीबद्दलही आहे. मुद्दा समुपदेशनाचा आणि उपचारांचा आहे. शिवाय ही पिढी व्यसनाधीन होत आहे, असे सरसकट बोलणे चुकीचे आहे. खरे तर त्यात समाज म्हणून आपलीही चूक आहे.

कोणत्या प्रकारचे आयुष्य आपण यांना देत आहोत? आपली शिक्षणपद्धती, आपली कुटुंबसंस्था, आपली सामाजिक रचना, दांभिकतेवर उभी असलेली कथित मूल्यव्यवस्था याचाही आपण कधी फेरविचार करणार की नाही? ‘इट टेक्स ए व्हिलेज टू रेज ए चाइल्ड’ असे म्हटले जाते. तुमचे मूल अवघे गाव वाढवत असेल, तर या गावातल्या अंतर्विरोधांविषयी आपण बोलणार की नाही? वाढती व्यसनाधीनता काळजीचीच आहे. पण, संस्कृतिरक्षकांचे ‘सोशल पोलिसिंग’ त्याहून अधिक चिंताजनक आहे. बाइकवर एकमेकांना बिलगून बसलेल्या पोरापोरींना पाहून शिट्टी मारणारे पोलिसही तेच करत असतात. प्रत्येक नव्या पिढीची स्वप्ने वेगळी असतात आणि स्वप्नभंगही वेगळे. प्रत्येक पिढीसमोर संस्कृतीच्या नव्या वाटा असतात, तसेच निसरडे रस्तेही नवे असतात. हे ओळखून एक समाज म्हणून आपण या तरुणाईला हात द्यायला हवा. नाहीतर मानगुटीवर बसलेला संस्कृतिरक्षणाचा वेताळ आपल्याला एक पाऊलही पुढे घालू देणार नाही!

Web Title: Editorial: Stop this Vetal first! they made the identity of the girls public without telling them... vetal Tekadi Drug adict girls viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.