सहिष्णुतेला दुसरा पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 02:42 AM2017-07-26T02:42:07+5:302017-07-26T02:42:09+5:30

देशाच्या राष्ट्रपतिपदावरून पायउतार होताना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय एकात्मता राखायची तर सहिष्णुतेचे मूल्य जपणे आवश्यक आहे, असा जो संदेश सरकारला व जनतेला दिला तो आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा व राष्ट्रहिताचा आहे

editorial article on Tolerant and pranav mukharaji | सहिष्णुतेला दुसरा पर्याय नाही

सहिष्णुतेला दुसरा पर्याय नाही

Next

सुरेश द्वादशीवार (संपादक, लोकमत, नागपूर)
देशाच्या राष्ट्रपतिपदावरून पायउतार होताना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय एकात्मता राखायची तर सहिष्णुतेचे मूल्य जपणे आवश्यक आहे, असा जो संदेश सरकारला व जनतेला दिला तो आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा व राष्ट्रहिताचा आहे. अठरा पगड जाती व धर्म असलेल्या आणि भाषा व संस्कृतीबहुल असणाºया देशाला एकत्र राखू शकणारे एकमेव सूत्र सहिष्णुता हे आहे. त्याच बळावर भारत आपली राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता कायम राखू शकला आहे. दुर्दैवाने गेल्या तीन वर्षात ही सहिष्णुताच पणाला लागली असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाढत्या धर्मांधतेने आणि तिच्या प्रतिकांच्या नावावर जून २०१४ पासून आतापर्यंत देशात किमान ५० दंगली घडविल्या आहेत. त्यात ३२ माणसे ठार झाली आहेत. महाराष्ट्र, नागालँड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल, झारखंड, बंगाल, गुजरात, राजस्थान आणि आसाम या सगळ्या राज्यांत या धार्मिक हिंसाचाराचा डोंब उसळलेला देशाने दूरचित्रवाहिन्यांवर पाहिला व अनुभवला आहे. अल्पसंख्य जमातीतील युवकांना मरेस्तोवर मारझोड करणे, त्यांना रक्तबंबाळ करणे आणि प्रसंगी त्यांना झाडावर टांगून फाशी देणे अशा सगळ्या हिंस्र बाबींचा या प्रकारात समावेश आहे. आईबापांसमोर मुलांचा, जमावासमोर एखाद्या गटाचा आणि लोक जमवून एखाद्या समूहाला मारहाण करण्याचा असे सारे प्रकार यात घडले आहेत. गेल्या तीन आठवड्यात प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे किमान तीन इशारे दिले आहेत. पण ते सारे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असे ठरले आहेत. कारण मोदींचे इशारे येत असतानाच त्यांच्या पक्षाची माणसे ज्या तºहेने बरळताना दिसली ते पाहून हे सारे ठरवून चालविलेले नाटक तर नाही असेच एखाद्याला वाटावे. ‘जी माणसे गोमांस खातात त्यांना अशा सडकेवरच शिक्षा केल्या पाहिजेत’ हे प्राची नावाच्या एका खासदार महिलेचे उद््गार, ‘अल्पसंख्याकांना साहाय्य कराल तर त्याची किंमत मोजावी लागेल’ हे संगीतसोम या भाजपच्या उत्तर प्रदेशातील आमदाराचे म्हणणे, ‘गोवंशाची हत्या करणाºयांना आम्ही यापुढेही शिक्षा करू’ हे भूपेंद्र चौधरी या हिंदू रक्षा दलाच्या अध्यक्षाचे सांगणे आणि तरुण विजय या भाजपच्या प्रचारी खासदाराचे ‘देशातील अशांततेला अल्पसंख्याकच जबाबदार आहेत’ हे जाहीर करणे हा सारा बनाव पाहिला की ‘तू मारहाण कर मी सोडविण्याचे नाटक करतो’ अशी त्यातील फसवाफसवी  कुणाच्याही लक्षात यावी. खºया राष्ट्रनिष्ठेचा अभाव, वर्तमान जीवनाविषयीची अनास्था, लोकशाहीवर नसलेला विश्वास आणि आम्हीच तेवढे खरे व श्रेष्ठ अशा अडाणी व अहंकारी वृत्तीतून हे प्रकार घडतात. लोकांचा जगण्याचा व सुरक्षित आयुष्य काढण्याचा अधिकार एकदा क्षुल्लक ठरविला की अशी हिंसाचारी मानसिकता तयार होते. महाराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत आणि काश्मीरपासून केरळपर्यंत या घटना सर्वत्र घडत असतील तर त्यामागे राष्ट्रीय म्हणविणारे पक्ष व संघटना यांचाच हात आहे असा दुर्दैवी निष्कर्ष मग काढावा लागतो. हाच काळ दलितांवरील अत्याचारांच्या वाढीचा आहे. हैदराबाद, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा सगळ्या भागात आणि प्रत्यक्ष विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ते दलित म्हणून या काळात छळ झाला. त्यातल्या काहींनी आत्महत्या केल्या तर काहींनी त्याविरुद्ध आवाज उठविला. देशात संपूर्ण बहुमत पाठीशी असलेले मजबूत सरकार सत्तेवर आहे, ते देशभक्तीची व एकात्मतेची शपथ घेऊन सत्तारूढ झाले आहे. पण देश म्हणजे देशाची जमीनच नाही तर देशातली माणसेही आहेत याविषयीचे त्यांचे आकलन अपुरे वाटावे असे आहे. अशा माणसांच्या उंडारण्याचा आणि त्या उंडारण्याकडे कौतुकाने पाहण्याच्या काही पुढाºयांच्या वृत्तीचा हा परिणाम आहे. ही बाब प्रणव मुखर्जींसारख्या संवेदनशील नेत्यासह साºया सहिष्णू समाजाला व्यथित करणारी आहे. प्रणव मुखर्जी हे गेली ५० वर्षे देशाच्या राजकारणात आघाडीवर व सक्रिय राहिलेले नेते आहेत. केंद्र सरकारमधील सगळ्या महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. शिवाय इंदिरा गांधींपासून डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांचा कार्यकाळ त्यांनी संसदेत राहून पाहिला व अनुभवला आहे. पाच वर्षांची त्यांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्दही अतिशय यशस्वी झाली आहे. मुळात काँग्रेस पक्षाचे असलेल्या प्रणवदांनी मला मुलासारखे वागविले असे परवा नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. अशा अधिकारी व्यक्तीने केलेला उपदेश त्याचमुळे साºयांनी गंभीरपणे घ्यावा असा आहे. देशात वाद आहेत, फुटीरपण आहे, धर्म आणि भाषा यांचे झगडे आहेत, जातींचे अहंकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रदेशांच्या भिन्न भिन्न मागण्या आहेत. या साºयांच्या मागे विविध गटांचे व संघटनांचे लहानसहान अहंकार आहेत. या अहंकारांनी देशाची एकात्मता वेठीला धरली आहे. ती कायम राखायची तर त्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे सांगणारा प्रणव मुखर्जी यांच्याएवढा अधिकारी माणूस आज देशात दुसरा नाही. त्याचमुळे निरोपाच्या भाषणात त्यांनी केलेला हा उपदेश मोलाचा म्हणून घेणे गरजेचे आहे. दिल्लीत निवडणुका होतात आणि गल्लीत माणसे मारली जातात हे चित्र देशाची प्रतिमा मलीन करणारे आणि त्याच्या एकात्मतेवरही प्रश्नचिन्ह उमटविणारे आहे हेच येथे लक्षात घ्यायचे. 

Web Title: editorial article on Tolerant and pranav mukharaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.