डकवर्थ लुईसचे नियम आणि क्रिकेटचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:41 AM2019-07-20T04:41:05+5:302019-07-20T04:41:15+5:30

भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ती मोकाट सुटलेल्या डकवर्थ लुईस नियमांची!

Duckworth Lewis rules and cricket game | डकवर्थ लुईसचे नियम आणि क्रिकेटचा खेळ

डकवर्थ लुईसचे नियम आणि क्रिकेटचा खेळ

googlenewsNext

- संतोष देसाई
भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ती मोकाट सुटलेल्या डकवर्थ लुईस नियमांची! हा खेळ पहिल्या दिवशी सुरू राहिला असता, तर या नियमांचा वापर करावा लागला असता, पण हे नियम भारतासाठी हानिकारक ठरणारे होते. त्यामुळे लाखो भारतीय प्रेक्षकांना निराशादर्शक उसासे सोडावे लागले असते.
पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ धुऊन काढला नसता, तर काय झाले असते? त्या दिवशी २० षटकांचा खेळ गृहीत धरला असता, तर न्यूझीलंडने तेवढ्या षटकांत जितक्या धावा काढल्या होत्या, त्याहून दुप्पट धावा भारतीय संघाला काढाव्या लागल्या असत्या. जर हा खेळ ४६ षटकांचा झाला असता आणि त्यात २० षटके खेळणे शक्य झाले असते, तर हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ७० धावा काढणे पुरेसे ठरले असते. डकवर्थ लुईसच्या प्रत्येक नियमांमागे काही ना काही तर्क आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जर सुरुवातीलाच हा सामना २० षटकांचा घोषित झाला असता, तर न्यूझीलंडने आपली धावांची गती वाढविली असती. प्रत्यक्षात काय घडले असते, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याने जटिल अ‍ॅल्गोरिथमचा वापर करून अंदाज करण्यात आला. तेवढ्याच षटकांतील धावांचे टार्गेट बदलू शकते (१४८ विरुद्ध ७० किंवा तत्सम). आपल्याला किती षटके खेळायची आहेत हे समजले, तर त्यानुसार धावांचा पाठलाग करता येतो.


क्रिकेट हा खेळच अनेक जर-तरचा आहे. सामन्याची दिशा कशी राहील हे निश्चित करण्याचे काम खेळपट्टी करीत असते. खेळपट्टीचे स्वरूप बदलते असते. म्हणजे खेळ सुरू असतानाच मध्येच खेळपट्टीचे रूप पालटू शकते. ती कोरडी होते, खराब होते, दमट होते आणि या प्रत्येक स्थितीने सामन्याचे रूप पालटत असते. हवामानाचा परिणाम जसा सामन्यावर होत असतो, तसेच वाऱ्याची दिशासुद्धा सामन्यावर परिणाम करीत असते. चेंडू किती जुना आहे, यावर त्याचे उसळणे अवलंबून असते. टॉस हासुद्धा सामन्यावर प्रभाव गाजवत असतो. तेव्हा दोन्ही चमू समान परिस्थितीत खेळत असतात, हे म्हणणे तितकेसे खरे नसते!
या खेळात अनेक जर-तरचा सामना करावा लागत असल्याने, डकवर्थ लुईसच्या नियमांना त्याचा फटका बसणे स्वाभाविक आहे. या सामन्यात या जर-तरचे प्रमाण दोन आकड्यांपुरते मर्यादित होते- एक किती षटके टाकणे शिल्लक राहिले आहे आणि दोन किती विकेट हातात आहेत. त्याच आधारावर दोन्ही चमूंसाठी नवीन टार्गेट ठरविले जाणार होते. त्याहून एखादा चांगला मार्ग असू शकतो आणि उद्या कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक मार्ग शोधले जाऊ शकतात़, पण त्यामुळे एकूण व्यवस्था अधिक भ्रममूलक होण्याची शक्यता आहे. कारण ज्या गोष्टीसाठी मार्ग काढण्याचे काम करायचे आहे, तीच मुळात जटिल आहे!
सर्व परिस्थिती ही निसर्गावर अवलंबून असते आणि ती एकसारखी असू शकत नाही. क्रिकेट हा खेळ मुळातच गुंतागुंतीचा असल्याने, ही बाब सहज समजण्यासारखी आहे, पण ही गोष्ट सगळ्या खेळांनाच नव्हे, तर जीवनालासुद्धा लागू पडते. एखादे वेळी एकाच सामन्यात सूर्य कधी ढगामागून बाहेर येत सर्वत्र प्रकाश पसरवतो, त्यावेळी देवदूत स्वर्गीय संगीत गात असल्याचा अनुभव येतो. टेनिसचा चेंडू रॅकेटवर वेगळ्या कोनातून येत धडकतो आणि तो पास करण्याच्या कौशल्याने खेळाचा शेवट वेगळाच झाल्याचे पाहायला मिळते. कधी-कधी खेळाडू उच्च दर्जाचा खेळ खेळतात, तर कधी-कधी खेळताना एकदमच अडखळतात. त्यांचं शरीर आखडतं, बुद्धी काम करेनाशी होते आणि मन बथ्थड होऊन जातं.
क्रिकेटमध्ये आपण जर टॉस आणि खेळाडूंना होणाºया जखमांचा स्वीकार करीत असू, तर मग डकवर्थ लुईस नियमही का स्वीकारू नयेत? प्रत्येक चमूला जर नवीन बंधने स्वीकारण्याच्या समान संधी मिळत असतील, तर मग आपल्याला तक्रार करायला जागाच उरत नाही.

खेळांमधून आपल्यातील सर्वोत्तमाचा शोध घेतला जातो, असे मानले जाते. तेथे प्रत्येक व्यक्ती ही सर्वांसमोर स्वत:ला अधिक मोकळं करण्याचा प्रयत्न करीत असते, पण जर निसर्गाचे सामर्थ्य दर्शविणारे, काळाची क्षमता दाखविणारे आणि मानवी आकांक्षांच्या आणि क्षमतांच्या मर्यादा दाखविणारे ते व्यासपीठ आहे असे समजले तर? कोणताही खेळ आपल्याला गुंतवून ठेवतो, कारण त्यात आपण अपेक्षित असतो, तसे घडतेच असे नसते, तसेच जे बलवान असतात, तेच नेहमी विजयी होतात, असेही घडत नाही. खेळाडू आपल्याला चकित करीत असतात, पण कधी-कधी तेही स्वत:च चकित होत असतात!
(ज्येष्ठ विश्लेषक)

Web Title: Duckworth Lewis rules and cricket game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.