धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:37 AM2024-01-17T09:37:20+5:302024-01-17T09:37:36+5:30

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते.

Dreams lost in the fog... Passengers spent a full day at the airport in a smoky environment | धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

एसटी किंवा रेल्वेला प्रमाणापेक्षा उशीर झाला की प्रवासी जवळच्या सामानाच्या पिशव्या डोक्याखाली घेऊन फलाटावर अंग टाकतात, सोबत आणलेली शिदाेरी सोडून तिथेच चार घास पोटात ढकलतात. गाड्यांना उशीर करणाऱ्या व्यवस्थेला शिव्या घालत तासन् तास घालवले जातात. सगळे वातावरण कमालीचे आळसावलेले असते. एसटी किंवा रेल्वे ही गोरगरिबांची, सर्वसामान्यांची प्रवासाची साधने. तिथे हे असे चित्र दिसण्यात नवे काही नाही. परंतु, समाजातील उच्चभ्रूंच्या प्रतिष्ठेचे चिन्ह मानल्या जाणाऱ्या विमानतळांवर हेच चित्र दिसेल असे वाटले नव्हते. ते सोमवारी मुंबईच्या विमानतळावर दिसले. आजूबाजूला उभ्या विमानांच्या पृष्ठभूमीवर प्रवाशांनी जेवणासाठी जमिनीवरच आलकट-पालकट मारली. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते. कारण, धूर व धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिवसभर विमाने उडालीच नाहीत. पहाटे किंवा सकाळी विमानतळावर पोहोचलेल्यांचा पूर्ण दिवस धुरकट वातावरणात गेला.

विमान कंपन्यांचे कर्मचारी हतबल होते. विमानतळाच्या इमारतींमध्ये उभे राहायलाही जागा उरली नव्हती. गेले दोन-तीन दिवस संपूर्ण देशभर हवाई प्रवास विस्कळीत झाला आहे. आधीच या ना त्या कारणाने तिकिटाचे दर आकाशाला भिडलेले असतात. एखाददुसरा अपवाद वगळता बहुतेक सगळ्या विमान कंपन्यांनी वेळापत्रकापासून फारकत घेतल्याचा अनुभव येतो. ठरलेल्या वेळेस विमानाने आकाशात झेप घेतली तर पेढे वाटावेत, अशी स्थिती असते. या सगळ्यांचा प्रवाशांना जो मानसिक, शारीरिक त्रास होतो त्याचे वर्णन शब्दांत शक्य नाही. उत्तर भारतात हवेचे प्रदूषण, धुक्याचे संकट अधिक गडद असते. नंतर धुके हळूहळू विरळ होत जाते. सकाळच्या उड्डाणांवर याचा नेहमीच परिणाम होतो. परंतु, दक्षिण भारतात तुलनेने स्थिती बरी असते. तरीदेखील देशाची संपूर्ण प्रवासी विमानसेवा प्रभावित का होते, तर अमूक एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत एकच विमान जाते किंवा येते असे नाही.

मेट्रो विमानतळे आणि काही छोटी शहरे यांना जोडणाऱ्या विमानांच्या अशा एका विशिष्ट वेळापत्रकानुसार विमान कंपन्या ही प्रवासीसेवा चालवितात. त्यामुळे एका विमानतळावर विमानांची उड्डाणे होऊ शकली नाहीत की ते संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. म्हणूनच मुंबई विमानतळावर पंचवीस विमाने रद्द करावी लागली आणि आणखी पन्नास विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला की देशभरातील रद्द व उशीर झालेल्या विमानांची संख्या चौपट किंवा पाचपट होते. जिथे दृश्यमानता खूप खराब नाही अशाही विमानतळावरील सेवा विस्कळीत होते. अर्थात, केवळ प्रतिकूल हवामान किंवा धुके यामुळेच हा सावळागोंधळ सुरू आहे असे मानण्याचे कारण नाही. काही प्रवाशांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या अनुभवानुसार वैमानिक उपलब्ध न होणे किंवा अन्य तांत्रिक कारणेही विमान कंपन्यांनी खुलेपणाने प्रवाशांना सांगितली नाहीत. त्याऐवजी केवळ प्रतिकूल हवामानाचे कारण पुढे करीत प्रवाशांची दिशाभूल करण्यात आली. हे प्रवासी दिल्लीवरून सकाळी बंगळुरूला निघाले होते आणि त्यांचा लहान मुलगा घरी त्यांची वाट पाहात होता. त्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत रात्री दहा-साडेदहाच्या आत घरी पोहोचणे गरजेचे होते.

अशावेळी दिवसभरात चार-पाच वेळा धुक्याचे कारण देत दोन किंवा तीन तासांच्या उशिराची नुसतीच घोषणा होत राहिली आणि प्रत्यक्षात पायलटच वेळेवर पोहोचला नव्हता. अशावेळी प्रवाशांची सहनशीलता संपणे अजिबात अनैसर्गिक नाही. गोव्याला निघालेल्या अशाच एका प्रवाशाचा अन्य एका विमानात संयम सुटला व त्याने पायलटवर हात उचलला. हवाई प्रवासाची सगळी व्यवस्था, सहप्रवासी, माध्यमे या सगळ्यांनी त्या प्रवाशाला दोषी ठरविले. तथापि, कित्येक तास विमानात बसून राहावे लागलेल्या प्रवाशांसमोर येऊन वैमानिकांनी कोणती भाषा वापरली, याचाही थोडा विचार करायला हवा. हे सर्व चित्र पाहता देशातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय विमानसेवेने जोडण्याची, रेल्वेच्या वातानुकूलित प्रथमश्रेणी तिकिटापेक्षा विमानाचे तिकीट कमी ठेवण्याची आणि परिणामी, हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई प्रवास शक्य करण्याची जी स्वप्ने काही वर्षांपूर्वी दाखवली गेली त्यांचे काय, हा प्रश्न येतोच. घड्याळाच्या काट्यावर कसरत करणाऱ्या देशवासीयांना एक विश्वासार्ह, काटेकोर वेळापत्रकावर चालणारी, किफायतशीर प्रवासी विमानसेवा देण्यात व्यवस्थेला आलेले अपयश यात अधिक ठळकपणे दिसते. दाट धुके हे केवळ निमित्त आहे.

Web Title: Dreams lost in the fog... Passengers spent a full day at the airport in a smoky environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान