बाता नका मारू...

By सचिन जवळकोटे | Published: February 22, 2018 05:19 AM2018-02-22T05:19:28+5:302018-02-22T08:56:03+5:30

‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती.

Do not tell | बाता नका मारू...

बाता नका मारू...

Next

‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती. तशीच धक्कादायकही होती. कारण पुण्यातला साधा ‘लकडी पूल’ ओलांडायला कधी-कधी जिथं २५ मिनिटं लागतात, तिथं पुणे-मुंबईचा ‘हायपरलूप प्रवास’ त्याच्या भाषेत जणू भयानकऽऽ स्पीडचा होता.
त्यानं थेट देवेंद्रपंतांना मोबाईल कॉल केला. त्यांच्या डायलर टोनवर ‘मॅग्नेटिक का फिग्नेटिक’चं कसलं तरी नवं जिंगल वाजत होतं. सुरुवातीला याचा अर्थ काही पिंटकरावाला समजलाच नाही. बहुधा ‘अच्छे दिन’नंतरचा नवा ‘मॅग्नेटिक’ फंडा असावा, असा भाबडा समज त्यानं करून घेतला.
तिकडून कॉल काही उचलला गेलाच नाही. फक्त एका लेडीजच्या आवाजात ‘फोन नका करू. थेट भेटा. बोलाचाली करा,’ असलंच काहीबाही ‘जपानी हेल’मध्ये सांगितलं गेलं.
पिंटकराव गोंधळला. त्यानं ‘एम्पीएस्सी पास’ दोस्ताला विचारलं, तेव्हा उत्तरही भलतंच मिळालं. ‘बुलेट ट्रेन’च्या नादापायी पंतांसह अनेक नेत्यांची ऊठबस अलीकडं सातत्यानं जपानी लोकांसोबत वाढल्यानं सर्वांनाच जपानी भाषेची लागण झाल्याची ही ‘ब्रेकिंग न्यूज’ होती.
पिंटकरावाला कौतुक वाटलं. त्यानं दिल्लीतल्या नितीनरावांना कॉल केला. मात्र, तिकडूनही एक मेसेज जपानी स्टाईलनं कानावर आदळला, ‘बिल नका मागू. रोड करून टाका,’ हे ऐकताच ‘आपण बांधकाम खात्याचे कर्जबाजारी ठेकेदार-बिकेदार आहोत की काय ?’ असा प्रश्न क्षणभर पिंटकरावाला पडला. त्यानं मग विनोदभाऊंशी संवाद साधला. मात्र तेही एकाच कल्पनेनं झपाटून गेलेले, ‘भिलारला या कीऽऽ या कीऽऽ स्ट्रॉबेरी खा की. मराठी बोला की. संमेलन घेऊ की,’ तेव्हा पिंटकरावानंही चिडून त्यांच्याच जपानी हेलमध्ये ‘बाता नका मारू, फोन बंद करून टाका,’ असं सुनावलं.
‘भिलारच्या पलीकडं खूप मोठा महाराष्ट्र आहे, हे विनोदभाऊंना कधी कळणार?’ असा केविलवाणा विचार करत पिंटकरावानं ‘मातोश्री’वर संपर्क साधला. कॉल लागला. मात्र उद्धो तिकडं संजयरावांना काहीतरी सांगत होते, ‘ऊतू नका. मातू नका. मज हवा सत्तेतला वाटा... आज हेच छापून टाका,’
दचकलेल्या पिंटकरावाच्या हातातून मोबाईल खाली पडला. ‘जपानी लॅँग्वेजची लागण लईच व्हायरल झालीया लगाऽऽ’ म्हणत त्यानं घाबरत-घाबरत मग ‘कृष्णकुंज’वर कॉल केला. राजकडूनही एकाच वाक्यात विषय संपविला गेला, ‘तोडा.. फोडा.. झोडा... करून टाका राडा!’
घाम पुसत पिंटकरावानं अजितदादांना फोनवरूनच ही सारी हकिकत सांगितली. आपल्या लाडक्या धनंजयदादांचं भाषण मन लावून ऐकण्यात मग्न असलेले दादा काहीच बोलले नाहीत. फक्त ‘डॅम ईट..’ एवढंच शांतपणे म्हणत त्यांनी फोन कट केला.
पिंटकरावानं दोस्ताला पुन्हा विचारलं, ‘डॅम ईट म्हंजी काय रं भौऽऽ?’ तेव्हा परभाषेचं पुस्तक वाचण्यात मग्न असणारा दोस्तही ‘जपानी हेल’मध्येच नकळतपणे बोलून गेला, ‘कोरडा नका ठेवू. ओला करून टाका!’
 

Web Title: Do not tell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.