आली दिवाळी आनंदाची !

By दा. कृ. सोमण | Published: October 18, 2017 06:00 AM2017-10-18T06:00:00+5:302017-10-18T06:00:00+5:30

शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ' अभ्यंगस्नान ' असे म्हणतात

Diwali festival of happiness | आली दिवाळी आनंदाची !

आली दिवाळी आनंदाची !

googlenewsNext
ठळक मुद्देभगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या ताब्यातील सोळा सहस्र मुलींना मुक्त केलेत्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केलेनरकचतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी नरकासुर म्हणून कारेट्याचे कडू फळ पायाखाली दाबून चिरडण्याची प्रथा आहे

       आज बुधवार, दि. १८ ऑक्टोबर , आज आश्विन कृष्ण चतुर्दशी , नरकचतुर्दशी !   आज चंद्रोदयापासून
( पहाटे ५ - ०५ )सूर्योदयापर्यंत ( ६-३५ ) अभ्यंगस्नान करावयाचे आहे. शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ' अभ्यंगस्नान ' असे म्हणतात. दिवाळीचे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात.त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. दिवाळीच्या चार दिवसात रोज अभ्यंगस्नान करावयाचे आहे. 
                                               कथा नरकासुराची.   
       नरक चतुर्दशी संबंधी पुराणात एक कथा सांगितलेली आहे. नरकासुराला भूदेवीकडून ' वैष्णवास्त्र ' प्राप्त झाले होते. त्यामुळे तो बलाढ्य आणि उन्मत्त झाला होता. त्याला गर्व झाल्याने त्याने सर्व देवाना त्रास देण्यास सुरुवात केली. इंद्राचा ऐरावतही त्याने पळविला. अनेक राजांच्या आणि नागरिकांच्या एकूण सोळा हजार मुली त्याने पळवून आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. नरकासुराच्या अत्याचारामुळे सर्वच लोक गांजले होते. त्यामुळे इंद्राने भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला ठार मारले.ही गोष्ट आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी घडली.मरतेसयी नरकासुराने भगवान श्रीकृष्णाकडे  वर मागितला --
        " आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये. तसेच माझा हा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा ."
     यांवर भगवान श्रीकृष्णांनी " तथास्तु " म्हटले. त्यामुळे दरवर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची पद्धत पडली. तसेच त्यादिवशी पहाटे व रात्री दिवे लावून दीपोत्सव करण्याची प्रथा पडली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला ठार करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. म्हणून या दिवशी लोक आनंदोत्सव साजरा करू लागले.
       भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या ताब्यातील सोळा सहस्र मुलींना मुक्त केले. त्या मुलींच्या आई वडिलांना निरोप पाठवून मुलींना घरी नेण्यास सांगितले. परंतु मुलींचे आई वडील मुलींना नेण्यासाठी आलेच नाहीत. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या  सोळा सहस्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदर निर्वाहाचीही सोय केली. 
         नरकचतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी नरकासुर म्हणून कारेट्याचे कडू फळ पायाखाली दाबून चिरडण्याची प्रथा आहे. आजही समाजात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगीरी, अस्वच्छता, अनीती इत्यादी नरकासुर थैमान घालीत आहेत. त्याना नाहिसे करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार नाही. आपल्या प्रत्येकालाच श्रीकृष्ण बनून त्यांचा नाश करून समाजाला सुखी करावयाचे आहे.
                                           रांगोळीचे महत्त्व !
        दीपावलीच्या दिवसांमध्ये घरासमोर रांगोळी काढण्याची प्रथा आहे. रांगोळी रंगवली, रंगमाळी, रंगमाळा, रंगावली , रंगोली या नावांने ओळखली जाते, कर्नाटकात रांगोळीला ' रंगोली ' म्हणून संबोधतात. आंध्रप्रदेशात ' मुग्गुलू ' किंवा ' मुग्गु ' या नावाने ओळखतात. तामिळनाडूमध्ये रांगोळीला ' कोलम ' या नावाने रांगोळीला ओळखले जाते. केरळमध्ये रांगोळीला 
' पुविडल '  असे म्हणतात. गुजरातमध्ये रांगोळीला ' साथिमा ' म्हणतात. सौराष्ट्रात रांगोळीला ' सथ्या ' म्हणतात. राजस्थानमध्ये रांगोळीला ' मांडणा ' म्हणतात. बंगालमध्ये रांगोळी ' अल्पना ' या नावाने ओळखली जाते. बिहारमध्ये
' अलिपना ' , उत्तर प्रदेशात ' सोनराखना ' आणि ओरिसामध्ये रांगोळी ' झुंटी' किंवा ' ओसा ' या नावाने ओळखली जाते.
        विष्णुपुराणात लक्ष्मी-विष्णूच्या विवाहप्रसंगी शुभ चिन्हांच्या तसेच फुलांच्या रांगोळ्या काढल्याचा उल्लेख आहे.
तुलसीरामायणातील बालकांडात " रंगवल्ली बहुविध काढल्या कुंजरमणिमय सहज शोधल्या " असे राम-सीता विवाहप्रसंगीच्या वर्णनात सांगितलेले आहे. मार्कंडेय पुराणात सडासंमार्जनानंतर रांगोळीने स्वस्तिकाकृती काढण्याचे महत्त्व वर्णन केलेले आहे. सातव्या शतकातील वरांगचरित यामध्ये पंचरंगी चूर्ण, धान्य आणि फुले यांनी रांगोळी काढण्याचे सांगितलेले आहे. शिशुपाल वधाच्या वर्णनात रांगोळीला ' रंगावळी '  असे म्हटले आहे. वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांमध्ये रांगोळी काढण्याच्या कलेचा अंतर्भाव आहे. इसवीसनाच्या तिसर्या शतकातील साहित्यात धान्याचा-फुलांची रांगोळी काढली असल्याचा उल्लेख आहे. पूर्वी सरस्वती, रामदेव आणि शिवमंदिरातही रांगोळीचा उल्लेख सापडतो. 
      रांगोळी ही सर्वत्र शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. जिथे रांगोळी आहे तिथे देवदेवतांचा निवास असतो असा समज आहे. रांगोळीमध्ये बिंदू, सरळ रेषा,अर्धवर्तुळ , वर्तुळ, गोपद्म , सर्प रेषा , कोयरी , स्वस्तिक,  ॐ , केंद्रवर्धिनी, तुरा ,श्री, सरस्वती, कलश ,शंख, चक्र ,गदा , कमळ , ध्वज, धनुष्य ,बाण ,त्रिशूळ , त्रिदल , अष्टदल, शृंखला, श्रीफळ, विष्णुपाद, लक्ष्मीची पावले, दीप इत्यादी चित्रे काढून रांगोळी अधिक सुंदर आणि वैभवशाली केली जाते.
आज नरक चतुर्दशीच्या दिवशी घरात किंवा घरासमोर रांगोळी काढून आपण प्रकाशाचा हा दीपावली उत्सव आनंदाने साजरा करूया. आपण आनंदित होऊया आणि इतरांच्या जीवनात आनंद फुलवूया !
(लेखक पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत)

 

Web Title: Diwali festival of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.