अंधारयात्री प्रकाश करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:21 AM2018-02-13T04:21:35+5:302018-02-13T04:23:21+5:30

प्रथम काँग्रेस-समाजवादी, पुढे काँग्रेस व नंतर समाजवादी असा प्रवास करीत डॉ. राममनोहर लोहिया यांचे राजकारण अखेरीस टोकाच्या काँग्रेसविरोधापर्यंत पोहोचले. एवढे की त्यासाठी ते त्यांचा समाजवाद विसरले, धर्मनिरपेक्षता विसरले आणि काँग्रेसच्या पहाडाला भेग पाडून दाखविण्याच्या जिद्दीने थेट जनसंघाच्या वर्तुळात गेले.

 Dark Light Lightning | अंधारयात्री प्रकाश करात

अंधारयात्री प्रकाश करात

Next

- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)

प्रथम काँग्रेस-समाजवादी, पुढे काँग्रेस व नंतर समाजवादी असा प्रवास करीत डॉ. राममनोहर लोहिया यांचे राजकारण अखेरीस टोकाच्या काँग्रेसविरोधापर्यंत पोहोचले. एवढे की त्यासाठी ते त्यांचा समाजवाद विसरले, धर्मनिरपेक्षता विसरले आणि काँग्रेसच्या पहाडाला भेग पाडून दाखविण्याच्या जिद्दीने थेट जनसंघाच्या वर्तुळात गेले. या राजकारणाची अतिशय दीनवाणी व लाचार परिणती पुढे जॉर्ज फर्नांडिसांच्या भाजप-भक्तीमध्ये देशाने पाहिली. द्वेष ही ममत्वाएवढीच विवेकावरही मात करणारी वृत्ती आहे हे त्यातून देशाला दिसले... डाव्या कम्युनिस्ट पक्षातील प्रकाश करातांचे आताचे राजकारण त्याच वळणावर जाणारे व काँग्रेसद्वेषापायी भाजपची प्रत्यक्षाप्रत्यक्ष साथ करणारे आहे. या काँग्रेसद्वेषापायी त्यांनी आपला पक्ष गर्तेत नेला आणि पुढेही तो तसाच जात राहील याची व्यवस्थाही करून टाकली. सध्या त्यांच्या निशाण्यावर सीताराम येचुरी हे त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस व पक्षातील सर्वाधिक लोकाभिमुख नेते आहेत.
देशाच्या पहिल्या व दुसºया लोकसभेत कॉ. ए.के.गोपालन हे विरोधी पक्षाच्या नेतेपदावर होते. ४८९ सदस्यांच्या सभागृहात त्यांच्या पक्षाचे १६ तर दुसºया लोकसभेत २७ सदस्य होते. ५७ च्या निवडणुकीत त्याला केरळात बहुमत मिळाले. कॉ. एस.ए. डांगे, बी.टी. रणदिवे, ई.एम.एस. नम्बुद्रीपाद, झेड.ए. अहमद व भूपेश गुप्त यासारखे त्याचे नेते तेव्हा लोकप्रियतेच्या व विद्वत्तेच्या बळावर जनमानसात आपले स्थान राखणारे होते. नेहरूंसारखा राष्ट्रीय नेताही त्याच पक्षाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवीत होता. १९२५ मध्ये अधिकृतपणे स्थापन झालेल्या या पक्षाचे कार्यकर्ते गेल्या शतकाच्या आरंभापासूनच कामगार क्षेत्रात कार्यरत होते. १९१७ मध्ये काँग्रेसने स्थापन केलेली आयटक ही संघटना १९३० मध्ये त्यांनी ताब्यात आणली. १९३५ मध्ये त्याच्या अनेक नेत्यांनी समाजवादी पक्षाच्या आडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा व तो पक्षच काबीज करण्याचा प्रयत्न केला. सरदार पटेलांच्या सावधवृत्तीने तो फसला. १९४६ मध्ये पटेल, नेहरू व पंत यांच्या समितीने तशा १८ घुसखोरांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली... तरीदेखील कामगारांच्या सशस्त्र क्रांतीला साºया प्रश्नांवरील एकमेव उपाय मानणाºया या पक्षाने स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वरूप धारण केले व लोकसभेत तो पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष झाला.
आताच्या त्याच्या राजकारणात प्रकाश करात यांच्या ताब्यातील कर्मठांचा मोठा व येचुरींना मानणाºया उदारमतवाद्यांचा छोटा असे दोन तट आहेत. करातांचे राजकारण पक्षाच्या वाटचालीत कालानुरूप बदल न करणारे व त्याच्या धोरणात कानामात्रेचाही फरक न करणारे आहे. कधी तरी हा ‘वाट चुकलेला’ देश माझ्याच मार्गावर येईल याची त्यांना वाट आहे. सोमनाथ चटर्जींच्या मते या करातांनीच १९९६ मध्ये ज्योती बसूंना देशाचे पंतप्रधानपद मिळू दिले नाही. २००८ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी अमेरिकेशी केलेल्या अणुकराराला विरोध करीत त्यांनी त्या सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैतागलेल्या डॉ. सिंग यांनी ‘करात हे मला घरगड्यासारखे वागवीत आहेत’ असे म्हणत त्यांना सरळ विरोधात जाण्याचे आव्हान दिले. त्यावेळी करातांनी भाजपशी हातमिळवणी करून सिंग सरकारच्या विरुद्ध लोकसभेत मतदान केले. त्यात त्यांचे तोंड फुटले व त्यांचा पक्षही लोकमानसातून उतरला. पुढे झालेल्या २००९ च्या निवडणुकीत त्याची लोकसभेतील सदस्य संख्या ४४ वरून १६ वर आली. ती घसरण आता ९ वर आली आहे. मात्र त्याही काळात करातांनी आपल्या पक्षाचे केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांना प्रदेशाध्यक्ष पिनारायी विजयन यांना हाताशी धरून अपमानित करण्याचेच राजकारण त्यांनी केले. प्रत्येकच लोकाभिमुख नेत्याचा पाणउतारा करणे आणि आपले सोवळे राजकारण पक्षावर लादणे हा त्यांचा कार्यक्रम सुरूच राहिला. अच्युतानंदन यांच्या जागी विजयन निवडले जातील याची पूर्वतयारीही पक्षाची तिकिटे वाटतानाच त्यांनी केली. करातांच्या या राजकारणाचे एकमेव सूत्र टोकाचा काँग्रेसद्वेष हे आहे. त्यासाठी ते भाजपसोबत जायला व आपली धर्मनिरपेक्षता गुंडाळून ठेवायलाही तयार आहेत.
आताचा त्यांचा येचुरीविरोधही त्यांच्या याच काँग्रेसद्वेषातून आला आहे. धर्मांधता रोखायची असेल तर धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला सहकार्य करण्याचे राजकारण देशात आखले जात आहे. त्याला सोमनाथ चटर्जींचा आशीर्वाद व येचुरींची साथ आहे. करातांना यात त्यांच्या काँग्रेसद्वेष्ट्या राजकारणाचा शेवट दिसतो. तेवढ्यासाठीच त्यांनी येचुरींना पक्षाची राज्यसभेची उमेदवारी मिळू न देण्याचा खटाटोप केला आणि आता त्यांना पक्षाच्या सरचिटणीस पदावरून घालविण्याचे राजकारणही त्यांनी चालविले आहे.
कालपरत्वे समाज बदलतो तसे त्याचे राजकारणही बदलत असते. त्याचवेळी त्यात भाग घेणाºया पक्षांना व पुढाºयांनाही त्यांच्या भूमिका बदलाव्या लागतात. काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष राजकारण जाऊन त्याजागी भाजपचे धर्मग्रस्त राजकारण सत्तारूढ झाल्यानंतर देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येऊन त्याला विरोध करणे आवश्यक झाले आहे. अशास्थितीत एखादा प्रकाश करात ‘मी माझे काँग्रेसद्वेषाचे जुनेच राजकारण करीत राहीन आणि जे लोक मला साथ देणार नाहीत त्यांना मी मोजणार नाही’ असे म्हणत असेल तर तो प्रकाशाचे राजकारण करीत नसून अंधाराचे राजकारण करीत आहे असेच म्हणावे लागेल. करातांचा पक्षही संघासारखाच एकचालकानुवरती आणि विचारकर्त्यांऐवजी वारकºयांचाच असेल तर ते सारेच अंधारमार्गी बनले आहेत असेही नोंदवावे लागेल. अशी माणसे आपल्या मागे असलेल्या ज्ञानपरंपरेएवढीच देशहिताचीही माती करतात याचेच अशावेळी दु:ख करायचे असते. कम्युनिस्ट पक्षाचा भारतातील इतिहास, त्याला लाभलेली जागतिक पार्श्वभूमी आणि त्यामागे उभे असलेले मार्क्स, एंजल्स व लेनीनचे तत्त्वज्ञान या साºयांसोबतच त्याने देशात कधी काळी उभ्या केलेल्या कामगार चळवळींचाही याच काळात लोप होताना आज दिसत आहे. जगाने या विचारसरणीकडे फिरविलेली पाठ पक्षाच्या अशा ºहासाला जशी कारणीभूत आहे तशाच या पक्षातील सर्वोच्च नेत्यांच्या अहंताही त्याला जबाबदार आहेत. त्याचमुळे स्वत:ला राष्ट्रीय म्हणविणारा असला तरी करातांचा पक्ष देशात अजून प्रादेशिकच राहिला आहे. आपल्या जुन्या धोरणात ज्यांना कालानुरूप बदल करता येत नाही त्यांचे राजकारण नुसते कर्मठच नाही तर आत्मघातकीही असते. डाव्या कम्युनिस्ट पक्षाची आजची वाटचाल अशी आहे आणि त्याचे नेतृत्व करातांनी घट्टपणे हाती ठेवले आहे.

Web Title:  Dark Light Lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.