वाघाच्या डरकाळ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:18 PM2019-04-02T13:18:57+5:302019-04-02T13:23:46+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी जुळवून घेत युती कायम राखण्यात यश मिळविले

Dagger! | वाघाच्या डरकाळ्या !

वाघाच्या डरकाळ्या !

Next

मिलिंद कुलकर्णी 

लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी जुळवून घेत युती कायम राखण्यात यश मिळविले असले तरी मुंबईतील हा निर्णय गावपातळीवर अजून रुचलेला दिसत नाही. एकीकडे उध्दव ठाकरे हे भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमीत शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मेळाव्यासाठी गुजरातेत जात असताना इकडे मुक्ताईनगरातील शिवसैनिक हे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठी ठिय्या आंदोलन करताना दिसले. ऐन दिवाळीत शिवसैनिकांना अटक करुन कारागृहात टाकणाºया भाजपाचा प्रचार कसा करायचा, अशी भूमिका पाचोºयाच्या शिवसैनिकांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत मांडली. तिकडे धुळ्यात नरेंद्र परदेशी यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिकांनी भाजपचा प्रचार करण्यास स्पष्टपणे इन्कार केला. साक्रीत भाजप उमेदवार डॉ.हीना गावीत व डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला तालुकाप्रमुख विशाल देसलेंसह शिवसैनिकांनी पाठ फिरविली. खान्देशातील चारही मतदारसंघात भाजपाशी जुळवून घेण्यास शिवसैनिक राजी नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. 
इतर राजकीय पक्ष आणि शिवसेना यात फरक आहे. शिवसेना ही संघटना आहे. लोकशाही पध्दतीत राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली असली तरी तिचा जन्म, कार्यपध्दती आणि मुद्यांवर आधारीत राजकारण पाहिले तर संघटना म्हणून तिची बांधणी झालेली दिसते. जातीपातीच्या पलिकडे जाऊन शिवसैनिकांना पदे देण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुढे चालवत आहे. परंतु पावणे पाच वर्षे भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र व राज्य सरकारवर विरोधी पक्षांपेक्षा अधिक कडवट भाषेत टीका करणाºया शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत त्याच भाजपशी जुळवून घेणे हे शिवसैनिकांना रुचलेले नाही. कारण, भाजपाच्या शतप्रतिशतसारख्या विस्तारवादी योजनांमुळे ग्रामीण भागात शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याची खंत सैनिकांना जाणवत आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि नंदुरबारात भाजपाचे पालकमंत्री आहेत, तर धुळ्यात शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. जळगावात गुलाबराव पाटील यांच्या रुपाने राज्यमंत्रीपद मिळालेले आहे. याउलट भाजपकडे केंद्रीय राज्यमंत्री, दोन कॅबीनेट मंत्रिपदे असल्याने भाजपा वर्चस्ववादी भूमिकेत राहिला आहे. राज्यात पूर्वी शिवसेना ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत राहिला तर खान्देशात मात्र त्याला नेहमी ‘लहान भावा’ची भूमिका वठवावी लागली. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांना कायम दुय्यम वागणूक मिळत असल्याची चीड शिवसैनिकांमध्ये आहे. 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी जाहीर केल्याने शिवसेना व सैनिकांचे खडसे हे क्रमांक एकचे शत्रू ठरले. उध्दव ठाकरे यांनी मुक्ताईनगरात येऊन घेतलेली सभा हे त्याचे निदर्शक होते. तो राग सैनिकांमध्ये अजून कायम असल्याचे परवाच्या आंदोलनावरुन दिसून आले. दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे स्थानिक शिवसैनिकांच्यादृष्टीने क्रमांक दोनचे शत्रू बनले आहेत. पाचोºयातील शिवसैनिकांची दिवाळीतील जेलवारी, जळगाव आणि धुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संपविण्याचा झालेला प्रयत्न, जळगाव जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवूनही निवडणुकीनंतर सत्तेत येण्याच्या २५ वर्षांचा पॅटर्न बदलवून सेनेऐवजी काँग्रेसच्या सदस्याला जवळ करणे या गोष्टी शिवसैनिकांच्या जखमांवर मीठ चोळणाºया ठरल्या आहेत. ‘संकटमोचक’ म्हणून गिरीश महाजन यांचा उध्दव ठाकरे एकीकडे कौतुक करीत असताना खान्देशातील शिवसैनिक मात्र महाजन यांना उघडपणे विरोधी करीत आहे. 
संपर्कप्रमुख संजय सावंत व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात झालेल्या मेळाव्यात भाजपला १० तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्हा परिषद, महापालिका व पालिकांमध्ये शिवसेनेला वाटा दिला तरच लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला आहे. ही कोंडी आता भाजप-शिवसेनेचे श्रेष्ठी कसे फोडतात, यावर भाजपा उमेदवाराच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. 

Web Title: Dagger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव