अखिलाडू वृत्ती! ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:12 AM2023-11-08T09:12:29+5:302023-11-08T09:12:53+5:30

क्रिकेट सभ्यपणेच खेळले जाईल, असा फतवाच त्यांनी काढला. म्हणजे काय, तर खेळताना उगीच आरडओरड करायची नाही,

'Cricket is no more a gentleman's game!' | अखिलाडू वृत्ती! ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

अखिलाडू वृत्ती! ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

जगात नाना क्रीडाप्रकार आहेत; पण ‘जेंटलमन्स गेम’ (सभ्य गृहस्थांचा खेळ) हे बिरूद केवळ क्रिकेटच मिरवीत आले आहे. सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सोमवारी झालेल्या श्रीलंका-बांगलादेश सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही घडलेल्या प्रकारांमुळे, आणखी किती दिवस क्रिकेटसाठी ते बिरूद वापरता येईल, असाच प्रश्न पडावा! इतिहासात क्रिकेटचा पहिला संदर्भ १३ व्या शतकातील आढळतो; पण या क्रीडा प्रकाराला खरी लोकप्रियता लाभली ती १७ व्या शतकात इंग्लिश अमीर-उमरावांनी क्रिकेट खेळायला प्रारंभ केल्यावर!

क्रिकेट सभ्यपणेच खेळले जाईल, असा फतवाच त्यांनी काढला. म्हणजे काय, तर खेळताना उगीच आरडओरड करायची नाही, प्रतिस्पर्धी खेळाडू बाद असल्याचे वाटल्यास पंचांकडे एका मर्यादेतच दाद मागायची, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना हिणवायचे, खिजवायचे (स्लेजिंग) नाही, फलंदाजांचे अंग भाजून काढणारी गोलंदाजी (बॉडीलाईन बोलिंग) करायची नाही, मनाजोगते न घडल्यास आदळआपट करायची नाही, बाद असल्याची जाणीव झाल्यावर फलंदाजाने निर्णयाची प्रतीक्षा न करता तंबूची वाट धरायची, इत्यादी! अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत क्रिकेट त्याच मापदंडांनुरूप खेळले जात असे; पण पुढे इतर खेळांप्रमाणे क्रिकेटचेही व्यवसायीकरण झाले आणि हळूहळू तो लौकिक काळवंडू लागला.

पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट रटाळ होऊ लागल्याने आणि नव्या युगात वेळेची कमतरता भासू लागल्याने एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झाला. दरम्यान. कॅरी पॅकर या ऑस्ट्रेलियन उद्योगपतीने ‘वर्ल्ड सिरिज कप’ आणि ‘इंटरनॅशनल कप’ या नावाने जगभरातील प्रमुख खेळाडूंना ‘भरती करून’ क्रिकेटची जत्राच भरविणे सुरू केले. क्रिकेटमध्ये पैशाला महत्त्व आले ते तिथे! त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू केली. तेथून पुढील टी ट्वेंटी क्रिकेट, इंडियन प्रीमिअर लीग, इतर लीग, त्या माध्यमातून क्रिकेटमध्ये आलेला प्रचंड पैसा हा अलीकडील प्रवास सर्वांनाच ठाऊक आहे. या प्रवासादरम्यान देशोदेशींची क्रिकेट मंडळे आणि क्रिकेटपटू गब्बर झाले खरे; पण क्रिकेटचा आत्मा हरविला! आज क्रिकेटमध्ये एवढा पैसा दावणीला लागलेला असतो, की जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली जाते. सोमवारच्या श्रीलंका-बांगलादेश सामन्यात तेच झाले.

अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेचा फलंदाज आधीचा फलंदाज बाद झाल्याने धावपट्टीवर पोचला खरा; पण हेल्मेटचा पट्टा तुटला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने दुसरे हेल्मेट मागवले. त्यामध्ये विलंब झाला आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन याने ‘टाइम आउट’ नियमांतर्गत मॅथ्यूज विरुद्ध दाद मागितली. पंचांनीही त्याला बाद घोषित केले. या नियमान्वये एखादा फलंदाज बाद अथवा निवृत्त झाल्यास, दोन मिनिटांच्या आता पुढील फलंदाजास चेंडू खेळण्यासाठी सज्ज व्हावे लागते. तांत्रिकदृष्ट्या मॅथ्यूज बाद होताच; पण खिलाडूवृत्ती नावाची गोष्ट असते की नाही? शकीब अल हसनने सामना संपल्यावर, आपण जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, असे सांगून मॅथ्यूज विरुद्ध दाद मागितल्याचे समर्थनही केले!

अर्थात अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करणारा शकीब अल हसन काही पहिलाच नाही. यापूर्वीही अशी उदाहरणे घडली आहेत. भारतीय क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या नावाने प्रचलित झालेला ‘मंकडिंग’ हा फलंदाजाला बाद करण्याचा प्रकार, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडदरम्यानची कुप्रसिद्ध ‘बॉडीलाईन’ मालिका, चेंडू कुरतडण्याचे प्रकार, रुडी कोर्टझेन या पंचांना रिकी पॉन्टिंगने दिलेली वागणूक किंवा अनिल चौधरी या पंचांसोबत विराट कोहलीने घातलेला वाद, ‘स्लेजिंग’, ‘मंकीगेट स्कॅन्डल’ अशा अनेक प्रकारांमुळे क्रिकेटची ‘जंटलमॅन्स गेम’ ही प्रतिमा डागाळत आहे.

सोमवारी बांगलादेश संघाने अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केल्यावर, श्रीलंकन खेळाडूंनीही सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार देऊन, आपणही कमी नसल्याचेच दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर, भारत व इंग्लंडदरम्यानच्या सुवर्णमहोत्सवी कसोटी सामन्यात पंचांनी बॉब टेलरला बाद नसताना बाद दिल्यावर भारतीय कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथने टेलरला परत फलंदाजीस बोलावणे, अन्य एका कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इयान बेल तांत्रिकदृष्ट्या धावबाद असतानाही अपील मागे घेणे, अशी खिलाडू वृत्तीची उदाहरणे प्रकर्षाने आठवतात. सोमवारच्या सामन्याला मध्ययुगीन कालखंडातला एखादा इंग्लिश उमराव उपस्थित असता, तर तो खचितच उद्गारला असता, ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

Web Title: 'Cricket is no more a gentleman's game!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.