‘झाडू’न पराभव!

By Admin | Published: April 26, 2017 11:17 PM2017-04-26T23:17:35+5:302017-04-26T23:17:35+5:30

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही

'Bush' defeat! | ‘झाडू’न पराभव!

‘झाडू’न पराभव!

googlenewsNext

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही, हे वास्तव दुर्लक्षण्याजोगे नक्कीच नाही. उत्तर प्रदेशातील ‘न भूतो...’ अशा यशानंतर भाजपाने दिल्लीतील तीन महापालिकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय याचीच साक्ष देणारा आहे. दिल्लीत सरकार असताना आणि मोफत वीज-पाणी देण्याचा दावा करूनही आम आदमी पार्टीचा झालेला ‘झाडू’न पराभव मान्य करण्याऐवजी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पराभवाचे खापर पुन्हा ‘इव्हीएम’वर फोडले आहे. वास्तावाचे भान हरपले की, अशीच बहाणेबाजी केली जाते. दिल्लीतील जनतेने मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने केजरीवाल यांच्या हाती देशाची राजधानी असलेल्या ‘दिल्ली’ची सूत्रे सोपविली, मात्र भांडकुदळ स्वभावामुळे पहिल्या दिवसापासून केजरीवाल कुरकुर करत राहिले. कधी उप राज्यपालांच्या तर कधी केंद्रातील मोदी सरकारच्या नावे त्यांचे रडगाणे सुरूच आहे. विधानसभा जिंकली, तिथे मनपा काय चीज? हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला.
दिल्लीतील तीन महापालिकांमधील एकूण २७० जागांपैकी भाजपाने १८५ जागा जिंकून विजयाची मालिका कायम ठेवली आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ला केवळ ४२ जागा मिळाल्या. जर भाजपाचा विजय इव्हीएममुळे असेल तर, मग या ४२ जागा ‘आप’ला कशा मिळाल्या? का तिथेही काही गडबड झाली? केजरीवाल यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केजरीवालांचे गुरु अण्णा हजारे यांनीदेखील असाच सल्ला दिला आहे. केजरीवाल यांना सत्तेची धुंदी चढली आहे, अशी जरा अधिकची बोचरी टीका अण्णांनी केली आहे. अण्णांच्या या त्राग्यामागे बरीच कारणं आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री झाले तेव्हा अण्णांचा सूर वेगळा होता. असो. राजकारणात हार-जीत होतच असते. २०१४पर्यंत भाजपाने अनेक पराभव पत्करले आहेत. निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना जागा किती मिळाल्या, यापेक्षाही टक्केवारी किती वाढली, यातच ते समाधान मानत. आज ती वेळ काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर आली आहे. दिल्ली मनपात काँग्रेस जिंकेल, असा दावा कोणीही केलेला नव्हता. कारण हा पक्ष पुरता आत्मविश्वास गमावून बसलेला आहे.दिल्लीतील काँग्रेसच्या पराभवास शीला दीक्षित आणि अजय माकन या नेत्यांमधील भांडणंदेखील कारणीभूत आहेत. असे सवतेसुभे खालसा होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणे नाही !

Web Title: 'Bush' defeat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.