पूल, रस्ते होताहेत, परंतु लोक आनंदी आहेत काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 08:39 PM2018-12-28T20:39:27+5:302018-12-28T20:40:30+5:30

गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात.

bridge, roads are build up, but are people happy? | पूल, रस्ते होताहेत, परंतु लोक आनंदी आहेत काय? 

पूल, रस्ते होताहेत, परंतु लोक आनंदी आहेत काय? 

Next

-  राजू नायक

पणजी शहराला जोडणा-या राष्ट्रीय हमरस्ता ६६ वर सध्या पूल व उंची वाढविलेला रस्ता याची कामे वेगाने सुरू आहेत. परिणामी लोकांना खूपच अडचणी सोसाव्या लागतात. दक्षिण गोव्याला जोडणारा कुठ्ठाळी जंक्शनपासूनचा अडीच किमी रस्ता बंद ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबत सध्या जनतेमध्ये तीव्र रोष आहे.

शुक्रवारी राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होऊन तूर्तास महिनाभर कुठ्ठाळी जंक्शन ते टोयोटा शोरूम हा रस्ता बंद न ठेवण्याचे ठरविण्यात आले. तेथे बगल रस्ता तात्पुरता बांधता येईल का, याची चाचपणी केली जाणार आहे. लोकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर सरकारलाही उपरती झाली.

दुर्दैवाने पर्वरीतील रहिवासी गेली पाच वर्षे अनेक अडचणी सोसताहेत. तेथे नवीन मांडवी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रचंड रांगा लागतात. तेथे एक छोटा रस्ता तयार करण्यात आला. तरीही प्रश्न सुटलेला नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल लोकांमध्ये मोठा रोष आहे. कामाचा दर्जा, दिरंगाई, विषयाचा सखोल अभ्यास न करण्याची प्रवृत्ती व भ्रष्टाचार यामुळे कामाचा दर्जा कोसळतो व लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

नव्या मांडवी पुलाचे कामही वादातून सुरू झाले. हा पूल देशातील एक सुंदर पूल होणार आहे यात शंका नाही. परंतु, त्याचे दोन खांब मांडवी नदीत उभे करताना सरकारने पर्यावरण परिणामांची शक्याशक्यता तपासली नव्हती. परिणामी एक एनजीओ हरित लवादाकडे गेली. तिने सरकारला तपासणी करण्यास भाग पाडले. तपासणी केल्यानंतर काम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी हा अहवाल बनावट असल्याचा एनजीओचा आरोप आहे. त्यामुळे कामाला विलंब लागल्याचे सरकारचे म्हणणो आहे. असे असले तरी पुलाने काही प्रश्न जरूर निर्माण केले आहेत. पूल गोवा सरकार ‘नाबार्ड’कडून ६०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन उभारत असले तरी त्याने पणजी राजधानीची वाहतूक कोंडी सुटणार का, एवढा प्रचंड खर्च करण्याऐवजी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या अत्यावश्यक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय का योजले नाहीत, वगैरे प्रश्न आहेत. त्याशिवाय पर्वरीपासून ते वेर्णेपर्यंत संपूर्ण महामार्ग ब-याच उंचावरून जाणार आहे. म्हणजे पर्वरीपासून दक्षिण गोव्याला जोडणारा महामार्ग जवळजवळ पुलावरच उभा असेल. हा खर्च कंत्राटदाराचे भले करण्यासाठीच वाढवून केला असल्याचीही टीका होते.

गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात. आताही कुठ्ठाळीचा मार्ग बंद न ठेवण्याचे ठरविले असले तरी ते तात्पुरते आहे आणि लोकांना नवीन संकटाला तोंड द्यावे लागणार आहे, यात शंका वाटत नाही!

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: bridge, roads are build up, but are people happy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा