शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

By यदू जोशी | Published: January 29, 2018 12:46 AM2018-01-29T00:46:24+5:302018-01-29T12:51:52+5:30

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. भाजपाने हिंदुत्व सोडल्याचा साक्षात्कार होऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. खरे कारण हिंदुत्व वगैरे नाहीच.

 Autocomplete Bedky and Political Reality | शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

Next

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे वा त्यांच्या घराण्यातील कुणालाही निवडणूक लढायची नसते त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेणे हे त्यांच्यासाठी कठीण जात नसावे. मात्र, ज्यांना लढावे लागते त्या आमदार आणि विशेषत: खासदारांचा कौल आधी घेतला असता तर युती तोडा असे कुणीही मनापासून म्हटले नसते. मुंबइचे अरविंद सावंत, बुलडाण्याचे प्रतापराव जाधवांपासून रामटेकच्या कृपाल तुमानेंपर्यंत शिवसेनेचे बहुतेक जण लोकसभेवर प्रचंड मतांनी कसे काय जिंकून गेले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी लाटेत ते तरले. शिवसेनेने मात्र त्याही विजयाचे श्रेय स्वत:कडे घेतले होते. तेव्हापासून राज्यातील आपल्या ताकदीबाबत हा पक्ष हवेत वा अतिआत्मविश्वासाने वावरत असल्याचे दिसते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असून त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर कधीही सत्ता मिळविता आलेली नाही. राष्ट्रवादीला सत्तेच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या सहाºयाने राहावे लागले. शिवसेनेची परिस्थिती आणखी वाईट झाली. १९९५ च्या युती सरकारमध्ये, त्या आधी आणि नंतरही अगदी २०१४ पर्यंत युतीमधील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेकडे आता लहान भावाचा रोल आला आहे. केवळ राजकारणच करायचे असेल तर शिवसेना वा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकतात पण सत्ताकारण करायचे असेल तर त्यांना अनुक्रमे भाजपा, काँग्रेससोबत जावे लागेल हा आतापर्यंत राज्यातील जनतेने दिलेला कौल आहे. राष्ट्रवादीला ही समज आहे त्यामुळे त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार ‘आम्ही काँग्रेससोबत आघाडी करूनच लढणार’ असे स्वत:हून मुलाखती देत सांगत आहेत. या दोन प्रादेशिक पक्षांच्या जशा मर्यादा आहेत तशाच भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनाही महाराष्ट्रात स्वबळावर गेल्या २३ वर्षांत सत्ता मिळविता आलेली नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे युती/आघाडीच्या धर्माचे पालन सत्तेसाठी करणे ही चौघांचीही अपरिहार्यता आहे. या अपरिहार्यतेतून बाहेर पडून १४५ चा जादुई आकडा गाठू शकेल अशी आजतरी कोणत्याही एका पक्षाची परिस्थिती नाही. मात्र, या आकड्याच्या सर्वात जवळ जाण्याची क्षमता भाजपाची दिसते. आघाडी, युतीत आपसातील भांडणांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसते. विकासाचा अजेंडा जलदगतीने राबविता येत नाही आणि मित्रपक्षाच्या चुकांवर अनेकदा पांघरूण घालावे लागते. युतीची ही मजबुरी एकदाची संपवावी असे आज इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाला अधिक वाटत आहे. हिंदुत्वापासून भाजपा दूर गेल्याने आम्ही आता एकला चलो रे चा पुकारा दिल्याचे शिवसेना सांगत असली तरी तो पुरता बनाव आहे.‘राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. भाजपासोबत युती केली तर लहान भावाची भूमिका मान्य करून त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे फारतर ९० ते १०० जागा पदरी पडतील हे शिवसेनेला ठाऊक आहे. इतक्या कमी जागा स्वीकारणे मातोश्रीला शक्य होणार नाही. गेल्यावेळी १२२ जागा जिंकणारा भाजपा युतीमध्ये किमान १७५ जागांची मागणी करेल. त्यामुळे दोघांच्या जागांचे अंकगणित जुळणे कठीण आहे आणि युती तुटण्यामागे या अंकगणिताचाच हिशेब आहे. 

Web Title:  Autocomplete Bedky and Political Reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.