दिवाळी अंकाच्या भोवताली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 04:04 AM2017-10-29T04:04:01+5:302017-10-29T04:04:19+5:30

‘अंधार खूप झाला, पणती जपून ठेवा’ असा संदेश देणारी दिवाळी ही कालमानाने चार दिवसांची नसतेच. ती आशा जाणवत राहते वर्षभर. त्यांचाच एक भाग म्हणजे दिवाळी अंक

Around the Diwali figure ... | दिवाळी अंकाच्या भोवताली...

दिवाळी अंकाच्या भोवताली...

Next

रविप्रकाश कुलकर्णी
‘अंधार खूप झाला, पणती जपून ठेवा’ असा संदेश देणारी दिवाळी ही कालमानाने चार दिवसांची नसतेच. ती आशा जाणवत राहते वर्षभर. त्यांचाच एक भाग म्हणजे दिवाळी अंक. गोडधोडाची दिवाळी तर संपली. पण आता समोर आहे ती अक्षर दिवाळी. वाचनवेड्यांच्या समोर, आजूबाजूला आणि चर्चेत एकच विषय दिवाळी अंक. अंकात कुठे काय बित्तंम आहे. दिवाळी किती कुंठित झाली आहे हे वेगळे सांगावयास नको. माणसं नुसती बघे होताना दिसते आहे. अशा वेळी नाना प्रकारचे दिवाळी अंक पाहताना, चाळताना लक्षात येते, सगळाच काही अंधार नाही. अजूनही सांगणारे आहेत आणि ते ऐकणारे - वाचणारे आहेत. या विश्वासावरच एवढे सारे लेखक लिहित आहेत.
काही अंक चाळता चाळता, हो, चाळता चाळताच. कारण असा संपूर्ण अंक वाचायचाच नसतो. आपल्या रूचीचं, आवडीचं काय असेल याचा शोध चालू असतो. या क्षणाला मी डोंबिवलीकर म्हणून सांगायलाच हवे, असा लेख आहे. ‘ललित’ प्रधान मिलिंद बोकील यांचा. ‘आठवणी लेखकांच्या’, बोकिलांच्या ‘शाळा’मध्ये डोंबिवली आलीच आहे. पण या लेखात त्यांच्या जडणघडणीच्या काळात आणि नंतर लेखक म्हणून झाल्यावर, त्यांच्या साहित्यिकांच्या संबंधातील आठवणी झकास आहेत. त्यात त्यांचा दृष्टिकोन ते सांगतात, आपण स्वत:हून कोणा लेखकाशी संपर्क करण्यात पुढाकार घेतला तर ते फारसे लाभदायक होत नाही. उलट परिस्थिती जेव्हा ते घडवून आणते तेव्हाच ते श्रेयस्कर ठरते अशी माझी याबाबतीतली अंधश्रद्धा आहे. याला अर्थातच काही अपवाद आहेत. या जडणघडणीच्या काळात एक सुप्त लेखक कसा आकाराला येत असतो म्हणा किंवा लपलेला असतो म्हणा ते पाहा - बोकील लिहितात, ‘भावे त्या कार्यक्रमातून लवकर उठून गेले. नंतर एक मुलगा वहीचा एक कागद घेऊन दांडेकरांपाशी आला. त्यांना म्हणाला की, सही पाहिजे. त्यावर त्याच्या पाठीवर हात ठेवून अशी कागदावर काही मी सही करत नाही, तू असं कर, तू मला एक कार्ड लिही. मी तुला त्याचं जरूर उत्तर देईन.’
आपण लेखक झाल्यावर आपल्याकडे कोणी अशी सही मागायला आलं तर आपणही असंच उत्तर द्यायचं, असं मी त्या वेळी मनोमन ठरवून टाकलं. अशा सह्या मागणारी मुलं आजही दिसतात. पुढेही दिसतील. कारण ती एक प्रकारची साथ असते. पण आपल्याला लेखक ओळखणारा बोकीलांसारखा एखादाच आणि हा अनुभव सांगणारे तर पहिलेच म्हणून या गोष्टीची नोंद!
जी.ए. कुलकर्णी यांच्या संबंधात हकीकत म्हणजे ती नामीच असणार हे आता जणू ठरून गेलं आहे. तशी बोकीलांची पण आहे. शिवाय बोकीली नजर पाहा - ते लिहितात, ‘पण आश्चर्याचा अपार धक्का देत जीएंचे उत्तर आले. चारच ओळी होत्या. अक्षर काहीसं बाळबोध, खाली इंग्रजी सही. एकवार असे वाटले की यांनी पत्र कोणाकडून तरी लिहून घेतलेले असावे आणि खाली फक्त सही केली असावी.’
इथेही बोकीलांमधील लेखक भान त्या वेळीदेखील कसं होतं पाहा, ते लिहितात, ‘...तसे वाटण्यामागे दुसरीही एक भावना होती. माझ्या त्या वेळी दोन-तीनच कथा प्रसिद्ध झाल्या असल्या तरी लेखक म्हणून असणारे भान आजच्याइतकेच तीव्र होते. कुठे तरी माझ्या लेखक म्हणून असणाºया अहंकाराला धक्का लागला होता. मला ती भावना आजही स्पष्ट आठवते. मी मनाशी म्हटले, तुम्ही लेखक आहात तर मीसुद्धा लेखक आहे, नाही करायची ना चर्चा, नका करू!’
पण तेच बोकील पुढे म्हणतात, ‘आता लक्षात येते की तो माझा फार मोठा करंटेपणा होता.’
आणखीही जीएंसंदर्भात बोकील सांगतात. अर्थात आता जीएंच्या चाहत्यांना हे वाचण्याशिवाय गत्यंतर नाही हेच खरं! अशा वेगवेगळ्या आठवणी सांगत शेवटी बोकील लिहितात, ‘लेखकांची ही सगळी प्रभावळ डोळ्यासमोर येते, भावे, माडगूळकर, जीए, तेंडुलकर, गौरी देशपांडे. त्या आठवणी पोटात मुरल्यासारखे होते. ते सगळे लेखक भोवताली कायम असावेत असे वाटते. ते असावेत आणि भाषणही असावे. त्यांनी लिहावे, आपणही लिहावे. हे माहीत आहे क ी असे कोणीच कायम असू शकत नाही आणि तसे पाहिजे तर लेखक आपल्या लेखनाच्या रूपाने कायम असतातच. ते कुठे जातात? पण तरीही वाटते की ते असावेत.
तुम्ही लेखक असता तेव्हा दुसºया लेखकाबद्दल तुमच्या मनात एक बंधुभाव घडून येतो. वाटते त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मी जे करतो आहे तेच तो करतो आहे. हा बंधुभाव हेच लेखक असल्याचे फार मोठे संचित आहे.
क़आज या बंधुभावाची अत्यंत गरज आहे. म्हणूनच त्यांच्या लेखाची दखल, सगळ्यांना कळावी म्हणून.
दिवाळी अंक काय देतात याची चुणूक फक्त. हे अंक आपल्यापर्यंत येणं हा प्रयत्नाचा भाग झाला. बघूया आता हाती काय काय माणिक मोती, रत्नं येतात ते.
येता पूर्ण महिना त्यासाठी तर आहे!

Web Title: Around the Diwali figure ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.