दृष्टिकोन - शिक्षणाबाबत सजग आणि काळापुढे असायला हवं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:26 AM2019-06-15T06:26:46+5:302019-06-15T06:27:52+5:30

‘शिकून मोठे व्हाल’’ असं नेहमी सांगितलं जायचं. घरामधले मोठे लोक शिक्षणावर भर देताना दिसायचे.

Approach - Careful and timely education should be there! | दृष्टिकोन - शिक्षणाबाबत सजग आणि काळापुढे असायला हवं!

दृष्टिकोन - शिक्षणाबाबत सजग आणि काळापुढे असायला हवं!

googlenewsNext

शैलेश माळोदे

‘शिकून मोठे व्हाल’’ असं नेहमी सांगितलं जायचं. घरामधले मोठे लोक शिक्षणावर भर देताना दिसायचे. निदान मध्यमवर्गीय पांढरपेशा घरांमध्ये तरी हे चित्र हमखास दिसायचं. आज विविध तंत्रज्ञान पर्यायांमुळे शिक्षण सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, चळवळ बनू शकेल असे वाटतानाच जगण्याच्या पद्धतीमुळे शिक्षणाकडे आणि एकूणच त्याच्या औचित्याकडे बघणं क्रमप्राप्त ठरू लागलंय.

निवडणुकांमध्ये रोजगारनिर्मितीचं भरघोस आश्वासन हा लोकप्रिय मुद्दा ठरू लागलाय. परंतु रोजगाराचं अर्थशास्त्र न समजून घेता केवळ राजकीय घोषणा करून सवंग लोकप्रियता मिळविण्यापेक्षा शिक्षण आणि रोजगार यांच्या संबंधाची पुनर्मांडणी करण्याची वेळ खरंतर आता अगदी हातघाईच्या पातळीवर पोहोचलीय. संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील धुरीण याकडे म्हणजे भारतामधील ‘जॉब मार्केट’मधील महासंकटाकडे लक्ष वेधण्याचं काम गेल्या काही वर्षांत ‘तरुणांमध्ये रोजगारलायक आवश्यक कौशल्याच्या अभावा’कडे बोट दाखवून करताना दिसत आहेत. एकूणच शिक्षण पद्धती त्यातही उच्च शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन क्रांतिकारकरीत्या बदलण्याची गरज आहे. रोजगाराभिमुख शिक्षण आणि भविष्यातील रोजगार या दोहोकडे ‘आउट आॅफ बॉक्स’ पद्धतीत बघण्याची गरज युद्धपातळीवर निर्माण झालीय.

विविध उद्योगांना कार्यकुशल तरुण रक्ताची गरज आहे. त्याची सुरुवात उच्च शिक्षण संस्थेतच व्हायला हवी. तेव्हाच त्याचं प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. सध्या जगातील जॉब मार्केट जबरदस्त वेगानं बदलताना दिसतं. काल आवश्यक वाटणारी कौशल्यं आज कालबाह्य होऊन नव्या कौशल्याची मागणी दिसून येतेय. सध्या प्रचलित असलेलं कौशल्य उद्योगात टिकण्यासाठी आवश्यक ठरतंय. हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘क्रिटीकल थिंकिंग’ आणि ‘क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग’ क्षमता प्रदान झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपली विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्था तयार आहेत का? तर याचं स्वच्छ उत्तर ‘नाही’ असं आहे. विद्यापीठं उद्योग आणि संशोधनाच्या गरजेनुसार विविध प्रकारचं स्पेशलायझेशन देऊ शकतात. परंतु उच्च शिक्षणाचं मुख्य काम हे उद्योगांना त्यांच्या गरजानुरूप प्रशिक्षित मनुष्यबळ एखाद्या कारखान्यासारखं पुरवायचं नसून उद्योगधंदे निर्माण होऊन रोजगार क्षेत्र व्यापक बनेल असं शिक्षण पुरविण्याचं आहे. थोडक्यात एखाद्या सिव्हिल इंजिनीअरचं काम रचनात्मकदृष्ट्या वा यांत्रिकदृष्ट्या ठोस धरण बांधणं इतकंच मर्यादित नसून त्याला पर्यावरणीय आणि आर्थिक प्रभावाचादेखील आवाका कळायला हवा. म्हणजे समस्या सोडविण्यासाठी तिचा संदर्भही कळायला हवा. ‘भारतामधील विद्यापीठं’ ओरिजिनल थिंकिंगपेक्षा केवळ अंमलबजावणीला महत्त्व देतात. संशोधनाला महत्त्व द्यायला हवे, अगदी पदवी शिक्षणातही.
भारतीय विद्यार्थ्यांनी पारंपरिकरीत्या विविक्षित विषयांचं अध्ययन केलंय. आपल्या उच्च शिक्षणात बहुशाखीय आंतरशाखीय अप्रोचना काही स्थान नाही. हेच खरंतर वास्तविक जीवनातील समस्या सोडवायला गरजेचं असतं. या संपूर्ण चित्रात सुधारणा करणं शक्य आहे का? शिकण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. परंतु एज्युकेटर्सनी त्यासाठी उत्तेजन द्यायला हवं, आपल्यातली ओढ शोधण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसे ‘टूल्स’ हवेत. हे दुर्मीळ असलं तरी तसं झाल्यास सर्वोत्कृष्टतेची चिन्ह मोठी होतात. शिकणं लवचीक हवं. त्याला निरीक्षणाची जोड हवी. पदवीसाठी ‘फंडे’ पाठ करून सुरक्षित प्रवास करण्यापेक्षा एक्स्पोरेशन आधारित शिकणं आणि अपयशातून शिकण्याला महत्त्व हवं. म्हणजे शिक्षण विद्यार्थीकेंद्री आणि सहभागाच्या तत्त्वावर हवं. म्हणजे ते ‘‘करून शिकतील.’’ त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षक प्राध्यापक हवेच. अर्थात त्यासाठी साधनं हवीत आणि नेतृत्व सक्षम आणि व्यावसायिक हवं.

सर्व शक्यतांबाबत आपण खुलं असायला हवं. केवळ ‘इंडस्ट्री रेडी’ असणं पुरेसं नाही. आज तुम्ही तसे असाल; पण उद्या कदाचित बेरोजगार असाल. म्हणून क्रिटीकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंग महत्त्वाचं. शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांनी उपजीविकेबाबत सजग असायला हवं. लोकांना भविष्याविषयी भीती वाटतेय. हाच ‘लॉईव्हलीहूड इश्यू’ आपल्या देशापुढील सर्वांत मोठा मुद्दा आहे. त्याची सुरुवात शेतकऱ्यांपासून झालीय तो आता आपल्या शिक्षणाचाही आहे. काम नसलेले अभियंते हे भविष्यकालीन स्फोटक सामाजिक वास्तव बनणार आहे. तेव्हा आपण सजग असायला हवं. काळापुढे असायला हवं.



( लेखक विज्ञान पत्रकार आहेत )

Web Title: Approach - Careful and timely education should be there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.