धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

By विजय दर्डा | Published: March 11, 2024 07:31 AM2024-03-11T07:31:59+5:302024-03-11T07:32:29+5:30

संस्कारांचा वृक्षच सारी आव्हाने पेलू शकतो. सहजता, सरळपणा आणि संस्कारांच्या बाबतीत संपूर्ण अंबानी परिवार प्रशंसेस पात्र आहे. 

anant ambani pre wedding event dhirubhai ambani cultural tree and nita ambani cultivation | धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

एखाद्याने थोडे पैसे कमावले, थोडी प्रसिद्धी मिळवली तर त्याच्यात विनम्रता राहत नाही, तो आखडूपणा करू लागतो, असे सर्वसाधारणपणे आढळते. अशा व्यक्तीला हे ठाऊक नसते की वादळे येतात तेव्हा मोठमोठी झाडे मुळापासून उखडून फेकली जातात. केवळ संस्कारांचा वृक्ष अशा सगळ्या थपडा झेलत उभा राहू शकतो. धीरूभाई अंबानी, माता कोकिलाबेन यांनी अंबानी परिवारात संस्कारांचे जे बीजारोपण केले त्याला आज फळे-फुले आली आहेत. किंबहुना फळाफुलांनी अंबानी परिवाराचा वृक्ष बहरला आहे, याचे कारण मुकेश अंबानी तर आहेतच, विशेषत: नीता अंबानी यांनी संस्कारांच्या बाबतीत या वृक्षाचे सिंचन करून जतन केले आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग समारंभाची सगळीकडे चर्चा होत आहे. या समारंभाचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतो आहे की, इतक्या मोठ्या साम्राज्याचा स्वामी, अंबानी परिवारातील लहान मुलगा किती विनम्र दिसतो. 

सामान्य परिवारातील एखादी महिला दहा-वीस रुपयांची चुरगळलेली नोट त्यांच्या हातात सरकवते. ग्रामीण भागात आशीर्वाद देण्याची ही पद्धत अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहे. अनंत अंबानी वाकून ती नोट स्वीकारतात, कृतज्ञपूर्वक नमस्कार करतात. ती महिला राधिकाला साडी देते. राधिका ती साडी हृदयाशी धरते; हे दृश्य भावविभोर करणारे आहे. अंबानी परिवाराला जवळून ओळखणाऱ्यांना हे माहीत आहे की केवळ अनंतच नव्हे, तर बहीण ईशा आणि भाऊसुद्धा इतकेच विनम्र आहेत; जितकी विनम्रता कोकिलाबेन, मुकेश आणि नीता अंबानी यांच्यामध्ये दिसते. आकाशच्या पत्नी श्लोकाही अत्यंत नम्र, धार्मिक आहेत. अनंत यांना कोणीतरी विचारले, वडील आणि काकांप्रमाणे तुम्ही दोघे भाऊही कधी वेगळे तर होणार नाही? अनंत यांचे उत्तर होते, ‘भाऊ आकाश पित्यासमान आणि ईशा मातृतुल्य असल्याने वेगळे होण्याचा प्रश्नच नाही.’

मागच्या महिन्यातला एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. ‘लोकमत समूहा’चा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा यावेळी खुल्या आकाशाखाली गेटवे ऑफ इंडियावर आयोजित करण्यात आला होता. स्वाभाविकपणेच तिथे आरामशीर खुर्च्या नव्हत्या. त्या समारंभात औद्योगिक क्षेत्रात श्रेष्ठ योगदान दिल्याबद्दल ‘यूथ आयकॉन’ पुरस्कार देऊन ईशा अंबानी यांना गौरवण्यात आले. खुद्द मुकेश अंबानी कार्यक्रमाला आले. माझ्या काही सहकाऱ्यांना वाटले की अशा सामान्य खुर्चीवर मुकेश अंबानी यांना बसवणे उचित होणार नाही; म्हणून त्यांनी दुसरी खुर्ची आणायला सांगितले, पण, मुकेशभाईंनी त्यांना थांबवले. संपूर्ण दीड तास ते इतर लोकांप्रमाणेच त्या सामान्य अशा खुर्चीवर बसले होते.

धीरूभाईंची विनम्रता आणि दूरदृष्टीची दोन उदाहरणे मी आपल्याला सांगू इच्छितो. माझे वडील बाबूजी; वरिष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा ८० च्या दशकात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री होते तेव्हा मी त्यांची आणि धीरूभाईंची भेट घडवून आणली होती. त्यानंतर आमचे नाते बहरत गेले. ‘लोकमत’ दिवाळी विशेषांकाच्या जाहिरातीसाठी मी त्यांना दरवर्षी पत्र पाठवत असे. एका वर्षी मी त्यांना पत्र पाठवायला विसरलो. तोवर ‘लोकमत’ चांगला स्थिरस्थावर झाला होता. धीरूभाईंचा मला फोन आला, ‘‘विजय, आपले पत्र नाही आले. मला हे माहीत आहे की ‘लोकमत’ला आता आमची गरज नाही, पण आम्हाला तर ‘लोकमत’ची गरज आहे. कृपया पत्र पाठवा आणि आमची जाहिरात स्वीकारा!’’

१९९८ मध्ये मी राज्यसभेची निवडणूक लढवत होतो. धीरूभाईंचा फोन आला की लवकरात लवकर येऊन भेटा. मी त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यांनी मला विचारले की आपल्याला समाजवादी पक्षाच्या मतांचीही गरज असणार. मी आश्चर्यचकित झालो. म्हणालो, गरज तर लागेलच. मुकेशभाई आणि अनिलभाई तिथे उभे होते. धीरूभाईंनी म्हटले, मुलायम सिंग यांना फोन लावा. त्यांनी दुसऱ्या दिवशीच मुंबईला बोलावले आणि माझी भेट घडवून आणली. मुलायम सिंह आणि अमर सिंह यांना त्यांनी सूचना केली आणि समाजवादी पक्षाची चार मते मला मिळाली. धीरूभाईंनी विचारले की, आणखी काही गरज लागेल का? परंतु, मी त्यांना सांगितले की आणखी कशाची आवश्यकता नाही. नातेसंबंध दृढ करण्यात त्यांची दूरदृष्टी होती.

प्री वेडिंग समारंभावर अंबानी परिवाराने १००० कोटी रुपये खर्च केले असेही म्हटले जात आहे. आता एक क्रूझ पार्टी होणार असून जुलै महिन्यात मुंबईत शानदार लग्न होईल. जगातील उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी यापूर्वीही एकापेक्षा एक असे प्रचंड खर्चाचे लग्न समारंभ केलेले आहेत. सामान्यतः लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे कमीत कमी १० टक्के तरी खर्च मुलांच्या लग्नावर करतातच. अंबानी परिवाराची एकंदर संपत्ती ७.६५ लाख कोटी इतकी आहे. याच्या १ टक्का ७६५० कोटी रुपये होतात. अंबानी परिवाराने जामनगरच्या ५० हजार लोकांना जेवायला बोलवले. स्वतःच्या हाताने त्यांना वाढले. त्यांना भेटवस्तू देऊन आभार मानले. ही हृदयस्पर्शी गोष्ट आहे.

या लग्नाची महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की ते भारतातच होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी श्रीमंत मंडळींना आवाहन केले होते की त्यांनी परदेशात जाऊन लग्न करू नये. भारतातच करावीत. वरवर पाहता ही गोष्ट खूप साधी वाटते, पण त्यात मोठा अर्थ सामावलेला आहे. आलिशान अशी लग्ने देशात झाली तर सगळी पायाभूत सुविधा देशातच उभी राहील. लोकांना रोजगार मिळेल. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांच्या या म्हणण्याचा आदर केला. 

इथे मी पुन्हा एकदा अनंतविषयी बोलू इच्छितो. त्यांच्यात माणुसकी ठासून भरलेली आहे. त्यांना मुक्या प्राण्यांविषयी अतिशय प्रेम असून, जामनगरमध्ये ‘वनतारा’ नावाचे आशियातले सर्वांत मोठे आसरा केंद्र जवळपास ३००० एकरांत पसरलेले आहे. तेथे केवळ जखमी प्राण्यांवर उपचार केले जात नाहीत तर दुर्लभ प्रजातींचे जीव संरक्षित केले जातात. अनंत स्वतः वनतारामध्ये रमतात. त्यांच्याबरोबर राधिकासुद्धा असते. वनताराचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून सेवा आहे. अनंतला देशाचे रक्षण करणारे जवान आणि नागरिकांचे रक्षण करणारे पोलिस यांच्याबद्दल खूपच आस्था आहे. मुंबईतल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ठिकठिकाणी वातानुकूलित निवारे तयार केले; जिथे ते आपले कर्तव्यही बजावतात आणि गरज पडल्यास आरामही करतात. अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका या उभयतांना खूप साऱ्या शुभेच्छा.
 

Web Title: anant ambani pre wedding event dhirubhai ambani cultural tree and nita ambani cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.