आमले महाराज...लोकसेवेचा विरक्त प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:48 AM2018-02-10T02:48:53+5:302018-02-10T02:50:06+5:30

आमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.

Amale Maharaj ... The untimely publicity of the public service | आमले महाराज...लोकसेवेचा विरक्त प्रपंच

आमले महाराज...लोकसेवेचा विरक्त प्रपंच

Next

- गजानन जानभोर

आमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.

आमले महाराज परवा गेले. गुरुदेव सेवा मंडळातील ते आद्य कीर्तनकार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या सहवासाने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. आमले महाराज कमालीचे परखड होते. मागच्या आठवड्यात महाराजांचे कीर्तन झाले. कुणीतरी म्हणाले, ‘महाराज बसून बोला, थकवा येईल.’ काहीशा रागानेच महाराज त्याला म्हणाले, ‘मी मरेपर्यंत थकणार नाही’ असा परखडपणा यायला निष्कलंक चारित्र्य आणि निर्मोही आयुष्य वाट्याला येणे आवश्यक असते. आमले महाराजांना तसे जगता आले.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात राजंदा नावाचे एक खेडे आहे. तिथे एका झोपडीत आमले महाराज राहायचे. पण, पायाला भिंगरी लागलेली. त्यामुळे एका गावात ते कधी थांबत नसत. १९४३ ची गोष्ट आहे, अकोल्यात राष्ट्रसंतांचा चातुर्मास होता. या चातुर्मासात आमले महाराजही सहभागी झाले. इथेच राष्ट्रसंतांशी स्रेह जुळला. भारत-चीन युद्धाच्यावेळी राष्ट्रसंतांसोबत ते सीमेवरही गेले. मोझरीच्या गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिराचे बांधकाम सुरू असताना राष्ट्रसंत स्वत: कामावर होते. आमले महाराज त्यांच्यासोबत खड्डे खणायचे, माती भरायचे. हा तरुण बायको-पोरांना सोडून सेवाकार्यात असतो या गोष्टीचे तुकडोजी महाराजांना अप्रूप वाटायचे. त्यांच्याएवढाच गाडगेबाबांचाही आमले महाराजांवर जीव होता. बाबांचे कीर्तन सुरू झाले की, ते आमले महाराजांना उभे करायचे. मग आमले महाराज खंजेरीवर भजन म्हणायचे. गाडगेबाबांच्या भ्रमंतीचा आणि माणसे पारखण्याचा तो काळ. सुरुवातीला काही सोबतीला होते, काही मध्येच सोडून गेले. आमले महाराज मात्र बाबांना घट्ट बिलगून राहिले. एखाद्या गावात गेल्यानंतर बाबांचा मुक्काम मंदिराशेजारी असायचा. आमले महाराज खंजेरी वाजवत गावात फिरायचे आणि भाकरी घेऊन यायचे. महाराजांचे आयुष्य नि:संग. त्यांना बायको-पोरांची चिंता नव्हती. अशावेळी पत्नी निर्मलाबार्इंची घालमेल व्हायची. त्या मजुरीला जायच्या. मुलीसुद्धा मजुरीवर जाऊ लागल्या. मजुरी करून त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. आज त्या सर्व सुखात आहेत.
आमले महाराज शेवटपर्यंत जाणीवपूर्वक कफल्लक राहिले. कीर्तनाचे मानधनही त्यांनी घेतले नाही. आलेवाडीच्या भीमराव वानखडे पाटलांनी २० एकर शेती त्यांना देऊ केली. परंतु ‘माझी खंजेरीच सोबत राहू द्या’, असे सांगून महाराजांनी हा मोहही टाळला. त्यांचा संसार हा असा फाटका आणि जागोजागी ठिगळ लागलेला. पण, बायको-पोरांनी कधी आदळआपट केली नाही. उलट त्यांना या फकिराच्या कफल्लकतेचा अभिमानच वाटायचा. या वैराग्याच्या लोकसेवेतच घरच्यांनी आयुष्याचे समाधान शोधले. महाराजांची पत्नी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत कामावर जायच्या. ‘जीवात जीव आहे तोपर्यंत मी कामावर जाईन’ निर्मलाबार्इंच्या चेहºयावर फाटक्या संसाराचे त्रासिकपण कधी जाणवले नाही. राष्ट्रसंतांचे एक प्रसिद्ध भजन आहे ‘यह संसार लोभ का हंडा, जीवनभर नही भरता’! आमले महाराज ते सतत गुणगुणायचे. त्यांच्या अनासक्त प्रपंचाचा अर्थ या भजनातून मग हळूहळू उलगडत जायचा. महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. या जगाचा निरोप घेताना त्यांच्या चेहºयावर कृतार्थता होती. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला वाटणार नाही, असे एक त्रयस्थपणही होते.

 

Web Title: Amale Maharaj ... The untimely publicity of the public service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.