खळबळ उडवणाऱ्या ChatGPT नंतर आता BharatGPT

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:00 AM2024-01-05T10:00:01+5:302024-01-05T10:00:47+5:30

मुंबई आयआयटीच्या साहाय्याने BharatGPT हे भारताचे जनरेटिव्ह एआय रिलायन्स तयार करीत असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे. त्यानिमित्त..

After the sensational ChatGPT, now BharatGPT | खळबळ उडवणाऱ्या ChatGPT नंतर आता BharatGPT

खळबळ उडवणाऱ्या ChatGPT नंतर आता BharatGPT

डॉ. रीता श्रीकांत पाटील, वरिष्ठ सल्लागार, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

ChatGPT हे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर आधारित जनरेटिव्ह AI आहे. जे दिलेल्या प्रॉम्प्टनुसार मजकूर, चित्र आदींची रचना करून प्रस्तुत करते.  ChatGPT ने तंत्रज्ञानासह लोकांच्या परस्परसंवादात अशी क्रांती केली आहे की जणू एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे.  OpenAI या कंपनीने २०१८मध्ये ChatGPT प्रथम सादर केले आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये वापरकर्त्याच्या अभिप्रायासाठी ते खुले  करण्यात आले होते.  

हा चॅटबॉट कोड लिहू शकतो, निबंध, कविता, भाषणे आणि पत्रे लिहितो. संशोधन प्रकल्प रूपरेषेसह सादर करू शकतो... त्याबद्दलची विलक्षण उत्सुकता सध्या जगभरात आहे. ही या तंत्रज्ञानाची केवळ सुरुवात असून, त्याचे अनेक प्रगत टप्पे यापुढच्या काळात येऊ घातले आहेत. अलीकडेच आकाश अंबानी यांनी  ‘BharatGPT’ची घोषणा केली. मुंबई आयआयटीच्या साहाय्याने  भारताचे हे स्वतःचे जनरेटिव्ह एआय रिलायन्स तयार करीत असल्याचे आकाश अंबानी म्हणाले. BharatGPT ही  एक क्रांतिकारक नवकल्पना आहे, संवादात्मक AI प्लॅटफॉर्म, जे १२  भारतीय भाषांमध्ये, व्हिडीओमध्ये, विद्यमान जनरेटिव्ह एआय/लार्ज लँग्वेज मॉडेल्सना भारताच्या भाषेत उत्तरे देऊ शकेल. 

यामध्ये सध्या पुढील प्रयोग समाविष्ट आहेत :  ई-कॉमर्स उद्योगाला बळकटी देणे, परस्परसंवादी संभाषणांद्वारे शिक्षणाचे सक्षमीकरण, AIच्या मदतीने आरोग्यसेवा सुकर करणे, विम्याचे छत्र सर्वदूर पोहोचवणे, माध्यमे आणि बातम्यांमध्ये अधिक दर्जेदार भर घालून वाचक/दर्शकांचा अनुभव संपन्न करणे, ऊर्जाक्षेत्राच्या व्यवस्थापनात सुकरता आणणे, बुद्धिमान चॅटबॉट्ससह रिटेलला सक्षम बनवणे, विनाव्यत्यय दूरसंचार जोडण्या, प्रवास आणि पर्यटनाच्या क्षेत्रातला अनुभव अधिक दर्जेदार करणे,  बँकिंग आणि पेमेंट्ससाठी  FinTech चे सक्षमीकरण आदी अनेक क्षेत्रात BharatGPT   मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत होईल. विविध प्रकारची कामे वेगाने आणि अचूपार पाडण्यासाठी BharatGPT  वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स प्रदान करील.  

संभाषणात्मक एआय प्लॅटफॉर्म, सेवा प्रदान करणारे चॅटबॉट (CaaS), व्हिडीओ बॉट , व्हॉइस  बॉट, WhatsApp बॉट, सिग्नल बॉट, IVR बॉट, एसएमएस आणि  तुमचे अकाउंट परस्पर हॅण्डल करण्यास सक्षम असा सोशल मीडिया बॉट, तुमचे ईमेल संभाषण मॅनेज करणारा ईमेल बॉट असेल.. एवढेच नव्हे, उत्पादनांच्या जाहिरातींसाठीही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शक्ती असलेली विविध टूल्स तयार होतील. 
तयार केला जाणारा डेटा चांगल्या दर्जाचा, संतुलित, संभाव्य पूर्वाग्रहांपासून मुक्त असणे हे जनरेटिव्ह एआय मॉडेल्ससमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.  सायबर गुन्हेगारांनी आपले हेतू साध्य करण्यासाठी  या साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. चेक पॉइंट रिसर्च (CPR) नुसार, फिशिंग ईमेल, इन्फोस्टीलर्स, एन्क्रिप्शन टूल्स आणि इतर फसवणूक क्रियाकलाप तयार करण्यासाठी हॅकर्स OpenAI वापरू लागले आहेत. 

जनरेटिव्ह एआयच्या नकारात्मक वापराच्या प्रकरणांपैकी एक म्हणजे चुकीची माहिती पसरवणे, सार्वजनिक धारणा तयार करणे. या भाषा मॉडेल्समध्ये  दिशाभूल करणारा मजकूर, ऑडिओ आणि व्हिडीओ तयार करण्याची स्वयंचलित क्षमता आहे. AI मॉडेल्ससाठी कायद्याच्या चौकटी तयार करण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे.

आरोग्यसेवा, वित्त आणि संरक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांसाठीचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे प्राधान्याने आखली जात आहेत, कारण येथे माहितीची गोपनीयता राखण्यासाठी  AI च्या वापरावरील नियमन अत्यंत महत्त्वाचे आहे. या एआय टूल्समध्ये नक्कीच अमर्याद क्षमता आहे; परंतु त्याच वेळी, मानवी निर्णय क्षमतेला पर्याय  म्हणून त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहाता कामा नये. या तंत्रज्ञानाशी संबंधित जोखीम व्यवस्थापन हा अत्यंत संवेदनशील विषय असून, संभाव्य धोके नियंत्रित करण्यासाठी  वापरकर्ते  भागधारक, नागरी समाज, सरकार आणि इतर संस्थांमध्ये समन्वय आवश्यक आहे.

Web Title: After the sensational ChatGPT, now BharatGPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.