मनाचिये गुंथी - एकारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:55 AM2017-09-11T00:55:18+5:302017-09-11T00:55:38+5:30

झाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले.

Acorn | मनाचिये गुंथी - एकारणे

मनाचिये गुंथी - एकारणे

Next

- किशोर पाठक

झाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले. म्हणजे माणसाचे सहज मरणे आणि त्याला मारणे यात केवळ ‘कानाचा’ फरक, पण तो किती कठीण आणि न समजणारा. म्हणजे माणसाला माणूस जगायला हवा, त्याचा विचार जगायला हवा असे वाटते, पण माणूस जगत नाही जगवत नाही. आपल्याला एक इझम चिकटलाय. गंमत म्हणजे तो प्रत्येक माणूस जगायलाच हवा, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित हा घोष करीत राहतो आणि नेमके उलटे वागतो. माणूस जेवढा विविध तेवढे त्याचे विचारही भिन्न. मला जो माणूस माझा वाटतो तो इतरांना जवळचा वाटत नाही. म्हणजे दया, क्षमा, शांती हे शब्द प्रत्येकाला माहीत आहेत, मान्य आहेत परंतु ते तत्त्वज्ञान झाले याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय संबंध? म्हणजे न आवडणारा ठोकायलाच हवा ही आपली प्रवृत्ती. म्हणूनच माणूस जगतो आणि मरतोही. मग आपण एक वाक्य ऐकतो, वाचतो. माणूस मेला तरी विचार मरत नाहीत.
गांधी गेले, शास्त्री गेले, जयप्रकाश नारायणही गेले, विनोबा गेले, श्यामच्या आईचे साने गुरुजी गेले काय बदल झाला आपल्यात? कुठल्या वैचारिक प्रचाराने आपण सुधारलो, बदललो. उलट दिवसेंदिवस आपण खूप एकांतिक होत चाललोत. आपण एकारलोत. हे एकारणे कुणाला हवे, कुणाला नको, मग भले त्यात माणूस चिरडला तरी जपायला हवा म्हणणारेही आहेत. याला शिक्षा व्हायलाच हवी. या व्यक्ती समाजात उंच मानेने चालतात, वावरतात आणि स्वयंघोषित संत-महंत तुरुंगात बसतात. कायदा कठीण आहे. तो हवा तेव्हा बदलता येतो किंवा त्याचा हवा तसा अर्थ लावता येतो. हे सोयीस्कर अर्थ लावणे यालाच वैचारिक परिभ्रमण म्हणतात, कुणी क्रांती म्हणतात कुणी आणीबाणी म्हणतात. कुणाला हा मुक्त संचार वाटतो, तर कुणाला मुस्कटदाबी वाटते. असा विचार करणारी माणसं एकमेकांसमोर आली तर काय होईल? मारामारी, दंगल आणि खून! पण हे वैचारिक, सर्वमान्य नाही. माणसांना सरळ खाणारा बिबट्या सापडला तर त्याला घनदाट जंगलात सोडतात. का तर तोही जगायला हवा. पण माणसाला ती मुभा का नाही? तू बोल वा बोलू नको. तू मला हवं ते बोल किंवा बोलूही नको! तुझे जगणे हे वैचारिक धारेत निरुपयोगी असेल तर जग, तू जगायला लायक नाहीतर मरायला तयार हो। खूप मोठ्याने म्हणतो आपण, माणूस मेला तरी चालेल विचार जगायला हवेत. पण मग एकच प्रश्न! जगण्याचा हक्क प्रत्येक माणसाचा, मग माणूस का जगायला नको? हा प्रश्न उत्तरहीन!

Web Title: Acorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.