गर्भारपण आणि अपत्यजन्माच्या काळात संगीताची जादुई कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 10:17 AM2024-04-13T10:17:18+5:302024-04-13T10:18:05+5:30

भारतातील प्रत्येक राज्यात स्त्रीचे गर्भारपण आणि अपत्यजन्माचे स्वागत करण्याच्या अनोख्या पद्धती आहेत. त्यात गाणेही येते. या काळात संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण!

A magical story of music during pregnancy and childbirth | गर्भारपण आणि अपत्यजन्माच्या काळात संगीताची जादुई कहाणी

गर्भारपण आणि अपत्यजन्माच्या काळात संगीताची जादुई कहाणी

शरत पांडे

भारतात  दरवर्षी ११ एप्रिलला सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो. कस्तुरबा गांधी यांचा हा जन्मदिवस. महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा महिला सक्षमीकरणाचे प्रतीक होत्या. सर्वांना निरोगी आयुष्य मिळून सर्वांचे कल्याण व्हावे यादृष्टीने शाश्वत विकासाच्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांशी भारताने हा दिवस साजरा करणे हे सुसंगतच होय. मातेचे आरोग्य भारतही महत्त्वाचे मानतो. 

गर्भारपण, अपत्याचा जन्म आणि नंतरचा काळ हा स्वास्थ्यकारक जाण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. एक उपचार पद्धती म्हणून त्याकडे पाहिले जाते. संगीत भावस्थितीवर अत्यंत अनुकूल परिणाम करते. तणाव कमी करते आणि शीण घालवते. मातेची काळजी घेण्याच्या अन्य प्रयत्नांबरोबर संगीताचा उपयोग अनेक प्रकारे लाभदायी ठरतो. भारतीय लोकसंगीत वैविध्यपूर्ण आहे; कारण भारतात सांस्कृतिक वैविध्य आहे. वेगवेगळ्या भाषा, बोलीत, ठेक्यात ते गायले जाते. 

गर्भारपण आणि अपत्यजन्म या काळात तणाव आणि चिंता लक्षणीयरीत्या वाढतात. भारतातील प्रत्येक राज्यात स्त्रीचे गर्भारपण आणि अपत्य जन्माचे स्वागत करण्याच्या अनोख्या पद्धती आहेत. त्यात गाणेही येते. ‘द इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन मॅटर्नल हेल्थ, ॲन इम्पिरिकल ॲनॅलिसिस’ या आपल्या लेखात तन्वी कश्यप आणि प्राध्यापक अनुराधा शर्मा यांनी प्रसूतीपूर्व आणि पश्चात काळात संगीताचा वापर करणे कसे लाभदायी ठरते यावर प्रकाश टाकला आहे. आधीच्या प्रसूतीदरम्यान ज्या स्त्रियांना त्रास झाला होता त्यांची प्रसूती संगीतामुळे सुलभ झाल्याचे दाखले त्या देतात. संगीत गुंगी आणणारे, बधीर करणारे परिणाम साधते. वेदना शमनासाठी त्याचा उपयोग होतो. प्रसूतीच्या वेळी मातेला असह्य कळा सोसाव्या लागतात. आल्हादकारक संगीतामुळे या कळा सुसह्य होतात. ‘गेट कंट्रोल थिअरी ऑफ पेन’ असे या उपचार पद्धतीला म्हटले जाते. आदिवासींमध्ये अपत्य जन्माच्या वेळी ढोल वाजवण्याचा प्रघात आहे. ढोलाच्या लयबद्ध आवाजामुळे मातेला प्रसूती सुसह्य होण्यास मदत होते. 

भावना उद्दिपित करून नाती जोडण्याची क्षमता संगीतात आहे. जन्म घेतलेल्या मुलाबरोबर संगीत ऐकणे किंवा पाळणा गीत म्हणणे यातून बाळ आणि माता यांच्यातील नाते दृढ होते. सामूहिकपणे गाणी म्हणण्याचाही रिवाज काही ठिकाणी आहे. आधुनिक काळात बाळाला अंघोळ घालणे हा एक महत्त्वाचा समारंभ असतो. आईला त्यातून कुटुंबाचा भावनिक पाठिंबा मिळतो. पूर्वी उत्तर भारतात गोदभराई केली जात असे. तामिळनाडूत वलईकप्पू किंवा कर्नाटकात सीमांथ, आंध्रात पेलीकुतुरू याचबरोबर बंगालीत शाड आणि राजस्थानमध्ये श्रीमंथम असे विधी साजरे केले जातात. 
होऊ घातलेल्या मातेला इस्पितळातील वातावरण बेचैन करते अशा वेळी मंद संगीत उपयोगी पडते. उत्तराखंडमध्ये जागर हे पारंपरिक लोकसंगीत बाळंतपण सुखरूप व्हावे याकरिता वापरतात. ख्रिश्चन समाजातही मातेला धीर देण्यासाठी गाणी म्हणतात, सामूहिक प्रार्थना करतात. अनेक मुस्लीमबहुल संस्कृतीत परंपरेने चालत आलेली अंगाई गीते आढळतात. अशा प्रसंगी गाण्यातून प्रेम, सुरक्षा, नात्यांचे बंध पक्के केले जातात. आपण कुटुंबात सुरक्षित आहोत हा भाव बाळापर्यंत पोहोचतो. अपत्य जन्मानंतरही संगीत उपयोगी पडते. प्रसूतीकाळात मोठ्या स्थित्यंतरातून जात असलेल्या स्त्रीला त्याचा आधार मिळतो. 

काश्मीरमध्ये वनवून हे पारंपरिक लोकसंगीत सादर करून नवजात बाळाचे सर्वजण स्वागत करतात. गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यात संगीत ऐकल्याने बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्याचा धोका कमी होतो. शिवाय त्यासाठी अन्य उपचार घ्यावे लागल्यास येणाऱ्या खर्चापेक्षा संगीतोपचार स्वस्तही पडतो असे संशोधनात आढळून आले आहे. थोडक्यात सुरक्षित मातृत्वाची सांगड संगीतोपचार पद्धतीशी घातल्याने मातेचे शरीर आणि मनाची काळजी घेण्याचा समग्रलक्ष्यी प्रयत्न केला जातो. सुप्रजननाच्या दृष्टीने संगीताचा उपयोग मोलाचा आहे.

Web Title: A magical story of music during pregnancy and childbirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.