Solar energy to digital schools in Dhule district, 40 school autocomplete people's connectivity | धुळे जिल्ह्यात डिजिटल शाळांना सौरउर्जेची झळाळी, ४० शाळांच्या स्वयंपूर्णतेला लोकसहभागाची जोड

धुळे - जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘डिजिटल’ करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग धुळे जिल्ह्यात राबविण्यात आला. लोकसहभागामुळे हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आता जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शाळांपर्यंत वीज पोहचलेली नाही, अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोलरकीट बसविण्यात येत आहे. सौरउर्जेमुळे शाळा झळाळणार आहेत.
देशात आता ‘डिजिटल क्रांती’ सुरू आहे. त्यात आता शाळाही मागे नाहीत. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यालाही तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण मिळावे यासाठी धुळे जिल्ह्यात ‘डिजिटल शाळांचा’ प्रयोग यशस्वी झाला. ‘डिजिटल शाळेचे’ प्रणेते हर्षल विभांडिक व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गावांपासून तर अगदी झोपडपट्टीत भरणाºया शाळाही ‘डिजिटल’ झाल्या. संपूर्ण ११०३ जि.प.शाळा १८ महिन्यांच्या कालावधित ‘डिजिटल’ झाल्या. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात धुळ्याचे नाव सुवर्णक्षरांनी नोंदविले गेले. या प्रयोगाला लोकसहभागाची जोड मिळाली.
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबरोबरच ज्ञानरचनावादी शिक्षणही मिळू लागले. जिल्हा परिषदेच्या शाळांनी टाकलेली ‘कात’ बघून पुन्हा प्रवेश घेणा-यांचा ओढा वाढला. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांनी ‘इंग्रजी’ला गुडबाय करून जि.प.शाळेत ‘वापसी’ केली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ६६९ विद्यार्थी जि.प. शाळांकडे परतले आहेत.
शाळा डिजिटल झाल्या खºया, मात्र दुर्गम भागात विजेचा प्रश्न होता. काही भागात वीज पोहचलेली नाही, काही ठिकाणी शाळेच्या वेळेतच भारनियमन होत होते. काही ठिकाणी शाळेचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे खंडित करण्यात आलेला. त्यामुळे शाळा डिजिटल असूनही काहीच उपयोग होत नव्हता. ही समस्या साक्री व शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर आहे. विजेची समस्या कायमस्वरूपी सोडण्यासाठी जि.प.च्या शाळांमध्ये सौर उर्जेचे पॅनल बसविण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार साक्री तालुक्यातील जवळपास ४० शाळांमध्ये सोलर कीट बसवून त्या विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात आल्या आहेत. यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सहकार्य लाभले.
आदिवासी दुर्गम भागातील ज्या शाळांपर्यंत वीज पोहचलेली नाही, अथवा ज्यांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे, या शाळांमध्येही राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून सोलर कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शाळा विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हाव्या, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन व शिक्षणाधिकारी मोहन देसले, डिजिटल शाळेचे प्रणेते हर्षल विभांडिक यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

ज्या भागातील शाळांमध्ये विजेची अडचण आहे, त्याठिकाणी सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. आतापर्यंत ४० शाळांमध्ये या पद्धतीने सोलर पॅनल बसविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सोलर पॅनल बसवून, शाळा विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
मोहन देसले,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, धुळे
 


Web Title: Solar energy to digital schools in Dhule district, 40 school autocomplete people's connectivity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.