लोककला,नाट्य कलेची प्रेरणा आजोबांकडूनच मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:17 AM2019-07-16T11:17:39+5:302019-07-16T11:18:00+5:30

हौशी नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांची कृतज्ञता : नाटकाने बोलणे, जगणे शिकविले

Folk art, inspiration for theatrical art came from grandparents | लोककला,नाट्य कलेची प्रेरणा आजोबांकडूनच मिळाली

लोककला,नाट्य कलेची प्रेरणा आजोबांकडूनच मिळाली

Next



अतुल जोशी।
आॅनलाइन लोकमत
धुळे : घरी शेतीवाडी अथवा नोकरीचे कुठले साधन नसल्याने, आजोबा गोंधळ, लोककला सादरीकरण करण्याचे काम करायचे. त्यांच्यामुळे लोककलेची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असतांना एकांकिका केल्या. पुढे नाट्यक्षेत्रातही अभिनयाचा ठसा उमटविला. मात्र यासर्व प्रवासात आजोबा दगडू लक्ष्मण पाचंगे (गोंधळी) हेच आपले गुरू असल्याची भावना हौशी नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांनी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली.
नाट्यकर्मी संदीप पाचंगे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे रहिवाशी. घरी शेती अथवा कोणी नोकरीला नसल्याने, परिवाराचा उदरनिर्वाह म्हणून आजोबा दगडू गोंधळी हे गावोगावी गोंधळ, लोककला सादर करण्याचे काम करायचे. त्यातूनच मुलांचे शिक्षण केले. घरीच लोककला सादरीकरणाची परंपरा असल्याने, संदीप पाचंगे यांनीही लोककलेविषयी आवड निर्माण झाली. लोककलेचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले. वयाच्या १०-१२ व्या वर्षापासून ते लोककलांच्या कार्यक्रमांमधून तुनतुना वाजवायला शिकले. संभळ कसा वाजवायचे याची शिकवण आजोबांनी दिली. पुढे महाविद्यालयात असतांना प्रा. सुधीर साठे, प्रा. अरविंद चौधरी यांनी पाचंगे यांना एका एकांकिकेत संधी दिली. १९९९ मध्ये मू.जे. महाविद्यालयात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ‘विषाची परीक्षा’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकिने त्यांना ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर स्पर्धेविषयी जिव्हाळा वाढला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर उत्पन्नाचे साधन म्हणून ते पथनाट्याकडे वळले. पथनाट्यात विनोद ढगे हे आपले गुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर स्वत:चा गृप तयार केला. या पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले. पथनाट्य करीत असतांनाच जळगावातील नाट्यकर्मिंशी संपर्क आला. त्यांच्या माध्यमातून अनेक राज्य नाट्य स्पर्धा केल्या. ज्येष्ठ रंगकर्मीच्या माध्यमातून नाटकांमधील बारकावे शिकण्यास मदत झाली. धुळ्यातही पूर्वी नाट्यक्षेत्राचे काम जोरात होते. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत त्यात शिथिलता आली. इतर नाट्यकर्मींच्या सहकार्याने येतील नाट्यक्षेत्राला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला. धुळ्यात २०११ मध्ये महावितरणची स्पर्धा झाली. त्यात ‘एक चॉकलेट प्रेमाचे’ हे नाटक सादर केले. या नाटकाने धुळ्यात ओळख निर्माण झाली. त्यानंतर शहरातील इतर नाट्यकर्मींच्या सहकार्याने ‘आषाढ नाट्य महोत्सव’ सुरू केला. या नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयगस्तांना तसेच बेटावदच्या एका शहीद जवानांच्या परिवाराला मदत केली. नाटकाने मला जगणे, बोलणे शिकविल्याची त्यंची भावना आहे. पाचंगे यांनी आतापर्यंत २२-२३ दोन अंकी नाटकाचे प्रयोग केले आहेत. तर ४० एकांकिका सादर केल्या आहेत. त्याचबरोबर स्वरचित दहा बिडंबन नाटिका सादर केल्या आहेत.

Web Title: Folk art, inspiration for theatrical art came from grandparents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे