अक्कलपाडा धरणातून ५०० क्युसेकने सोडलेले पहिले आवर्तन

By देवेंद्र पाठक | Published: April 7, 2024 06:20 PM2024-04-07T18:20:54+5:302024-04-07T18:21:26+5:30

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वीचगेटमधून ५०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले, अशी ...

First cycle released from Akkalpada dam with 500 cusecs | अक्कलपाडा धरणातून ५०० क्युसेकने सोडलेले पहिले आवर्तन

अक्कलपाडा धरणातून ५०० क्युसेकने सोडलेले पहिले आवर्तन

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वीचगेटमधून ५०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार धरणातून पाणी सोडले. तप्त उन्हाळ्यात पांझरा नदी प्रवाहित झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. ६५० दलघनफूट जलसाठ्यात धुळे तालुक्यासह शिंदखेडा, अमळनेर तालुक्यांतील गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले आहे. अक्कलपाडा धरणाची क्षमता ३ हजार ८४० एमसीएफटी एवढी आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पांझरा नदीवरील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांसाठी ५४३.८८९ दलघफू व अमळनेर तालुक्यातील गावांसाठी १०६.६४९ दलघफू असे एकूण ६५०.५३८ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

नदी पात्रातील फळ्या काढण्यात आल्या आहेत. सध्या पांझरा नदीत वीस केटिवेअर आहेत. या केटिवेअरमध्ये पाणी अडविले जाणार नाही. यावर संबंधित यंत्रणेतील पथक लक्ष ठेवून आहेत. अक्कलपाडा धरणाचे तापी संगमापर्यंत पाणी अखंडपणे प्रवाहित राहील याची जबाबदारी ग्रामपंचायत, उपअभियंता, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती उपअभियंता, पाटबंधारे विभाग यांची संयुक्तिक आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात तिन्ही तालुक्यांतील गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. साधारणपणे दोन आवर्तन सोडले जातात. मात्र, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ, मुडी प. डा, बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, डांगर बु., एकतास, तांदळी, निम, जवखेडा वावडे, एकलहरे, लोण खु. व लोण बु. या गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडणेकामी मागणी केली होती. जिल्हा परिषदेकडे पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी बाकी आहे.

शेतकरीवर्गाचा लढा
अक्कलपाडा धरणाच्या उजव्या-डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे. या न्याय व हक्कासाठी अक्कलपाडा संघर्ष समिती स्थापन करून लढा देणे सुरू केले आहे.

Web Title: First cycle released from Akkalpada dam with 500 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे