भाजपाची जादू पुन्हा चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:08 PM2019-05-23T22:08:15+5:302019-05-23T22:08:49+5:30

सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघानी दिली डॉ.भामरेंना साथ

 BJP's magic is going on again | भाजपाची जादू पुन्हा चालली

dhule

Next

धुळे : लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ६ लाख १३ हजार ५३३ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३ लाख ८४ हजार २९० मते मिळाली. निवडणुकीत डॉ.सुभाष भामरे यांना २ लाख २९ हजार २४३ एवढे मताधिक्य मिळाले. डॉ.भामरे यांना २०१४ च्या निवडणुकीत ५ लाख २९ हजार ४५० मते मिळाली होती. म्हणजेच डॉ.भामरे यांनी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ८४ हजार ८३ मते अधिक मिळविली. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघातून डॉ.भामरे यांना मताधिक्य मिळवित सन २०१४ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती घडवली.
धुळे : सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे डॉ.सुभाष रामराव भामरे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा २ लाखांचे मोठे मताधिक्य पराभव केला. सुरुवातीला धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार अशी अपेक्षा निकालानंतर पोल ठरली. डॉ.भामरे यांनी पहिल्या फेरीपासूनच लीड घेतला होता तो अंतिम फेरीपर्यंत वाढतच गेला.
गुरूवारी सकाळी ७.३० वाजता उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्रॉँगरूम उघडून मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली. एकूण १९ फेºया झाल्या. भाजपाचे उमेदवार डॉ.भामरे यांनी केवळ एक फेरी वगळता डॉ.भामरे यांनी प्रत्येक फेरीत आपली आघाडी वाढवत नेली. यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. १९ व्या फेरीअखेर डॉ.भामरे यांचा विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष सुरू केला. शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साह पहावयास मिळाला.
शहरातील नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाशेजारी असलेल्या शासकीय धान्य गोदामात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी २० या प्रमाणे १२० टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली. यानंतर रॅन्डम पद्धतीने केंद्रांची निवड करून तेथील व्हीव्हीपॅट मतांची पडताळणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या जय्यत तयारीमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.
वाढलेले तापमान लक्षात घेऊन बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी मंडपांची व्यवस्था केली होती. गोदाम परिसरात पोलिसांच्या वाहनांसह अग्निशमन बंब, १०८ क्रमांकाच्या दोन रूग्णवाहिका, तत्काळ उपचारासाठी आरोग्य विभागाचे पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्हीव्हीपॅट मत पडताळणीला चार तासांचा कालावधी लागला.

Web Title:  BJP's magic is going on again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे